12 August 2020

News Flash

स्वप्नं जिवंत ठेवण्यासाठीच..

नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून बुलेटवर स्वार होणं एवढीच फक्त मराठीपणाची ओळख नाही

(संग्रहित छायाचित्र)

आसाराम लोमटे

सुधारित नागरिकत्व कायदा आणि संभाव्य नागरिक नोंदणीविरोधात देशभरातले तरुण अलीकडेच प्रचंड संख्येनं रस्त्यावर आले. धुमसता असंतोष यानिमित्तानं पाहायला मिळाला. तरुण रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे; त्यामागची अस्वस्थता वेगळी आहे. स्वत:च्या भवितव्याविषयी कोणताच अंदाज न बांधता येणं आणि मिळवलेल्या शिक्षणाला जगरहाटीत कोणताच अर्थ न उरणं, हीदेखील त्या अस्वस्थतेमागची कारणं आहेत..

नऊवारी साडी नेसून आणि नाकात नथ घालून बुलेटवर स्वार होणं एवढीच फक्त मराठीपणाची ओळख नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि उभ्या-आडव्या पसरलेल्या महाराष्ट्राच्या जनजीवनातल्या आपल्या असंख्य रस-रूप-गंधासह मराठीपण सामावलेले आहे. हे जसं खरं आहे, तसंच तरुण म्हणजे केवळ सळसळत्या रक्ताचा आणि उसळत्या आवेगाचा नाही, तर त्यापलीकडेही तरुणांची असंख्य रूपं आहेत. गेले वर्षभर अशा असंख्य तरुणांचं भावविश्व या ‘स्पंदनां’मधून टिपलं गेलं. रूढ चाकोरी मोडणारे, कलेचा आविष्कार घडविणारे, राजकीय मुलखात बाजी मारणारे, स्थानिक पातळीवर कोंडी झाल्यानंतर रोजगारासाठी सैन्यभरतीपासून ते महानगरांमध्ये अवकाश शोधणारे असे सर्वच प्रकारचे तरुण आहेत. या तरुणांचे प्रश्नही आहेत, पण त्यावर उत्तरं शोधणाऱ्यांच्या धडपडीलाही इथं वर्षभर शब्दरूप मिळालं. सर्वच परिस्थिती कुंठित झाल्यासारखी आहे असं नाही, तर आपल्या या जोरकस ऊर्मीच्या बळावर अडचणींचं चक्रव्यूह भेदणारेही अनेक आहेत. गडचिरोलीपासून सांगली-कोल्हापूपर्यंत आणि कोकणापासून मराठवाडय़ातल्या बीड-परभणीपर्यंत वेगवेगळ्या भागांतल्या तरुणाईसमोरचे पेच, त्यांचा जगण्याचा संघर्ष, आव्हानं आणि काहींनी त्यावर केलेली मातसुद्धा.. असं साधारणपणे या ‘युवा स्पदनां’चं स्वरूप होतं. अगदी सुरुवातीला ‘ए भावा.. आता आपली हवा!’ अशी साद घातली होती. वर्षभर या हवेची दिशा वेगवेगळे कोन शोधणारी होती.

केवळ आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत रममाण होणं हे तरुणाईचं वैशिष्टय़ नाही. न पटणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी धिटाईनं सांगणं, त्यासाठी रस्त्यावर उतरणं, सत्तेचं अनिर्बंध स्वरूप दिसू लागल्यानंतर सत्ताधीशांच्या आसनाखाली सुरुंग पेरणं आणि व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी बेभानपणे आयुष्य उधळणं हेही तरुणाईचं अभिन्न असं वैशिष्टय़ आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि संभाव्य नागरिकत्व नोंदणीविरोधात देशभरातले तरुण अलीकडेच प्रचंड संख्येनं रस्त्यावर आले. धुमसता असंतोष यानिमित्तानं पाहायला मिळाला. तरुणांची रस्त्यावर यायला सुरुवात झालीये. त्यामागची अस्वस्थता वेगळी आहे. नागरिकत्व सिद्ध करण्याच्या कसोटीला सामोरं जावं लागेल याची धास्ती आहे. ज्यांचं नाव कोणत्याही सातबारावर नाही, ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नाही आणि आपल्या अस्तित्वाची ओळख सरकारदरबारी कोणत्याही कागदपत्रावर नाही, अशा असंख्य निराधार, वंचित-भटक्यांनी ही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लागणारी कागदपत्रं कुठून आणायची हा प्रश्न आहेच; पण स्वत:च्या भवितव्याविषयी कोणताच अंदाज न बांधता येणं आणि मिळवलेल्या शिक्षणाला जगरहाटीत कोणताच अर्थ न उरणं, यातूनही तरुणांमध्ये सध्या मोठी अस्वस्थता आहे.

तरुणाईसमोर आदर्शच नाहीत, नतमस्तक व्हावं अशा जागाच नाहीत, अशी विधानं आजही केली जातात. खरं तर यशाच्या प्रचलित व्याख्या बदलण्याची गरज आहे. आजच्या काळाची लिपी वेगळी आहे. लौकिक अर्थाने यशस्वी होणं म्हणजे केवळ कुठलीही जोखीम न स्वीकारता सुविहितपणे जगणं असंच मानलं जातं. प्रत्यक्षात आजच्या तरुणांसमोर विज्ञान-तंत्रज्ञानाचं जे जग खुलं आहे ते आधीच्या दशकात इतकं वेगवान नव्हतं. अमुक एखाद्या क्षेत्रात स्वत:ची जागा पक्की करणं आणि आयुष्यभराच्या चरितार्थाची सोय लावणं एवढीच जगण्याची रीत मानणं म्हणजे कुंपण घातल्यासारखंच आहे. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जेव्हा तरुणाईतले काही जिगरबाज चेहरे नवी क्षितिजं पादाक्रांत करू लागतात तेव्हा यशाच्या कल्पनांची ओळख नव्याने व्हायला लागते.

सोलापूर जिल्ह्य़ासारख्या अवर्षणग्रस्त भागातून आलेल्या अक्षय इंडीकर, नागनाथ खरात या तरुणांनी केलेली लघुपट-चित्रपटांची निर्मिती जगभर वाखाणली गेली. अलीकडे या क्षेत्रात स्वत:ची दिशा निश्चित करणारे हे तरुण आहेत. हे केवळ चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातलं उदाहरण झालं; पण अन्यही कला, विज्ञान-तंत्रज्ञान या बाबतीत शोध घेतला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत असे किती तरी तरुण यशाच्या नव्या वाटा धुंडाळताना दिसतील. तेव्हा यश किती वेगवेगळ्या पातळ्यांवर खुणावत असतं हे दिसून येतं व आजच्या तरुणाईची असलेली ही बाजूही आश्वासक वाटू लागते.

तरुण म्हणजे केवळ आपल्याच स्वप्नात रममाण होणारा, मोरपंखी आठवणीत आकंठ बुडालेला.. एवढंच चित्र नाही. तरुणांनी किती तरी चळवळी जन्माला घातल्या, लढय़ांचं नेतृत्व केलं आणि सरकारेही उलथवली, असं जगाचा इतिहास सांगतो. पेटलेल्या निखाऱ्यावर राख जमते. हळूहळू राखेचा थर साचत जातो. मग त्यातली आग ठार मेलेली असते. निखारा सदैव फुललेला असेल, तर त्यावर राख जमा होत नाही. तरुणाईचंही असंच आहे. प्रचंड अशा संख्येनं असलेले तरुण अगदीच निवांत, शांत राहतील असं वाटत नाही. या अस्वस्थतेमागची कारणं काळानं जन्माला घातलेल्या परिस्थितीत जरूर आहेत; पण मुख्यत्वे कारण आहे ते आर्थिक. जीवनमरणाच्या प्रश्नांचा विसर पडण्यासाठी दिला जाणारा इतिहासाचा मुलामा, प्रतीक-प्रतिमांची मांडामांड आणि भावनिक राष्ट्रप्रेमाची मात्रा सदासर्वदा लागू होईल असं नाही. कधी तरी यातली निर्थकता लक्षात येते. पोटात आग असताना रिकाम्या हातांना रंगीबेरंगी फुगे उडवायला सांगणं फार काळ चालून जाईल असंही नाही.

वेगवेगळ्या भागांत असंख्य तरुणांच्या फौजा आज आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. वर्तमान काळवंडलेलं आणि भविष्याचा तर पत्ताच नाही. अशा परिस्थितीत या ऊर्जेला विधायक वाट मिळाली नाही, तर असंख्य नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. व्यवस्थेतल्या शीर्षस्थानांना प्रश्न विचारणारा तरुणाईचा विद्रोह हा भविष्यात जागोजागी स्थानिक पातळीवरही उमटला तर त्यातून युगांतरचाच आविष्कार पाहायला मिळेल. मात्र तसा तो उमटायलाही हवा.

युवावस्था हे साधारणपणे असं वय आहे, की जिथं हिशोबी चातुर्य अंगी आलेलं नसतं, व्यवस्थेच्या सभागारात उठून प्रश्न विचारण्यापेक्षा व्यवस्थेचे लाभ पदरात पाडून घेण्याचा सराईतपणा अंगी आलेला नसतो आणि आपली जागा निश्चित करून सुरक्षित कोशात जाण्याचा मख्खपणा तर गावीही नसतो. अशा वेळी एक कवी आठवतो. उच्चारलेल्या शब्दांसाठी त्यानं प्राणाची किंमत मोजलीय. हळुवार प्रेमाची आणि अस्वस्थतेला मोकळी वाट करून देणाऱ्या क्रांतिकारी ठिणग्यांची कविता लिहिणारा कवी अवतार सिंह संधू ‘पाश’! ‘कलेचं फूल फक्त राजाच्या खिडकीत उमलणार असेल, तर मग आम्हाला देशाच्या सुरक्षेपासूनच धोका आहे,’ असं सांगणारा. ‘माझं काय कराल, मी तर गवताप्रमाणे कुठंही उगवून येईन,’ असं भीतीचा लवलेशही नसणाऱ्या तरुणाईचं अंतरंग उजागर करणारा! ‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना..’ ही त्याची कविता असंख्य ठिकाणी अधोरेखित केली जाते; पण ‘स्वप्नं सर्वानाच पडत नाहीत,’ असंही तो एका कवितेत म्हणतो.. तर अशा या तरुणाईला स्वप्नं पडावीत हाच या ‘स्पंदनां’मागचा खटाटोप होता!

aasaramlomte@gmail.com

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 12:06 am

Web Title: keep the dream alive yuva spandan abn 97
Next Stories
1 बंद दाराआड ‘ती’..
2 ‘किसान’ चिंतित, ‘जवान’ भरतीत..
3 भंगलेल्या स्वप्नांचा माग..
Just Now!
X