पाण्यात खडे टाकताच तरंग उमटावेत, तसं हृदयेंद्रच्या शब्दशंकांनी अनेकांच्या मनात विचारतरंग उमटले..
प्रज्ञा – खरंच, काय अर्थ असेल मग? हृदय खरंच आपण अभंगाखालचा अर्थ वाचतो आणि तोच पूर्ण खरा आहे, असं मानून पुढचा अभंग वाचतो.. त्या अर्थावर विचार करत नाही की मूळ अभंगही परत परत वाचत नाही..
हृदयेंद्र – पण मी काय म्हणतो? मूळ अर्थ पूर्ण खरा नाही किंवा पूर्ण चुकीचा आहे, असं नव्हे.. आजवर काय अर्थ लावला गेला, याचा तो दस्तावेज आहे.. तोही महत्त्वाचा आणि तितकाच उपयुक्त आहे.. कारण त्याच्याच आधारावर पुढे जाता येत असतं..
ज्ञानेंद्र – मग तुला काय अर्थ जाणवतो?
योगेंद्र – हृदू, अचलदादांच्या सहवासामुळे म्हणा किंवा सूक्ष्म चिंतनाच्या तुझ्या उपजत सवयीमुळे म्हणा, तू अभंगाकडे खूप वेगळ्या कोनातून पाहात विचार करतोस.. मला त्याचं कौतुकही वाटतं..
हृदयेंद्र – सद्गुरूंच्या चिंतनानं आणि त्यांच्याच कृपेनं काही प्रमाणात ते साधतं, असं मला वाटतं.. पण मला जाणवलेला अर्थच खरा असेल, असा माझा दावा नसतो..
कर्मेद्र – तुम्हा लोकांना चर्चेआधीच्या चर्चेतच किती आनंद वाटतो, हे पाहून मला तर कंटाळाच येतो.. ‘आनंदाचे डोही’सारख्या गोड अभंगावरही तुम्ही रूक्ष चर्चेचं इतकं गुऱ्हाळ लावाल की उसातला रस निघून निघून त्याचं जसं चिपाड होतं ना तसा अर्थ काढून काढून तुम्ही पुढचे एक-दोन तास मला पिळून पिळून नीरस करणार आहात..
योगेंद्र – ओहो! कम्र्या किती मोठ्ठा डायलॉग!! तोही अगदी सुसूत्र.. आमच्या सहवासाचा काहीच उपयोग झाला नाही, असं नाही म्हणायचं तर! (सगळ्यांबरोबरच कर्मूही हसतो आणि म्हणतो, ‘‘करा सुरू.. आनंदाची सुतकी चर्चा!’’)
हृदयेंद्र – काही का असेना, कर्मू प्रत्येक अभंगाला एक मुद्दा असतो आणि या अभंगाचा मुद्दा ‘आनंद’ हा आहे, हे तू बरोबर ओळखलंस.. बरं असो.. तर मुद्दा असा की प्रत्येक अभंग एक सूत्र सांगतो आणि म्हणूनच तो सूत्रबद्ध असतोच.. ते सूत्र लक्षात घेऊन अभंगाचा क्रम नीट लक्षात घ्यावा लागतो..
ज्ञानेंद्र – आता अभंगाचा क्रम म्हणजे?
हृदयेंद्र – म्हणजे, चरणांचा क्रम.. नीट लक्षात घ्या.. एक, दोन, तीन, चार असे चरण या अभंगाचे आहेत.. पण त्याच क्रमानं ते पाहण्याची काही सक्ती नाही!
कर्मेद्र – अरे पण अभंग लिहिणारे त्याचा क्रम उगाचच वेगळा लावतील का? त्यांनी जो क्रम दिलाय त्याचप्रमाणे अर्थ लाव की..
हृदयेंद्र – म्हणूनच नीट लक्ष द्या.. चित्रपटात नाही का, फ्लॅशबॅक असतो! म्हणजे आजचा प्रसंग दिसतो आणि मग फ्लॅशबॅकने त्या प्रसंगाचं मूळ शोधता येतं.. तसा हा अभंग फ्लॅशबॅकचा आहे!
सिद्धी – म्हणजे?
हृदयेंद्र – (हसत) आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।। तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।। हा अनुभव अभंगाचा प्रारंभबिंदू आहे! आणि गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। हा फ्लॅशबॅक आहे!!
योगेंद्र – (विचारात पडून..) म्हणजे पहिला आणि चौथा चरण प्रथम, मग तिसरा चरण आणि मग दुसरा चरण.. असा तुझा क्रम आहे..
हृदयेंद्र – असा माझा क्रम नाही, तर या क्रमानं अभंगाचा अर्थ नीट कळतो, असा माझा अनुभव आहे.. कारण हा अभंगही एक अनुभवच सांगतो.. अगदी राहवत नाही, म्हणून हा अनुभव सांगतोय, असंही तुकाराम महाराज म्हणतात.. हा अनुभव माझ्यात कुणीतरी ठसा ओतावा, तसा ओतलाय, असंही सांगतात.. कसला आहे हा अनुभव? तर आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।। हा!! हा आनंदानुभव आहे.. आणि तो ओतला कुणी? तर केवळ सद्गुरूनं! आता जाणवतं, श्रीरामकृष्ण परमहंस यांचं पुस्तकही उगाच हाती आलं नाही आणि त्याची म्हणजे त्या सद्गुरुची कृपा झाल्यासच याच जीवनात निरवच्छिन्न आनंद लाभणं शक्य आहे, हे त्यांचं मार्गदर्शनही उगाच लाभलं नाही!!
ल्ल चैतन्य प्रेम