ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होत असताना त्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरलेला सलामीवीर अजिंक्य रहाणे हा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकावर योग्य आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय गोलंदाज तरी यशस्वी होताना दिसत होते. परंतु या दौऱ्यात फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीही ढेपाळलेली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करावयाची असल्यास मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे तारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा आणि स्वत: कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना त्यांच्या दर्जानुसार फलंदाजी करणे आवश्यक आहे. प्रत्येक सामन्यासाठी योग्य नियोजन आणि धोरण आखण्याची गरज आहे. सलामीसाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा हीच जोडी योग्य आहे. अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यास उत्तम राहील. या दौऱ्यात गोलंदाजी ही एक प्रमुख समस्या असून काही गोलंदाजांच्या तंदुरुस्तीविषयीचा अहवाल लवकरच संघ व्यवस्थापनाला प्राप्त होईल. त्यात सकारात्मकता असल्यास जाडेजासह आर. अश्विन यांना अंतिम संघात खेळवायलाच हवे. रणजी सामन्यांमध्ये फिरकीपटू अक्षर पटेलचा जितका गवगवा झाला, तशी कामगिरी त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर करता आलेली नाही. त्याच्याकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. भारताने सर्वच क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली तरच थोडीफार आशा धरता येईल. विश्वचषक जिंकण्याच्या दावेदारांमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत दिसत असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे अमुक एका संघाचे नाव घेता येणे शक्य नाही.
-चेतन चौहान, माजी क्रिकेटपटू

शब्दांकन : अविनाश पाटील