News Flash

भंगलेल्या स्वप्नांचा माग..

सोन्याहून अधिक मोलाचे वाटणारे यंत्रमाग आताशा भंगाराच्या भावात विकावे लागत आहेत

दयानंद लिपारे dayanand.lipare@expressindia.com

कुणी कर्जात बुडालेले, त्यापायी यंत्रमाग भंगारात विकावा लागलेले, गेल्या दशकापर्यंत पिढीजात उद्योग वाढवण्याचे स्वप्न पाहणारे तरुण मालक आता दूरच्या कारखान्यात कामगार म्हणून राबणारे.. अशी गत सध्या इचलकरंजीची झाली आहे. ‘वस्त्रनगरी’ म्हणून एकेकाळी मिरवणाऱ्या अन्य शहरांचीही अवस्था यापेक्षा निराळी नाही..

एकाच व्यवसाय-उद्योगात तीन-चार पिढय़ांनी उदरनिर्वाह केल्याची उदाहरणे बरीचशी पाहायला मिळतात. पण एकाच शहरात व एकाच व्यवसायात  पिढय़ान् पिढय़ा उद्यमशीलता जपण्याचा वसा अपवादाने आढळावा. ‘राज्याचे मँचेस्टर’ अशी बिरुदावली लागलेल्या इचलकरंजीत जवळपास प्रत्येक गल्लीत उद्योगातील पिढीजात यशकथा पाहायला मिळत. कष्टकऱ्यांची मांदियाळी येथे जमली. त्यांनी घाम गाळून छोटय़ाशा उद्योगाचे बीजारोपण केले. उभे-आडवे धागे गुंफत-गुंफत कालचा कामगार ‘कारखानदार’ बनला. घरादारात ऐश्वर्य नांदू लागले. पण हे धागे आता विरत चालले.. ‘सुखालाही भोवळ आली’ या  मंगेश पाडगावकर यांच्या काव्यपंक्तीचा वेगळ्या अर्थाने कटू अनुभव वस्त्रनगरीला गेल्या पाच-सहा वर्षांत येतो आहे. पिढय़ान् पिढय़ांनी चालवलेले यंत्रमागाचे विश्व भग्न पावल्याचे दु:ख पचवताना तरुण उद्योजक पुरता उद्ध्वस्त झाला आहे.

मंदीसह नानाविध कारणांनी कालपर्यंत लक्ष्मीची पावले ठरलेल्या यंत्रमाग उद्योगाची अधिकाधिक दुर्दशा होते आहे. सोन्याहून अधिक मोलाचे वाटणारे यंत्रमाग आताशा भंगाराच्या भावात विकावे लागत आहेत. हे दु:ख ललाटी ल्यालेले हजारो तरुण उद्यमी अश्वत्थाम्याप्रमाणे भग्न स्वप्नांची भळभळती जखम घेऊन फिरत आहेत. कालचे मालक आज मजूर, कामगार बनले आहेत. ते कसेबसे दिवस काढत आहेत. ही दुर्दशा जशी इचलकरंजीची तशीच ती सोलापूर, भिवंडी, मालेगाव, विटा, पेठ-वडगावसह यंत्रमाग उद्योग वसलेल्या हरेक विकेंद्रित छोटय़ा-मोठय़ा नगरीचीही आहे. मागील पिढय़ांनी कमावले. त्यात भर घालण्याचे उत्तरदायित्व आजच्या शिकल्यासवरलेल्या पिढीचे. पण झाले मात्र विपरीत. उद्योगाचा पसारा वाढवत राहणे राहिले बाजूला, उलट आहेत ते यंत्रमाग विकून वित्तीय संस्थांचे कर्ज-व्याज फेडण्यात सारी शक्ती क्षीण झाली आहे. इतके करूनही उर्वरित कर्जाचा डोंगर छाती दडपून टाकतो आहे. परिणामी अनेक जण परागंदा झाले. काहींनी गावाला कायमचा रामराम ठोकत परगावी चहाची गाडी सुरू केली वा फिरते विक्रेते म्हणून काम सुरू केले. शहराच्या एका टोकाला राहणारा, आता-आतापर्यंत ‘मालक’ म्हणून मिरवणारा शहराच्या दुसऱ्या टोकावरील एखादा कारखाना शोधून बारा-बारा तासांच्या पाळीत ‘कामगार’ म्हणून स्वत:ला कोंडून घेत आहे. लोकलज्जेचे भय वाटते म्हणून बंद कारखान्यातून बाहेर पडण्याचेही टाळणारे अनेक आहेत. या ‘कालच्या मालकां’पैकी कोणी चपराशी, कोणी चालक, कोणी घरगडी.. अशी कामे करून गुजराण करत आहेत. त्यांच्या सहचारिणी.. कालच्या ‘मालकीणबाई’ पदराआड तोंड लपवत थोरामोठय़ांच्या घरी धुणीभांडी करत आहेत.

इचलकरंजीच्या उद्यमशीलतेची कथाच मोठी वेधक. इथले अधिपती श्रीमंत नारायणराव घोरपडे (यांचे मूळ पूर्वज कोकणातील नारो महादेव जोशी. या जोशींनी स्वामीनिष्ठा म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या आडनावाचा स्वीकार केला.) नारायणराव घोरपडे यांना सांस्कृतिक क्षेत्राची मोठी आवड. या आवडीच्या जोडीला त्यांनी आपल्या जहागिरीमध्ये उद्योग सुरू करावा असे लोकमान्य टिळकांनी सुचवले. त्यानुसार घोरपडे सरकारांच्या मदतीने विठ्ठलराव दातार यांनी १९०४ साली पहिला यंत्रमाग सुरू केला तो ‘व्यंकटेश रंगतंतू मिल’मध्ये. सरकारांची राजकृपा लाभत असल्याने दूरदूरच्या वस्त्र व्यवसायातील कारागिरांची पावले या नगरीकडे वळू लागली. त्यात पारंपरिक वस्त्र विणणाऱ्या साळी-कोष्टी समाजाची संख्या अधिक. मराठी, कन्नड, तेलुगु अशी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या विणकरांनी मूळ गावाचा बिस्तरा हलवून इचलकरंजीला आपले गाव म्हणून पसंती दिली. यंत्रमागाच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी घोरपडे सरकारांनी ‘इचलकरंजी अर्बन को-ऑप. बँक’ सुरू केली. पुढे वित्तसाहाय्य करणाऱ्या अनेक बँकांचा उदय झाला. वस्त्रनगरी फुलू लागली. फुलता-फुलता तिने आपल्या ग्रामस्थांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरण्यास सुरुवात केली.

वस्त्रोद्योगाचा वटवृक्ष वाढताना, कामगारांच्या कष्टामुळे त्याच्या शाखाशाखांवर ‘कारखानदारां’चे फळ डवरून आले. हातमाग-यंत्रमागावर काही वर्षे काम करता करता व्यवसाय कसा करायचा याचा धडा गिरवायला मिळाला. या अनुभवाच्या जोरावर सुरुवातीला दोन माग भाडेतत्त्वावर चालवायला घ्यायचे. घरातील अवघे कुटुंब (आई, वडील, भाऊ, पत्नी, वहिनी, मुले) असे साऱ्यांचे हात वस्त्रनिर्मितीत गुंतले जात. काही वर्षांतच स्वत:चे दोन माग विकत आणले जात. अनुभव, कष्ट, बाजारपेठेची साथ याचे समीकरण आपोआप जुळत जाई आणि इकडे दोन, चार, आठ, सोळा, बत्तीस या पटीत यंत्रमागाचे विश्व बहरू लागे. एका पिढीकडून रोवलेल्या रोपटय़ाला पुढची पिढी खतपाणी घालून यशाचा नवा आयाम देत असे. तीनेक लाख लोकवस्तीच्या इचलकरंजीत अशा यशकथा किती होत्या? अक्षरश: हजारो!

या यशाला गेल्या दोन दशकांत ओहोटी लागली. त्यातच मंदी नामक रोगाने पार जर्जर केले आणि तीन-चार पिढय़ांनी कमावलेली धनदौलत अपयशाच्या दरीत पार बुडाली आहे. जागतिक बाजारपेठेला सामोरे जाण्याचा काळ १९९२ साली सुरू झाला. त्यानंतर ते दशक संपताना (१९९८) यंत्रमाग व्यवसायात मोठी मंदी आली होती. तीवर मात करून इथला यंत्रमागधारक सावरला. उलट, २००४ साली शासनाच्या वस्त्र-धोरणाचा लाभ घेऊन काही लाख रुपयांना मिळणाऱ्या अत्याधुनिक मागाचा स्वीकार येथील अनेकांनी केला. एकाच वेळी साधे व दुसरीकडे अत्याधुनिक (शटललेस) असा समांतर यशाचा प्रवास सुरू झाला. ‘सारे धागे सुखाचे’ बनले असताना अचानक यंत्रमाग उद्योगाची वीण विस्कटली. काही कळायच्या आत होत्याचे नव्हते होऊ  लागले. अभूतपूर्व मंदी, जागतिक बाजारपेठ, अन्य राज्यांची स्पर्धा, शासनाचा सहकार्यास आखडता हात, नेतृत्वाची ढिलाई, राजकीय फोडणी.. अशा अनेकानेक कारणांचा परिपाक म्हणून यंत्रमाग उद्योगाचे ऱ्हासपर्व सुरू झाले. वर्षांनुवर्षे, दशकानुदशके व्यवसायाची चक्रे धीराने, पण धिटाईने हाकणारा उद्यमी पार हतबल झाला आहे.

खरे तर उद्योगाची सूत्रे तरुण पिढीकडे आलेली. पहिली पिढी निरक्षर. दुसरी कामापुरती शिकलेली. तिसरी पिढी नोकरीची गरजच काय म्हणून जुजबी शिक्षण घेऊन वस्त्रवीण अधिक घट्ट करणारी. आताची पिढी मात्र उच्चशिक्षित, त्यापैकी अनेकांनी वस्त्रोद्योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण- पदवी, पदविका प्राप्त केलेली. पण या तरुणाईला धंद्याचे गणितच कळेनासे झाले. कशीही व्यावसायिक बेरीज जमली तरी हाती तोटय़ाची वजाबाकीच येत राहिली. सलग पाच-सहा वर्षे ‘उण्याकडून उण्याकडे’ उतरतीचा अखंड प्रवास सुरू झाला. तोटय़ाचे अर्थकारण चालवायचे तरी किती? त्याला मुळी सीमा उरलीच नाही. सरतेशेवटी उद्योगाचा शकट चालवणाऱ्या तरुण पिढीला छातीवर दगड ठेवून यंत्रमाग विकण्याचा कटू निर्णय घ्यावा लागतो आहे. बरे, माग विकून कर्जाच्या विळख्यातून मोकळे व्हावे असे वाटले तरी परिस्थितीसुद्धा तशी पूरक असावी लागतेच ना? सारेच विकणारे; म्हटल्यावर खरेदी करणारे तरी कोण? याला अंती पर्याय एकच : यंत्रमाग भंगारात विकणे!

ज्या यंत्रमागाने घरदार फुलवले, मानसन्मान मिळवून दिला. तेच यंत्रमाग लोखंडाच्या भावात विकावे लागले. फुले वेचली तेथे गोवऱ्याही शिल्लक राहिल्या नाहीत. लाखमोलाच्या मागाला कसेबसे काही हजार रुपये मिळू लागले. बँकांचे कर्ज पूर्णपणे भागवणे अशक्य झाले. या धक्क्याने उद्यमी तरुण पिढी खचली आहे. यंत्रमागधारक, कारखानदार, मालक.. नामक मानाचे पान उन्मळून पडले. केवळ यंत्रमाग नव्हे, राहता बंगला, अन्यत्र असणाऱ्या जमिनी-मालमत्ता विकण्यावाचून पर्यायच राहिला नाही. पूर्वजांच्या पुण्याईचे संचित गमवावे लागल्याने अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. काहींनी गळफास लावून जीवनाचा अंत केला. बरेच जण तोंड लपवून आला दिवस ढकलत आहेत. ‘शंभर धागे दु:खाचे’ कधी संपणार, या विवंचनेत विकेंद्रित यंत्रमाग केंद्रातील- शहरातील तरुण पिढी अस्वस्थतेने ग्रासली आहे. सजग उद्योजकांनी, जागरूक राजकीय नेतृत्वाने आणि या शहर-उद्योगाविषयी आस्था असणाऱ्या संबंधितांनी याचा जर साकल्याने विचार केला, नियोजनबद्ध पावले टाकली तर कदाचित आगामी काळात ‘अच्छे दिन’ येऊ  शकतील. प्रत्येक वेळी सरकारकडेच आशाळभूतपणे न पाहता आत्मनिर्भर होण्याचे स्वप्नच तर या पिढीने पाहिले होते.. त्या भंगलेल्या स्वप्नाचा माग पुन्हा घेण्यासाठी अनेक जण सज्ज होतील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 2:49 am

Web Title: textile industry in ichalkaranji textiles business in ichalkaranji recession in textile industry zws 70
Next Stories
1 मुंबईतलं ‘शेतकरी स्पिरीट’!
2 अपना टाइम आएगा!
3 अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!
Just Now!
X