‘‘मी करारावर स्वाक्षरी करणार नाही!’’, असे त्या विशीतल्या तरुणाने सांगितले, तेव्हा समोरच्या अधिकाऱ्याचा यावर विश्वासच बसला नाही. कारण ते झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंसाठीचे करारपत्र होते. त्यावर १० कोटी झिम्बाब्वे डॉलर (एक हजार अमेरिकन डॉलर) अशी रक्कम लिहिली होती. wc09एकाच्या पुढे असलेले अनेक शून्य त्याला स्वाक्षरी करण्यासाठी साद घालत होते. परंतु त्या तरुणाचा निश्चय पक्का होता. ‘‘हा माझा वैयक्तिकनिर्णय आहे. खेळाडूला हा पैसा किती काळापर्यंत मिळत राहील?’’, असा प्रश्न शॉन विल्यम्सने केला आणि तो निघून गेला. समोर बसलेले झिम्बाब्वे क्रिकेटपटू कल्याण आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष क्रिस्पेन पिसवाराई अवाक होऊन पाहतच राहिले.
डावखुरा फलंदाज शॉनने याआधी युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत झिम्बाब्वेचे नेतृत्व केले होते. याचप्रमाणे २००४ मध्ये खेळाडूंच्या संपामुळे झिम्बाब्वेचे क्रिकेट कठीण कालखंडातून जात असताना त्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते, नव्हे, दोन वष्रे तो इमाने-इतबारे खेळतही होता. मग अचानक अशी कोणती आपत्ती आली की, त्याने करारपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पाहता-पाहता क्रिकेटजगतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शॉनचे वडील कॉलिन विल्यम यांनीच त्याला हा निर्णय घ्यायला प्रवृत्त केल्याची गोष्ट फार काळ लपून राहिली नाही. कॉलिन हेसुद्धा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. परंतु क्रिकेटपेक्षा हॉकीमध्ये ते अधिक रमले. राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचा दबदबा होता. शॉनचा भाऊ मॅथ्यूज विल्यम्ससुद्धा माटाबेलेलँडकडून स्थानिक क्रिकेट खेळत होता. मुलाची क्रिकेट कारकीर्द समृद्धपणे घडावी, अशी कॉलिन यांची इच्छा होती. त्यामुळेच या बापलेकाने क्रिकेटच्या स्वप्नासोबतच शिक्षणाचीही कास धरली. परंतु झिम्बाब्वेचे अस्थिर क्रिकेट व्यवस्थापन हे यामागे एक महत्त्वाचे कारण होते.
झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू मानधनापासून वंचित असल्याचे २०१३ मध्ये प्रकाशात आले, तेव्हा सर्वानाच त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली होती. परंतु २००१ पासून अनेकदा झिम्बाब्वेच्या क्रिकेटचे हे क्रूर वास्तव जगासमोर आले आहे. सरकारी हस्तक्षेप, तुटपुंजा क्रीडा निधी, तडकाफडकी निर्णय यामुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटमध्ये जसे त्या वेळी अस्थर्य नांदत होते, तसे ते आजही आहे. त्यामुळेच विल्यम्सच्या निर्णयाची अनेकांनी पाठराखणही केली.
क्रिकेटवरील निस्सीम प्रेम मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. आपला निर्णय बासनात बांधून शॉन तीन महिन्यांनी पुन्हा झिम्बाब्वेच्या संघात परतला. झिम्बाब्वे क्रिकेटच्या करारावर त्याने स्वाक्षरीही केली, परंतु ती मोहवणाऱ्या आकडय़ासाठी नव्हे, तर क्रिकेटच्या प्रेमापोटी. मग २००८ मध्ये दुखापतींमुळे बेजार झालेल्या शॉनने करार सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु आठवडय़ाभरातच तो पुन्हा राष्ट्रीय संघात परतला.
२००७ च्या विश्वचषकात शॉनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. हा सामना जरी विंडीजने जिंकला, तरी सामनावीर पुरस्काराने मात्र शॉनला गौरवण्यात आले होते. मग २०११ च्या विश्वचषकात अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अध्र्यावर सोडून मायदेशी परतावे लागले. शॉनने ६९ एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करताना ३१.२६ च्या सरासरीने १७८२ धावा काढल्या आहेत. परंतु झिम्बाब्वे संघासोबत फारसे कुणी कसोटी खेळण्यासाठी उत्सुक नसल्यामुळे ११ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत त्याच्या वाटय़ाला फक्त दोन कसोटी सामने आले. २०१३ मध्ये वेस्ट इंडिज आणि २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध तो कसोटी सामने खेळला.
सप्टेंबर २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानधनाच्या मुद्दय़ावरून शॉनने खेळण्यास नकार दिला होता. परंतु नंतर त्यावर तोडगा निघाल्याने तो पुन्हा क्रिकेटच्या राष्ट्रीय सेवेत आनंदाने सामील झाला. गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यात झिम्बाब्वेचा निम्मा संघ १७७ धावांत तंबूत परतल्यामुळे संकटात होता. परंतु शॉनने नाबाद ७६ धावांची खेळी साकारून झिम्बाब्वेला जिंकून दिले. अनुभवी शॉन हा आजही झिम्बाब्वेच्या क्रिकेटसाठी तारणहार आहे. त्याने अशाच प्रकारे धावांचे सातत्य राखले, तर कदाचित पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याला लिलावात त्याचा समावेश असेल आणि स्वाभाविकपणे मोठय़ा रकमेच्या करारावर त्याला स्वाक्षरी करता येईल. त्यामुळे बाबांच्या स्वप्नातील आर्थिक स्थर्य शॉनला खऱ्या अर्थाने मिळू शकेल, अशी आशा आहे.
प्रशांत केणी