extra‘‘माझे कुटुंबीय, शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्या योगदानामुळेच मला ही प्रतिष्ठेची जबाबदारी पेलता आली. याचप्रमाणे अन्य कर्मचारी वर्गाचेही माझ्या वाटचालीत मोठे योगदान आहे. यापैकी काही जण दिवसभर राबून आम्हाला खेळण्यासाठी मैदाने तयार करून द्यायचे,’’ अशा शब्दांत कुमार संगकाराने आपल्या भावना प्रकट केल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. २००९मध्ये संगकाराकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानिमित्त त्याच्या ट्रिनिटी कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला होता. संगकाराने मग इतक्यावरच समाधान मानले नाही, तर कार्यक्रम संपल्यावर तो या कर्मचारीवर्गाला भेटला. अनेकांच्या आशीर्वादांसोबतच काही जणांच्या खांद्यावर त्यानं डोकं ठेवलं. या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. राजधानी एक्स्प्रेसच्या वेगानं संगकाराच्या मनानं केव्हाच आठवणींच्या राज्यात प्रवेश केला होता.
ते वर्ष होतं १९९६. ‘स्टुडंट ऑफ द इअर’साठीचं (वर्षांतील सर्वोत्तम विद्यार्थी) प्रतिष्ठेचं रायडे सुवर्णपदक आणि सर्वोत्तम क्रीडा गुणवत्तेसाठीचा ट्रिनिटी लायन पुरस्कार कुमारनं पटकावला होता. ‘पापा कहते है, बडम नाम करेगा..’ हे बोल त्यानं सार्थ ठरवले होते. दऱ्याखोऱ्यांचं नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं कँडी हे कुमारचं जन्मस्थळ. वडील स्वर्णकुमार संगकारा हे व्यवसायाने कायदेतज्ज्ञ. त्यामुळे त्यांच्या नावाचा दबदबा होता. कुमारला दोन बहिणी आणि एक भाऊ. या तिघांनीही खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केलं होतं. ट्रिनिटी कॉलेज या खासगी शाळेत कुमारनं शिक्षण सुरू केलं. अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींत त्याला रस होता. प्रारंभी टेनिस आणि टेबल टेनिस या खेळांकडे तो वळला. कँडी गार्डन क्लब कोर्टावर त्याच्या वडिलांनी या खेळांचे धडे त्याला दिले. कोर्टबाहेर बसून खेळाच्या अनेक तांत्रिक पुस्तकांमधील ज्ञानही ते त्याला देत. नंतर बॅडमिंटन, जलतरण आणि क्रिकेट या खेळामध्येही कुमारला आवड निर्माण झाली. बॅडमिंटन आणि टेनिसमध्ये तर त्यानं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली. परंतु क्रिकेटमधील त्याची गुणवत्ता ट्रिनिटीचे तत्कालीन प्राचार्य लेफ्ट. कर्नल लिओनार्ड डी अल्विस यांनी हेरली. मग त्यांनी कुमारच्या आईला शाळेत बोलावून मुलाला क्रिकेटकडेच लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच या शाळेचा क्रिकेटमधील हा ध्रुवतारा घडवण्यात सिंहाचा वाटा आहे.
प्रशिक्षक उपानंद जयसुंदेरा यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारनं १३ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व केलं. मग बर्टी विजेसिंघे यांच्या मार्गदर्शनाखालील १५, १७, १९ वर्षांखालील वयोगटांच्या क्रिकेटमध्ये कुमारची कारकीर्द आकार घेऊ लागली. १९व्या वर्षी कुमारनं अद्वितीय फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या गुणवत्तेनं राष्ट्रीय निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. वडिलांनी त्याच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्यानं लक्ष पुरवलं. याच काळात कला शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांच्याच पावलांवर पाऊल टाकत कोलंबो विद्यापीठात कायदेविषयक पदवीसाठी त्यानं प्रवेश घेतला. परंतु १९९८-९९ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी श्रीलंका ‘अ’ संघात कुमारची निवड झाली. झिम्बाब्वे ‘अ’ संघाविरुद्ध नाबाद १५६ धावांची कुमारची खेळी लक्षवेधी ठरली. मग पुढच्याच वर्षी तो श्रीलंकेच्या संघात दाखल झाला. त्यानंतर गेल्या १६ वर्षांत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कुमारने आपल्या खेळाद्वारे आणि वागणुकीमुळे सर्वाची मनं जिंकली आहेत. सततच्या दौऱ्यांमुळे तो अद्याप पदवी उत्तीर्ण होऊ शकलेला नाही.
चोक्षानंद कुमार संगकारा हे त्याचं पूर्ण नाव. चोक्षानंद म्हणजे स्पष्टवक्ता. याच संगकारानं २०११ मध्ये लॉर्ड्सवरील एमसीसीच्या क्रिकेट सद्भावना काऊड्रे वार्षिक व्याख्यानात आपल्या वाणीनं क्रिकेटजगताला जिंकलं. श्रीलंकेच्या क्रिकेट प्रशासनाचा इतिहास आणि भ्रष्टाचार याबाबत त्यानं सडेतोडपणे मत मांडलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकीर्द चालू असलेला तो पहिला आणि सर्वात युवा व्याख्याता ठरला होता. त्याच्या या व्याख्यानानंतर श्रीलंकेचे क्रीडामंत्री महिंदानंदा अल्युथगमगे यांनी याबाबत त्वरित चौकशीचे फर्मान सोडले होते. परंतु तरी क्रिकेट इतिहासात ते एक सर्वोत्तम व्याख्यान मानलं जातं.
सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे. याशिवाय यष्टीरक्षणाचेही अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. यंदा श्रीलंकेला पुन्हा विश्वविजेतेपद मिळवून देत समाधानाने निवृत्ती पत्करण्याचं स्वप्न त्यानं जोपासलं आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा उच्च पदवीधर क्रिकेटपटू मशफिकर रहिमपासून प्रेरणा घेत पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार कुमारनं व्यक्त केला होता. कदाचित निवृत्तीनंतर कुमार पुन्हा आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल किंवा श्रीलंकेचं क्रिकेट प्रशासन सुधारण्यासाठी स्वत: कार्यरत होईल.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?