क्रिकेट, फुटबॉल, हॉकी या खेळांमध्ये सांघिक कामगिरीवर भर असतो. कोण अमुक एखादा खेळला म्हणून संघ जिंकला, हे जरी खरे होत असले तरी त्या खेळाडूमागे संपूर्ण संघ एकजुटीने उभा असतो़  त्यामुळे सांघिक खेळ असेल तर आणि तरच संघाची वाटचाल यशाकडे होते, हे साधे समीकरण वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघ जणू विसरल्याचेच विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत प्रत्ययास येत आह़े, त्यामुळे संघ म्हणून जरी ते मैदानात उतरले असले तरी त्यांच्या कामगिरीकडे पाहताना त्यांच्या असंघटितपणाचे वास्तव समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तान या सामन्याचे महत्त्व दोन्ही संघांतील खेळाडूंना पटवून देण्याची आवश्यकता नाही़  भारताविरुद्ध नेहमी त्वेषाने आणि एकजुटीने खेळणारा पाकिस्तानचा संघ विश्वचषकातील पहिल्या लढतीत विखुरलेला दिसला़  भारताविरुद्ध पाकिस्तानी खेळाडू आपापसातील हेवेदावे विसरून एकजूट होतात; पण तसे या वेळी नाही घडल़े  लय हरवलेली गोलंदाजी, त्याला ढिसाळ क्षेत्ररक्षणाची जोड आणि त्यात धिमी फलंदाजी, हे सर्व त्या लढतीत कुणालाही अपेक्षित नसलेले घडल़े  सलामीवीर नासीर जमशेदला वगळून अतिरिक्त फिरकीपटू यासीर शाहचा समावेश, मधल्या फळीतील फलंदाज युनिस खानला सलामीला धाडण्याचा निर्णय या चुका मिसबाह-उल-हकने का केल्या? हा प्रश्न अनुत्तरितच आह़े  संघातील सर्वात अनुभवी खेळाडू युनिस खान कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यात अपयशी ठरला़  त्याच्या देहबोलीतून तो मिसबाहच्या निर्णयाने नाखूश दिसत होता आणि त्याचे पडसाद सामन्यावर उमटल़े
शाहिद आफ्रिदीवर आणखी किती काळ पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंधळेपणाने विश्वास ठेवायचा, हे ठरवायला हव़े  ऐन मोक्याच्या क्षणी आणि महत्त्वाच्या लढतीत त्याची बेफिकीर वृत्ती संघासाठी मारक ठरत आली आह़े  त्याने काही सामन्यांत संघाला तारले असले तरी तो आजही बेभरवशाचा खेळाडू आह़े  सलामीवीरांच्या अपयशाच्या दडपणामुळे उमर अकमल व मिसबाह यांना मोठी खेळी साकारण्यात वारंवार अपयश येत आह़े  गोलंदाजीत मोहम्मद इरफानच्या उंचीव्यतिरिक्त त्याच्या गोलंदाजीची चर्चा होतच नाही़  तशी छाप त्याने सोडलेली नाही़  वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, सोहेल खान यांच्या गोलंदाजीत गती, वेग आणि भेदकता नाही. झिम्बाब्वेविरुद्ध इरफान आणि वहाब यांनी काहीशी लयबद्ध गोलंदाजी केली, असे म्हणायला हरकत नाही़  क्षेत्ररक्षणातही त्यांचा ढिसाळपणा दिसून येत आह़े
वेस्ट इंडिज संघाची ‘दिशा आणि दशा’ पाकिस्तानसारखीच आह़े  वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेला वाद त्यांना अद्यापही मिटवता आलेला नाही़  ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स, दिनेश रामदिन, डॅरेन सॅमी यांचा आणि मंडळाचा नेहमीच वाद होत असतो़  त्यामुळे या अनुभवी खेळाडूंपैकी कुणा एकाकडे नेतृत्वाची धुरा न सोपवता नवशिक्या जेसन होल्डरच्या खांद्यावर जबाबदारी टाकून मंडळाने कुरघोडी करण्याचा डाव रचला; पण हा डाव त्यांना जमलेला दिसत नाही़  ‘जायंट किलर’ आर्यलडसमोर त्यांना शरणागती पत्करावी लागली, हे याचे पहिले उदाहरण़  होल्डरला नेतृत्वाचा फारसा अनुभव नसल्याने दडपणाखाली त्याला काय करावे हे सुचतच नाही़  त्याला मदत करायलाही कुणी पुढाकार घ्यायलाही इच्छुक नाही़  त्यामुळे हा कागदावरील तगडा संघ यशासाठी झगडत आह़े
झिम्बाब्वेविरुद्ध विक्रमी द्विशतक ठोकणारा गेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आश्चर्यकारक खेळला. चारशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना गेलकडून मोठी खेळी अपेक्षित होती; परंतु यष्टय़ा मोकळ्या सोडून हा पठ्ठय़ा फटका मारायला गेला आणि त्रिफळाचीत होऊन माघारी परतला़  पराभवानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कसलीही खंत दिसत नव्हती़, कारण राष्ट्रीय संघात चांगले खेळून जितका पैसा मिळतो, त्याहून अधिक पैसा आयपीएल खेळून त्याला मिळत आह़े  
आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत एक फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्यावर पकड घेण्याची संधी होती़  मात्र, हशिम अमला व फॅफ डय़ू प्लेसिसच्या संयमासमोर त्यांना अपयश आल़े  गेलने एकाच षटकात दोघांना बाद करून विंडीजला पुन्हा पुनरागमनाची संधी दिली खरी, परंतु होल्डर पुन्हा भरकटला आणि महत्त्वाच्या गोलंदाजांना त्याने पाचारण केलेच नाही़  अखेरच्या षटकांत ए बी डी’व्हिलियर्स दांडपट्टय़ाचा प्रहार करत असताना होल्डरने प्रभावी मारा करणे अपेक्षित होत़े; पण ती अपेक्षा फोल ठरली. त्याने अखेरच्या दोन षटकांत तब्बल ६४ धावा बहाल केल्या़  हे त्याच्या अपरिपक्वतेचे लक्षण म्हणावे लागेल़  राष्ट्रीय संघटनेसोबत आर्थिक व्यवहारांचे हेवेदावे असतील किंवा अन्य बाबी, त्यांचा खेळावर परिणाम होऊ न देण्याची जबाबदारी ही खेळाडूची असत़े; पण तसे होताना दिसत नाही़  अशा परिस्थितीत एकमुखाने सामना करायला हवा, तेथेच हे संघ कमी पडतात.
स्वदेश घाणेकर