भलामोठा विस्तार आणि तेवढय़ाच मोठय़ा संख्येने वास्तू हे अंतूर किल्ल्याचे वैशिष्टय़. महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांची धूळदाण  पाहताना अंतूरचे हे दुर्गवैभव पाहून आश्चर्यचकित व्हायला होते
महाराष्ट्रात अजस्त्ररीत्या पसरलेल्या सह्याद्रीच्या अभेद्य डोंगररांगांना कोंदण लाभलंय ते अप्रतिम अशा गिरीदुर्गाचं! पण ह्याच महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांची दुरवस्था मात्र मन विषण्ण करणारी आहे. हे सारे पाहात असतानाच वाळवंटात अचानक पाण्याचा साठा सापडावा किंवा भाजून काढणाऱ्या वैशाखवणव्यात थंड वाऱ्याचा झोत सुखावून जावा तसं काहीसं एखादा सुस्थितीतील किल्ला पाहिला की होतं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड गावाजवळचा अंतूर किल्ला सुद्धा ह्याच पठडीत मोडणारा!
अंतूर किल्ल्याला भेट देण्यासाठी मुंबईकर गिर्यारोहकांना नाशिकहून चाळीसगाव-नागद-सायगव्हाण-नागापूर-अंतूर असे यावे लागते. याशिवाय नाशिक-येवला-औरंगाबाद-कन्नड-गौताळा अभयारण्य-नागापूर-खोलापूर-अंतूर हा बऱ्यापकी चांगल्या अवस्थेतील रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे, तर पुण्यातील गिर्यारोहकांना पुण्याहून नगरमाग्रे औरंगाबाद गाठून पुढे कन्नड-गौताळा अभयारण्य-नागापूर-खोलापूर-अंतूर किल्ला असा मार्ग उपलब्ध आहे. नागापूर फाटय़ापासून अंतूर किल्ला ६ किलोमीटरवर असून ह्या फाटय़ाला वनविभागाने दिशादर्शक पाटी लावली आहे. या फाटय़ाहून आत वळालो की, वनविभागाने खोलापूर ह्या छोटय़ाश्या वस्तीच्या जवळून अंतूर किल्ल्याकडे नेणारा कच्चा रस्ता तयार केला आहे. पावसाळा सोडून जीप व मिनीबस सारखी वाहने इथून सहज जाऊ शकतात. या रस्त्याने जाताना वाटेत एक मारुतीची मूर्ती दिसते. याच्याजवळ एक दगडी स्तंभ असून त्याच्या चारही बाजूंना फार्सी लिपीमध्ये अंतूर किल्ल्याच्या जवळच्या शहरांबद्दल माहिती दिलेली आहे. अंतूर हा महाराष्ट्रातील असा एक किल्ला आहे की जो नागापूर-खोलापूर ह्या रस्त्याने गेल्यास भुईकोट प्रकारात मोडतो तर नागद-बेलखेडा-गोपेवाडी ह्या रस्त्याने गेल्यास अंतूरचा माथा गाठण्यासाठी तब्बल अडीच तासांची चढाई करावी लागते.
अंतूर किल्ल्याचं वैशिष्टय म्हणजे आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत किल्ल्याचं दर्शन आपल्याला होत नाही. या स्तंभापासून आपण पुढे गेलो की, रंगभूमीवरचा पडदा वर जावा त्याप्रमाणे समोरचं दृश्य खुलं होतं आणि अथांग सागरातून एखादं प्रचंड जहाज वर यावं तसा गर्द जंगलाने वेढलेला अंतूर किल्ला आपल्याला दिसतो. अंतूर किल्ल्याचं हे पहिलंच दर्शन त्याच्या प्रेमात पाडणारं! वनविभागाने अतिशय रसिकता दाखवत ह्या ठिकाणी एक ‘व्ह्य़ू पॉइंट’ उभारलेला असून तिथे एक सिमेंटचा ‘पॅगोडा’ उभारलेला आहे. तिथे उभं राहून अंतूरचं हे देखणं रूप बघण्यासारखं दुसरं सुख नाही. इथून पुढे अंतूर किल्ल्याची पायवाट जिथे सुरू होते तिथेही वनविभागाने आणखी एक ‘पॅगोडा’ उभारला आहे. जेवणासाठी आणि प्रसंगी मुक्कामासाठी ही कमालीची सुंदर जागा आहे. या ठिकाणाहून वनखात्याने तयार केलेली फरसबंदी पायवाट सुरू होते. या वाटेच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्यात आलं आहे.
किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार येण्याच्या आधी डावीकडे पहारेकऱ्यांची खोली म्हणजेच देवडी आहे. ह्या देवडीपासून पुढे गेल्यावर नजरेला अक्षरश: खिळवून ठेवणारं अंतूरचं भव्य प्रवेशद्वार समोर येतं. आजही भक्कम स्थितीत असलेल्या ह्या प्रवेशद्वाराला तीन कमानी असून वरच्या बाजूला शरभ शिल्प आहेत. त्यातील डावीकडील शिल्प गायब झाले असून आणि उजव्या चौकटीतील शिल्प तुटले आहे. अंतूर किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून पायऱ्यांच्या वाटेने डावीकडे वळलो की, किल्ल्याचा दुसरा भक्कम दरवाजा समोर येतो. दुसऱ्या दरवाज्यातून पुढे आल्यावर वळून पाहिल्यास त्याच्या कमानीवर दोन कमलपुष्पे कोरलेली दिसतात, तर दरवाज्याच्या चारही बाजूस तोफगोळे लावलेले आहेत.  
या दरवाज्याच्या उजवीकडे एक झरोका ठेवला आहे. पहिल्या दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यात येणारा मार्ग हा ह्याच झरोक्याच्या खालून येत असल्याने शत्रूवर गरम तेल टाकण्यासाठी हा झरोका वापरत असावेत. अंतूरच्या ह्या दुसऱ्या दरवाज्यातून पुढे आलो की, समोरच आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने बांधलेला तिसरा दरवाजा दिसतो. यावर फार्सी लिपीतील शिलालेख आहे. आतमध्ये प्रशस्त देवडी दिसते. ट्रेकर्सना मुक्कामासाठी ही चांगली जागा आहे. येथून दोन वाटा फुटतात. उजवीकडच्या वाटेने आपण तटबंदीवर येतो. खणखणीत बुरुज आहेत. या वाटेवरच एक कोठार दिसते. आत वटवाघळांची मोठी वस्ती.
या किल्ल्याने विस्मयचकित करणाऱ्या अनेक वास्तू जपल्या आहेत. त्यातील एक म्हणजे अंतूर किल्ल्यावरील प्रचंड आकाराचा बांधीव तलाव. गडावर प्रवेश केल्यावर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा तलावच दिसतो. ह्या तलावाच्या काठावर एक दगडी पात्र ठेवण्यात आलं आहे. शेजारीच ही एक घुमटाकार वास्तू असून त्याच्या आत काहीच बांधकाम नाही. अंतूर किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून त्याच्या माथ्यावर तटबंदी, मशीद, तळघर, धान्यकोठारं, भक्कम अशी तटबंदी, बांधकामाची जोती आणि पश्चिमेकडे भरपूर पाण्याची टाकी असून ह्यात काही खांबटाकी देखील आहेत. हे सारे पाहिल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. जो किल्ल्याच्या उर्वरित भागात उतरतो. या दरवाज्यातून बाहेर उतरले, की भक्कम बांधणीचा बुरुज दिसतो. अंतूर किल्ल्याच्या माथ्यावरील सर्वात प्रेक्षणीय वास्तू म्हणजे हा तीन दरवाजा. ह्या बाजूच्या पठारावर मधोमध एक सुटी तटबंदी उभारलेली असून त्यात भक्कम असे तीन दरवाजे तयार करण्यात आले आहेत. या दरवाज्याने अंतूर किल्ल्याचा आपण उभा असलेला भाग वेगळा केल्यासारखा वाटतो. इथे तटाच्या समोरही वडाचं एक प्रचंड मोठं झाड आहे. या दरवाज्याच्या समोरच राजमहालाची वास्तू असून सध्या त्यात पीराचे स्थान आहे. इथे आपली अंतूर किल्ल्याची फेरी पूर्ण होते. अंतूर किल्ल्यावरची प्रत्येक वास्तू अतिशय प्रेक्षणीय असून खरं तर किल्ल्यावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहिता येईल इतका भव्य विस्तार ह्या किल्ल्याचा आहे. त्यामुळे अंतूर किल्ला व्यवस्थित बघण्यासाठी हातात किमान दोन ते तीन तास असणे गरजेचे आहे.