झिम्बाब्वेने सराव सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा धक्का देत खळबळजनक विजयाची नोंद केली. अन्य लढतीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने विजयी सराव केला. मात्र न्यूझीलंडने जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २७९ धावा केल्या. हॅमिल्टन मासाकाटझाच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने ७ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. मासाकाटझाने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. ब्रेंडान टेलरने ६३ तर शॉन विल्यम्सने ५१ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३१ धावांचा डोंगर उभारला. ट्रेंट बोल्टने ५ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव १९७ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकापूर्वीच न्यूझीलंडने धक्का दिला आहे.
मायकेल क्लार्क, आरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३०४ धावांची मजल मारली. त्यानंतर अफगाणिस्तानला ११६ धावांत गुंडाळत ऑस्ट्रेलियाने १८८ धावांनी दणदणीत विजय साकारला. जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि झेव्हियर डोहर्टी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मायकेल क्लार्कने फलंदाजीसह गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला बळकटी मिळाली आहे.
जो रुटच्या ८५ धावांच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य ठेवले. खराब सुरुवातीनंतर मिसबाह उल हक (९१) आणि उमर अकमल (६५) यांनी अर्धशतकी खेळी साकारत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला.