कुलवंतसिंग कोहली

गणपती गावी गेले, दसरा सरला आणि दिवाळी येऊन गेलीसुद्धा! मुंबईसारख्या शहरात तसं पाहिलं तर रोजच दिवाळी आणि रोजच दसरा. लहानपणापासून मला नेहमी वाटत आलंय, की आपण पक्षी व्हावं आणि उंच आकाशात झेप घेऊन रात्रीची मुंबई पाहावी. पण ते शक्य नाही. अशा वेळी आताशा मी इंटरनेटवर जातो व रात्रीची मुंबई नभोमंडपातून कशी दिसते ते संगणकावर पाहतो. जगभरातील अनेक शहरे संगणकाच्या पडद्यावर झगमगतात. जगभरातल्या झगमगाटात आपली मुंबई मला तुलनेने शांत दिसते. उपग्रहांच्या दूरच्या दुर्बिणींतून दिसणारं मुंबईचं नयनरम्य रूप मी पाहत बसतो. माझ्या आयुष्याच्या नभोमंडपाला अनेक तारे-तारकांनी झगमगवलं. पण मुंबईसारखी दुरून दिसणारी शांती मला दिसली ती एक मोठा तारा असलेल्या माझ्या मित्रात- जीतेंद्रमध्ये! आपल्या सुकुमार रूपामुळे त्यानं नेहमीच सर्वाना मोहवलं, पण पुरस्कारांनी मात्र त्याला नेहमीच गंडवलं. ‘फर्ज’, ‘परिचय’, ‘किनारा’सारखे चित्रपट करूनही ‘त्या’ देखण्या बाहुल्यांपासून तो वंचित राहिला. तरीही तो हसत हसत काम करत राहिला. कारण त्यानं काम केले ते रूपेरी पडद्यासाठी; ‘त्या’ बाहुल्यांसाठी नाही! मग त्या बाहुल्यांनाच वाटायला लागलं, की या सज्जन माणसाकडे आपण जायला हवं. आणि त्या ‘जीवनगौरव’ रूपात त्याच्याकडे येऊ लागल्या.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

जीतेंद्र हा छान माणूस आहे. त्याचं आयुष्य म्हणजे अविरत संघर्षांची सफल दास्तान! त्याची व माझी पहिली भेट झाली ती आमच्याकडच्या एका पार्टीत. खुद्द अण्णासाहेब म्हणजे व्ही. शांताराम हे जयश्रीजी, राजू (राजश्री), तेजश्री, किरण यांच्यासमवेत आमच्याकडे जीतेंद्रला घेऊन आले होते. त्या तगडय़ा, उंचपुऱ्या, देखण्या तरुणाला पाहून आम्हाला छान वाटलं होतं. त्याला पुढे करून अण्णासाहेब म्हणाले, ‘‘कुलवंत, हा माझा नवा हिरो. ‘गीत गाया पत्थरों ने’ करतोय. त्यात राजूबरोबर तो काम करतोय. कसा वाटतो?’’ मी पटकन् म्हणालो, ‘‘अण्णासाहेब, तुमची निवड कशी चुकेल!’’ जीतेंद्र खूप बुजरा होता. पार्टीला अख्खी फिल्म इंडस्ट्री लोटली होती. सगळे अण्णासाहेबांना येऊन भेटत होते. जीतेंद्र नम्रपणे प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होता. हसत होता. तीच नम्रता आणि तेच हसतमुख रूप त्यानं अजूनही कायम राखलंय.

आपल्या मर्यादांची जाणीव असणारा कलावंत आहे तो. आपल्या मर्यादा हेच आपलं सामर्थ्य आहे, हेही त्याला निश्चित ठाऊक आहे. मला तो तेव्हा ‘सर’ म्हणाला होता. आजही कुठे भेट झाली तरी तो ‘सर’च म्हणतो.

‘गीत गाया पत्थरों ने’च्या सेटवर माझी फेरी होत असे. तिथं त्याची आणि माझी ओळख झाली. ती फारशी घट्ट मत्रीत रूपांतरित झाली नाही, पण त्या ओळखीत आस्था मात्र जरूर होती. सुरुवातीला बुजरा असणारा जीतेंद्र नंतर छान गप्पा मारायला लागला. त्याच्या मेकअप रूममध्ये आम्ही अनेकदा गप्पा मारत बसायचो. प्रारंभीच्या काळात त्याचा आवाज मोठा होता. काहीसा भसाडाही. मी एकदा अण्णासाहेबांना ही गोष्ट सांगितली. ‘‘अण्णासाब, बच्चा होनहार है, अच्छा दिखता है, लेकीन मेहनत तो खूब करनी पडेगी.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, त्याला सुधारू आपण. राजेश खन्नानं त्याला माझ्याकडे पाठवलाय. राजेशही स्ट्रगलर आहे आता. पण त्याच्या सेक्रेटरीने- गुरनामने जीतेंद्रसाठी शिफारस केलीय. सुधारेल तो. आणि मी कशाला आहे इथं? तसा मी जीतेंद्रच्या वडिलांनाही ओळखतो. आज त्याला कामाची गरज आहे. करेल तो काम. आणि मेहनतीने मोठा होईल. कुलवंत, माझं भाकीत ऐक. एक दिवस हा पोरगा राज्य करील या इंडस्ट्रीवर. याचं कारण तो नम्र आहे. उलट बोलत नाही आणि पटकन् सुधारणा करवून घेतो स्वत:त.’’

अण्णासाहेबांचं म्हणणं खरं ठरलं. जीतेंद्रला मी ‘रवीजी, जितूजी, जितू’ अशा कोणत्याही नावाने हाक मारत असे आणि तो मला ‘सर’ म्हणत असे. त्याचं खरं नाव- रवी कपूर! त्याचा जन्म अमृतसरचा. मोठं कुटुंब होतं त्याचं. अमरनाथ आणि कृष्णा कपूर यांचा तो मुलगा. वडील कसाबसा घरखर्च चालवायचे. ‘‘हम दस लोग एकही घर में रहते थे। पापांनी एकदा नक्की केलं, की आपण मुंबईत जाऊ या आणि नशीब अजमावू या. माझ्या चाचाजींसह पापा आम्हाला सगळ्यांना घेऊन मुंबईत आले..’’ जितू गप्पांच्या ओघात सांगत होता- ‘‘पापांनी कृत्रिम दागिने बनवून ते सिनेमासृष्टीत भाडय़ाने द्यायचा व्यवसाय सुरू केला. चिराबाजारजवळच्या गिरगावातील एका चाळीत आम्ही राहत होतो. तिथंच जवळ जतीनही होता (जतीन म्हणजे राजेश खन्ना). त्याची व माझी ओळख शाळेमध्ये झाली. आमची शाळा सेंट सेबेस्टिअन गोवा हायस्कूल. गिरगावात लहानाचा मोठा झालो. दहावी झाल्यावर मी सिद्धार्थ कॉलेजात गेलो. पण माझं फारसं लक्ष अभ्यासात नसायचं. मी नापास झालो नाही. पण पहिलाही कधी आलो नाही. आमची जगण्याची धावपळ सुरू होती. या धावपळीतच माझे पापाजी वारले. मी तेव्हा फक्त अठरा वर्षांचा होतो. अचानक सगळी जबाबदारी अंगावर येऊन पडली. आता करायचं काय? शिक्षण सुरू असतानाच आई म्हणाली, ‘रवी, काहीतरी हातपाय हलवायला हवेत.’ चाचाजी सोबत होतेच. ते व आई कृत्रिम दागिन्यांचा व्यवसाय कसाबसा चालवीत होते. पण त्या काळचे दिवस असले व आजच्या तुलनेत स्वस्ताई असली, तरी आमदनीही त्याच प्रमाणात होती. मुंबईत जगणं अवघड होतं. एकदा मी चाचाजींबरोबर व्ही. शांताराम यांच्या सेटवर गेलो होतो, त्यांना इमिटेशन ज्वेलरी द्यायला. तोवर मी चित्रपटाचा सेट पाहिला नव्हता, की मला अभिनयातला ‘अ’देखील माहिती नव्हता. सेटवरचं ते वेगवान जीवन, तिथली लगबग, दिव्यांचा झगमगाट, स्टार मंडळी हे सारं पाहून मी भारावून गेलो. मग मी नेहमीच सेटवर जाऊ लागलो. एक दिवस धीर करून मी चाचाजींना म्हणालो, ‘मला व्ही. शांतारामजींकडे घेऊन चला ना! मला नट व्हायचंय.’ चाचाजींनी माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं. मला म्हणाले, ‘चल, हे दागिने त्या अमक्या चित्रपटाच्या सेटवर देऊन येऊ. हिरो बनणं खूप अवघड आहे.’ मी त्यांचा पिच्छाच पुरवला आणि शेवटी काही दिवसांनी मी त्यांना मला व्ही. शांतारामजींच्या ऑफिसमध्ये घेऊन जायला भाग पाडलं.’’

अण्णासाहेबांनी त्याला आपादमस्तक पाहिलं, मान हलवली व म्हणाले, ‘‘ठीक आहे. तू येऊन तर बस. तुझे काका शिफारस करताहेत ना! आणि तुला गरजही आहे पशांची. येत जा. तुझा महिन्याचा पगार दीडशे रुपये. यायचं आणि रोज गरज असेल त्याप्रमाणे आम्ही तुला काम सांगू.’’ रवी कपूरला फिल्मी दुनियेत चंचूप्रवेश मिळाला. ‘नवरंग’, ‘सेहरा’च्या सेटवर रवी रोज जाऊन बसू लागला. ‘नवरंग’मध्ये तर त्याला संध्याजींचा डबल म्हणून काम करायला लागलं. म्हणजे काही दृश्यांत तो संध्याजींचे कपडे घालून पाठमोरा उभा राहिला. रवीच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता. म्हणतात ना ‘बेगर्स हॅव नो चॉइस!’ एक दिवस राजकमल स्टुडिओच्या एका मॅनेजरने रवीला सांगितलं, ‘‘उद्या राजकुमारच्या भूमिकेच्या एका दृश्यासाठी ऑडिशन आहे. त्यासाठी तू ये.’’ रवी रोज बसने गिरगावातून राजकमलला जायचा. त्या दिवशी तो टॅक्सीने गेला. मेकअप रूममध्ये जाऊन त्याने राजकुमारचा गेटअप केला आणि तो बाहेर सेटवर ऑडिशनसाठी आला, तेव्हा बाहेर बरेच राजकुमार तयार होऊन बसले होते. ते दहा-पंधरा सेकंदाचं एक दृश्य होतं. त्याची ऑडिशनची वेळ आली व साहेब कॅमेऱ्यासमोर एकटे असे पहिल्यांदाच गेले. ‘‘सर, मी असा घाबरलो होतो की बस्स! काही बोलताच येईना मला. बरेच रिटेक झाले. मला अर्थातच रिजेक्ट केलं गेलं. पुन्हा एकदा मी एक्स्ट्राच्या ताफ्यात जाऊन बसलो.’’

एकदा राजकमलचं शूटिंग शेडय़ुल लागलं बिकानेरला. अण्णासाहेबांची शिस्त होती, की बाहेरगावी सर्वानी रात्रीचं जेवण बरोबर आठ वाजता एकत्रच घ्यायचं. युनिटमधले सारे एकत्र बसायचे. त्यावेळी दिवसभराच्या कामाचा आढावा घेतला जाई. शूटिंग जोरात सुरू झाल्यावर एका रात्री रवीला जेवायला जायला पंधरा मिनिटे उशीर झाला. अण्णासाहेब वेळेचे पक्के. रवीसाठी सगळे जण खोळंबून राहिले होते. अण्णासाहेबांनी रवीकडे अशा नजरेनं पाहिलं, की तो लटलट कापायला लागला. ते भडकून त्याला म्हणाले, ‘‘किती वाजले माहितीय का? ही काय पद्धत आहे?’’ त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं, ‘‘उद्यापासून याला घरी पाठवा. हा इथं नको.’’ मेकअपमनला सांगितलं, ‘‘याला आता मेकअप करायचा नाही.’’ रवीला अतिशय वाईट वाटलं. उशीर झाला ही चूक होतीच; शिवाय सर्वाना थांबावं लागलं. आणि आता रोजी-रोटीही जाणार होती. ‘‘सर, क्या करू, कहाँ जाऊ और अन्नासाब को कैसे मनाऊं, ऐसा सवाल मेरे सामने था. विचार करता करता माझ्या लक्षात आलं, की कडक माणसाच्या पोटात तितकीच मायाही असते. आपण अण्णासाहेबांच्या त्या मायेला हात घालू या. वेळेचं महत्त्व मला कळलंच होतं. दुसऱ्या दिवशी शूटिंग नऊ वाजता सुरू होणार होतं. पण मी साडेसात वाजताच पूजा वगरे आटपून सेटवर हजर झालो. अण्णासाहेब आलेलेच होते. त्यांच्यापुढे मान खाली घालून उभा राहिलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांची नजर माझ्यावर पडताच कसं कोण जाणे, पण माझ्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं व ते घळाघळा वाहू लागलं. काहीही न बोलता त्यांना माझं दु:ख कळलं. ही नोकरी गेली तर घरी पंचाईत होणार होती. माझी भावंडं, आई सारे उपाशी राहणार होते. माझ्या व्याकूळ नजरेत हे सारं आलं असणार. अण्णासाहेबांनी माझी स्थिती स्वत: अनुभवली असणार. ते मला म्हणाले, ‘‘जा- मेकअप करून ये.’’ आणि माझं काम पुन्हा सुरू झालं. त्यांनी मला एक शिक्षा मात्र जरूर केली. माझा पगार दीडशे रुपयांवरून शंभर रुपये केला व म्हणाले, ‘‘तुला आता वेळेची किंमत लक्षात येईल.’’

अण्णासाहेबांनी त्यांच्या मुलीला- राजश्रीला घेऊन ‘गीत गाया पत्थरों ने’ हा चित्रपट करायचं ठरवलं. रवीची धडपड त्यांना दिसत होती. रवीचा आवाज सोडला तर त्याचं देखणेपण त्यांना भावलं होतं. बिकानेरच्या प्रसंगानंतर त्याची वेळेची शिस्त वाखाणण्यासारखी होती. तशात राजेश खन्नाने सेक्रेटरीमार्फत रवीची शिफारस केलेली होती. तोवर राजेश खन्ना मोठा अभिनेता झाला होता. आपल्या मित्रासाठी त्यानं शिफारशीचं हे पाऊल उचललं असणार. अण्णासाहेबांनी रवीला ऑडिशनसाठी बोलावलं. काही वाक्यं दिली. उद्या आपली हिरोच्या भूमिकेसाठी ऑडिशन आहे, तर आज आपण तयारी करू या, असं म्हणत रवी सरळ राजेश खन्नाला भेटला. राजेश त्याला घेऊन त्याच्या के. सी. कॉलेजमध्ये गेला. ते वाक्य कसं बोलायचं ते त्यानं के. सी. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये रवीला समजावून सांगितलं. ‘‘मैंने दो-तीन घंटे राजेश के साथ रिहर्सल की और घर वापस गया. रातभर नींद नहीं आ रही थी। कशीबशी सकाळ झाली. उठलो, भराभर आवरलं व निघालो. सेटवर पोचलो. गेटअप् झाला. मेकअप् झाला. आता ऑडिशन! सेटवर अण्णासाहेब आले होते. त्यांच्याबरोबर जयश्रीजी, हिरॉइन राजश्री, तिची बहीण तेजश्री आणि छोटा किरण असे सारे हजर होते. मला एकदम दडपण आलं. राजेशनं शिकवलेली वाक्यं मी कॅमेऱ्यासमोर विसरलो ना! माझं त त प प सुरू झालं. राजश्री मला बघितल्यावर लगेच म्हणाली, ‘अण्णा, याच्या नाकातले केस बघा किती मोठे आहेत. (हा प्रसंग नंतर जीतेंद्रने एका अ‍ॅवार्ड फंक्शनमध्येही सांगितला होता.) मी आणखीनच भांबावलो. माझे डायलॉग थांबवून अण्णासाहेबांनी लूक टेस्ट घेतली. त्या गेटअप्ला पायात शूज नको होते. अण्णासाहेब म्हणाले, ‘ते शूज काढ.’ सारा सेट माझ्याकडे पाहत होता. मी शूज काढले, तर फाटका मोजा दिसायला लागला. मी खजील झालो. अण्णासाहेब म्हणाले, ‘ठीक आहे, काही काळजी करू नकोस. हा फाटका मोजा तुझ्या आयुष्याचं वस्त्र विणेल बघ.’ अण्णासाहेबांनी मला ‘गीत गाया पत्थरों ने’मध्ये राजश्रीसमोर नायक म्हणून निवडलं व माझी वेगळी मेहनत सुरू झाली. त्यांनीच मला चित्रपटसृष्टीतलं नाव दिलं- जीतेंद्र! माझा पगार तेव्हा शंभर रुपयेच होता, पण मी नायक झालो होतो. जयश्रीजींनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. त्या माझी सर्वतोपरी काळजी घेत. राजूनं (राजश्री) किती तरी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. ती प्रस्थापित नायिका होती. मी हळूहळू हिरोपदाला रुळलो. ‘गीत गाया पत्थरों ने’चं शूटिंग लांबलं. दरम्यान, मला दुसऱ्या एका चित्रपटाची ऑफर आली.’’

रवीनं अण्णासाहेबांची परवानगी घेतली आणि त्यानं बाहेरचा पहिला चित्रपट घेतला. अर्थात अण्णासाहेबांच्या चित्रपटाची प्राथमिकता लक्षात ठेवूनच. जितू दाक्षिणात्य निर्मात्यांचा लाडका हिरो झाला तो ‘फर्ज’पासून. तो ‘गुडाचारी ११६’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. कृष्णा हा त्याचा हिरो होता. (नंतर जीतेंद्रने कृष्णाच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं. कृष्णा त्याचा जवळचा मित्र होता.) ‘फर्ज’ हा जेम्स बाँड स्टाईलचा चित्रपट होता. ‘फर्ज’ के बाद तो उसकी गाडी निकल पडी! हृषिकेश मुखर्जी व राजेश खन्नाच्या अजरामर अशा ‘आनंद’ चित्रपटाच्या सेटवर जितूची आणि गुलजारांची भेट झाली. जितू गुलजारांमुळे खूप प्रभावित झाला. त्यानं गुलजारना आपल्यासाठी चित्रपट करायला सांगितलं. त्यातून जन्माला आला – ‘परिचय’! पाठोपाठ आले ‘खुशबू’ व ‘किनारा.’ मला नेहमी वाटतं, की या तीन चित्रपटांतला जीतेंद्र किती वेगळा आहे! त्यातला जितूचा गेटअप हा बराचसा गुलजारांसारखा आहे. त्याला या चित्रपटांसाठी एखादं तरी पारितोषिक मिळायला हवं होतं. पण दुर्दैव! नाही मिळालं.

१९७४ च्या सुमारास त्याने शोभाशी लग्न केलं. ती चौदा वर्षांची असल्यापासून त्यांची मत्री होती. शोभा ‘ब्रिटिश एअरवेज’मध्ये काही वर्षे एअर होस्टेस होती. चित्रपटाच्या दुनियेत स्थिरस्थावर झालो असं वाटल्यावर जीतेंद्रने तिला लग्नाची मागणी घातली. आज ४४ वर्षे त्यांचा संसार सुखात व आनंदात सुरू आहे. त्याची दोन्ही मुलं फिल्मी दुनियेत आहेत. त्याचाही एक किस्सा आहे. जितूनं ‘दीदार-ए-यार’ नावाचा चित्रपट निर्माण केला. त्यात त्याचे हात चांगलेच पोळले. खूप कर्ज झालं. त्यातून बाहेर पडायला त्याने दक्षिणेतील खूप चित्रपट केले. त्याचवेळी व्हीडिओचं आक्रमण सुरू झालं. पायरसी सुरू झाली. जितूला एका क्षणी वाटलं, की आता चित्रपट बंद करावेत. पण एकता त्याला म्हणाली, ‘तुम्ही चित्रपट करत राहा. पण आता जमाना टीव्हीचा आहे. आपण त्या इंडस्ट्रीत उतरू या.’ आणि ‘बालाजी टेलीफिल्म्स’ची निर्मिती तिनं केली. जीतेंद्र सुरुवातीला तिच्यामागे खंबीरपणे राहिला. आज एकता भारतीय टेलिव्हिजनची अनभिषिक्त सम्राज्ञी बनलीय.

आज वयाच्या ७६ व्या वर्षी जीतेंद्र सफल आणि समाधानी आयुष्याचं गुलबकावलीचं फूल हाती घेऊन दोनशेहून अधिक यशस्वी चित्रपटांनी मढवलेल्या एका शिखरावर आनंदात बसलाय.

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर