(रविवारच्या संध्याकाळी चंपक घरूनच
तॅत्सला व्हॉट्सअप करतो. पलीकडून
wc04त्वरित प्रत्युत्तर येतं.)
तॅत्स : बोला चंपकराव.
चंपक : दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंडचं काय होणार?
(तॅत्सचं मशीन कामाला लागतं. खूप वेळानंतर कोरं मैदान स्क्रीनवर अवतरतं.)
तॅत्स : चंपकराव ही खरी समान लढाई. दोन्ही संघांना विश्वचषक एकदाही जिंकता आलेला नाही. त्यामुळे प्रचंड आशाआकांक्षा पणाला लागल्या आहेत. दोन्ही संघ या ‘उपांत्य’ अडथळ्यावरूनच अनेकदा घरी परतलेले आहेत. न्यूझीलंड समोर येईल त्याला चिरडत जाणाऱ्या बुलडोझरसारखं खेळत आहेत. छोटी मैदानं आणि प्रेक्षकांचा तुडुंब पाठिंबा त्यांची जमेची बाजू आहे. पण सगळ्याच ठिकाणी बुलडोझर कामी येत नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ पडला, धडपडला, परत उठून उभे राहिले आणि श्रीलंकेला नमवत त्यांनी कमाल केली. कौशल्याचा विचार केल्यास ते न्यूझीलंडपेक्षा सरस आहेत, पण मानसिकदृष्टय़ा न्यूझीलंड कणखर आहे. दक्षिण आफ्रिकेला मानसिकदृष्टय़ा सक्षम करण्याची जबाबदारी एकाच माणसाच्या खांद्यावर आहे, तो म्हणजे एबी डी’व्हिलियर्स. सळसळती ऊर्जा आणि झंझावाती फॉर्म न्यूझीलंडची स्पर्धेतली ताकद आहे. आफ्रिककडे परिपूर्ण संघ आहे. इथून परतावं लागणं खूप जिव्हारी लागणारं आहे त्यामुळे जीवाची बाजी लागेल या मॅचमध्ये. ईडन पार्क छोटं असल्यामुळे साडेतीनशेचं आव्हान पेलता येऊ शकतं आणि तगडय़ा बॉलिंगमुळे पावणेदोनशेचाही बचाव करता येऊ शकतो. भावनांपेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व देणारा संघ जिंकेल. पारडं किंचितसं न्यूझीलंडकडे झुकलेलं आहे.  
चंपक : एकदम एक्सायटिंग वाटतंय. जाम भारी! मॅच झाली की भेटूच..