चष्म्यामुळे डॅनियल व्हेटोरीच्या व्यक्तिमत्त्वाला एक वैचारिकता प्राप्त झाली आहे; पण तसाच त्याचा स्वभावही आहे. त्यामुळेच ‘हॅरी पॉटर’ या नावाने क्रिकेटजगतात तो लोकप्रिय आहे; परंतु हे टोपणनाव मात्र त्याला अजिबात आवडत नाही. चष्म्याच्या जागी एव्हाना त्याने लेन्सेसही धारण केल्या असत्या; परंतु तरुणपणी बाइक चालवत असताना एका अपघाताचे निमित्त झाले आणि डॉक्टरांनी ‘‘यापुढे लेन्स वापरता wc09येणार नाही,’’ अशी त्याला सूचना दिली.
१९९७ मध्ये डॅनियलने नुकतीच वयाची १८ वष्रे पूर्ण केली होती. फार्मासिस्ट व्हावे, या प्रेरणेने त्याने वायकाटो विद्यापीठात अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन काहीच दिवस झाले होते. या अभ्यासक्रमासाठी त्याला शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली होती; परंतु २० दिवसांपूर्वीच नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाकडून त्याने प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. फक्त दोन स्थानिक सामन्यांचा अनुभव त्याच्या गाठीशी होता; पण तरीही वेलिंग्टनच्या बेसिन रिझव्र्ह येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले. देशासाठी खेळण्याची संधी डॅनियलने मुळीच दवडली नाही आणि तो न्यूझीलंडचा सर्वात कमी वयाचा कसोटी पदार्पणवीर ठरला. दुर्दैवाने इंग्लंडविरुद्धची ही कसोटी न्यूझीलंडने डावाने गमावली. त्यानंतर पुढच्या कसोटीतही किवी संघाने हार पत्करल्यामुळे मालिका ०-२ अशा फरकाने गमावली; परंतु डॅनियलच्या फिरकीने मात्र सर्वाचे लक्ष वेधले होते. मग श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० असे वर्चस्व प्रस्थापित केले. हॅमिल्टनच्या दुसऱ्या कसोटीत आणि त्याच्या कारकीर्दीतील चौथ्या कसोटीत त्याला प्रथमच सामनावीर पुरस्कार मिळाला. हीच कसोटी न्यूझीलंडचा अनुभवी फिरकीपटू दीपक पटेलच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी होती; परंतु संघाला फिरकीचा वारसदार मिळाला, हे समाधान पटेलच्या चेहऱ्यावर होते. क्रिकेटमधील कारकीर्द योग्य वाटेवर असल्याची खात्री पटल्यामुळे डॅनियलनं आपला अभ्यासक्रम मात्र स्थगित केला.
डॅनियलची आई रॉबिन व्यवसायाने परिचारिका, तर वडील रेन्झो दुग्ध व्यवसाय करणाऱ्या कंपनीत नोकरीला आहेत; पण ते मूळचे इटलीचे. रेन्झो सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांनी इटलीहून न्यूझीलंडला स्थलांतर केले होते. आता डॅनियल आपल्या आजीला भेटायला इटलीला बऱ्याचदा जातो. साधी राहणी जोपासणाऱ्या या व्हेटोरी कुटुंबीयांनी आपल्या मुलाचे क्रिकेटप्रेम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. डॅनियल सात वर्षांचा असताना व्हेटोरी दाम्पत्याने त्याला ख्रिसमस भेट म्हणून बॅट दिली होती. आपल्याला सांताक्लॉजने मोठा क्रिकेटपटू होण्यासाठी ही दैवी भेट दिल्याचा समज त्या वेळी त्याला झाला होता.
क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, रग्बी या खेळांची डॅनियलला बालपणी खूप आवड होती. लिव्हरपूल संघाचा निस्सीम चाहता. शाळेच्या क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही संघांचा तो कर्णधार होता. तो मध्यमगती गोलंदाजी करायचा; परंतु त्याबाबत तो समाधानी नव्हता. वयाच्या १५व्या वर्षी डॅनियलच्या फुटबॉल संघाच्या बसचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्याच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आणि फिरकी गोलंदाजीचा वसा त्याने घेतला; पण इतक्या लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडतील, असे या कुटुंबाला वाटले नव्हते. डॅनियलच्या बालपणी त्याच्या खेळामधील कर्तृत्वाची अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. त्या छापलेल्या बातम्यांची कात्रणे आजही आठवणींचा ठेवा म्हणून या दाम्पत्याने ठेवला आहे.
२००७ मध्ये डॅनियलचा मारी ओ’कॅरॉलशी विवाह झाला. त्यांना दोन मुलेही आहेत. विवाहानंतर त्याने स्वत:च्या कमाईने पहिले घर खरेदी केले. त्यामुळे हे दाम्पत्य ऑकलंडला स्थायिक झाले; परंतु आताही तो नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचेच प्रतिनिधित्व करतो. २०१०-११ या कालखंडात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला होता; परंतु न्यूझीलंड क्रिकेटच्या भल्यासाठी त्याला तो बासनात बांधावा लागला. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठीच्या न्यूझीलंडच्या १५ जणांच्या चमूत डॅनियलच्या नावाचा समावेश करण्यात आला, तेव्हा त्याचे सर्वानाच आश्चर्य वाटले; परंतु १९९२ प्रमाणेच विश्वचषकात पराक्रम दाखवून यंदा मात्र विजेतेपद जिंकायचेच, हा पण न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने केला आहे. त्यामुळेच ३६ वर्षीय डॅनियल हे त्यांचे महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यानेही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत पाच सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या पाश्र्वभूमीवर किवी संघाला पहिलेवहिले जगज्जेतेपद जिंकून देऊनच डॅनियल संस्मरणीय निवृत्ती पत्करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.