वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेटजगताने इंग्लिश शोकांतिकेची अनुभूती घेतली. जे काही घडत होते, ते अविश्वसनीय आणि न्यूझीलंड संघासाठी स्वप्नवत होते. टिम साऊदीने एकापाठोपाठ एक हादरे देत तwc08ब्बल सात बळी घेतले आणि इंग्लंडचा पहाडासारखा संघ क्षणार्धात भुईसपाट झाला. या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरतो न सावरतो, तोच ब्रेंडन मॅक्क्युलमने हल्लाबोल केला आणि १८ चेंडूंत wc02विश्वचषकातील विक्रमी वेगवान अर्धशतक झळकावले. त्यामुळे विश्वचषकाच्या ‘अ’ गटात किवी संघाने आठ विकेट राखून शानदार विजयाची नोंद केली.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर मोठी धावसंख्या उभारण्याचे मनोरथ आखणाऱ्या इंग्लंडच्या संघाचा डाव अनपेक्षितपणे फक्त १२३ धावांत गडगडला. वेगवान गोलंदाज साऊदीने ३३ धावांत इंग्लंडच्या ७ फलंदाजांना तंबूची वाट दाखवत यात मोलाची भूमिका बजावली. विश्वचषकाच्या इतिहासात ग्लेन मॅकग्रा व अँडी बिचेल यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साऊदीने नोंदवली.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने फक्त १२.२ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात हे आव्हान आरामात पार करण्याची औपचारिकता दाखवली. मॅक्क्युलमने २५ चेंडूंत ७७ धावांची वादळी खेळी साकारत क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याच्या या खेळीत आठ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.
मॅक्क्युलमने आपल्या झंझावाती खेळीत फक्त तीन एकेरी धावा काढल्या. बाकी ७४ धावांसाठी त्याने फारशी ‘धावपळ’ न करता चेंडू सीमापार भिरकावणेच अधिक पसंत केले. स्टीव्हन फिनच्या षटकात त्याने चार सलग षटकारांची बरसात करून अर्धशतक पार केले. त्याने फिनच्या १० चेंडूंत ४४ धावा फटकावल्या. यात सहा षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. ३०८च्या स्ट्राइक रेटने सनसनाटी खेळी साकारणाऱ्या मॅक्क्युलमची खेळी ख्रिस वोक्सने त्रिफळा उडवून संपुष्टात आणली.
त्याआधी, साऊदीने विश्वचषक क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम गोलंदाजीची नजाकत पेश करीत सर्वाची वाहवा मिळवली. २६ वर्षीय साऊदीने इयान बेल आणि मोईन अलीचे त्रिफळे उडवले, तेव्हा इंग्लंडच्या धावफलकावर जेमतेम ३६ धावा झळकत होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील जो रूटने ७० चेंडूंत ४६ धावांची खेळी साकारून संघाला ३ बाद १०४ अशा सुस्थितीत नेले. परंतु ट्रेंट बोल्ट, अ‍ॅड मिलने आणि अनुभवी डॅनियल व्हेटोरीने साऊदीला चांगली साथ दिली आणि १९ धावांमध्ये इंग्लंडचे उर्वरित सात फलंदाज बाद झाले.

फक्त १८ चेंडूंत अर्धशतक
ब्रेंडन मॅक्क्युलमने विश्वचषकातील वेगवान अर्धशतकाचा विक्रम साकारताना स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. २००७मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषकात मॅक्क्युलमने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील वेगवान अर्धशतकवीरांच्या wc03पंक्तीतसुद्धा त्याने तिसऱ्या स्थानावर मजल मारली. सर्वात वेगवान अर्धशतकाचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डी’व्हिलियर्सच्या (१६ चेंडू) नावावर आहे, तर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (१७ चेंडू) दुसऱ्या स्थानावर आहे.

पराभवामुळे खचलेलो नाही. नाराजी असली तरी अजूनही आम्हाला विश्वचषकात बाद फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून ठेवलेल्या दडपणाखाली आमच्या फलंदाजांना चमक दाखविता आली नाही.
– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ३३.२ षटकांत सर्व बाद १२३ (जो रूट ४६; टिम साऊदी ७/३३) पराभूत वि. न्यूझीलंड : १२.२ षटकांत २ बाद १२५ (ब्रेंडन मॅक्क्युलम ७७; ख्रिस वोक्स २/८)
सामनावीर : टिम साऊदी.

टिम साऊदी

७/३३


मागील सात एकदिवसीय सामन्यांत ईऑन मॉर्गन चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. या डावांपैकी त्याने एकदा शतकही झळकावले आहे.

३२
विश्वचषक स्पध्रेत १९८३नंतर सुमारे ३२ वष्रे इंग्लंडकडून न्यूझीलंड संघ पराभूत झालेला नाही. इंग्लिश संघ विश्वचषकात सलग चौथ्यांदा किवी संघाकडून हरला.