24 September 2017

News Flash

ब्रिक्सची वीट

ब्रिक्स परिषदेत दहशतवादासाठी पाकिस्तानचा उल्लेख झाला

लोकसत्ता टीम | Updated: September 7, 2017 3:20 AM

ब्रिक्स परिषदेत दहशतवादासाठी पाकिस्तानचा उल्लेख झाला; पण स्वतंत्र मानांकन-संस्थेची मागणी मागे पडली..

परस्परांशी मतभेद असणाऱ्या दोनही गटांना अंतिमत: आपलीच सरशी झाली असे वाटावयास लावणे म्हणजे मुत्सद्देगिरी. भारत आणि चीन यांच्या संदर्भात ती डोकलाम प्रकरणात प्रकर्षाने दिसून आली. कारण या मुद्दय़ावर गेले दोन महिने भूतान आणि चीनच्या सीमेवरील डोकलामच्या परिसरात सुरू असलेली खडाखडी अचानक गेल्या आठवडय़ात संपली. त्या वेळी हा भारताचा मोठा राजनैतिक विजय असल्याचा डांगोरा सत्ताधारी पक्षाने पिटला. ते साहजिक. तरी जे काही झाले त्याबाबत भारताने विजय साजरा करण्याची घाई करू नये असे आम्ही ‘एक पाऊल मागे, पण..’ या संपादकीयात (२९ ऑगस्ट २०१७) म्हटले होते. ते किती योग्य होते याचाच प्रत्यय गेल्या आठवडय़ातील घटनांतून आला. कारण भारताने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर काही तासांत चीनने आपल्या डोकलामसंदर्भातील धोरणात काहीही बदल झालेला नसल्याचे जाहीर केले. मग तेथे काय घडले? डोकलाममधून चीन जरी माघार घेत असल्याचे दाखवत असला तरी त्याचा संबंध भारतापेक्षा चीन यजमान असलेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेशी आहे, असे आम्ही त्या संपादकीयात नमूद केले होते. ते शब्दश: खरे झाले. याचे कारण आपण डोकलाममधून माघार घेत आहोत हे चीनने सपशेल नाकारले असून ज्या प्रकल्पामुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला होता त्या महामार्ग प्रकल्पाचे काम थांबवणार नसल्याचेही त्या देशाने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ आपल्याला जो राजनैतिक विजय वाटत होता तो मुळात अजिबात विजय नाही. ज्याला घरी बोलवावयाचे आहे त्याचा अपमान करू नये हे यजमानाचे साधे तत्त्व चीनने पाळले इतकेच. कारण ते पाळले नसते तर भारतीय पंतप्रधानास ब्रिक्स परिषदेत सहभागी होणे अवघड गेले असते. हा झाला एक भाग.

आणि दुसरा घडला तो ब्रिक्स परिषदेत. या परिषदेत पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी जोडण्यास यजमान देश आणि रशिया यांनी आपली अनुमती दिली. हादेखील आपल्यासाठी मोठा विजय असल्याचा गवगवा सत्ताधारी भाटांकडून केला जात असून त्यानिमित्ताने वस्तुस्थिती तपासायला हवी. राजनैतिक संबंधांत कोणत्याही ठरावावरील एकमतासाठी देवाणघेवाण करावी लागते. जेथे दोन वा अधिक देशांचा संबंध असतो तेथे प्रत्येक देशानेच काही देवाणघेवाण केल्याखेरीज एकमत होत नाही. म्हणजेच कोणत्याही एकाच देशाच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत. तेव्हा भारत/चीन संबंधांत कोणास कशावर पाणी सोडावे लागले याचे समीकरण मांडल्याखेरीज हरल्याजिंकण्याच्या बाता मारता येणार नाहीत. या संदर्भात लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण. त्यात त्यांनी भारत हा पाकिस्तानच्या अस्वस्थ बलुचिस्तानातील फुटीर चळवळींना उत्तेजन देत असल्याचे उघड विधान केले होते. त्यावर बराच विवाद झाला. जी गोष्ट गुप्तपणे केली जात होती ती अशी चव्हाटय़ावर आणून भारताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला, असेही बोलले गेले. भारताच्या या विधानावर रशिया आणि चीन या दोन देशांनी नापसंती व्यक्त केली होती. त्याचा परिणाम गतसाली गोव्यात भरलेल्या ब्रिक्स परिषदेत दिसून आला. त्या परिषदेत भारताच्या पाकिस्तानविषयक भूमिकेस चीन आणि रशिया यांनी भीक घातली नाही. याचे कारण पाकिस्तानात या दोन देशांचे असलेले हितसंबंध. त्यातही चीनची थेट बलुचिस्तानातच गुंतवणूक असून भारताच्या या भूमिकेस त्या देशाकडून त्यामुळे पाठिंबा मिळणे केवळ अशक्य होते. या वास्तवाचा परिणाम पंतप्रधानांच्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनीच्या भाषणात दिसून आला. नरेंद्र मोदी यांनी या भाषणात यंदा बलुचिस्तान असा साधा उल्लेखदेखील केला नाही. पाठिंब्याची भाषा राहिली दूर. या प्रश्नावर भारताची भूमिका मवाळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्यानंतरच ब्रिक्स परिषदेत दहशतवादासाठी पाकिस्तानचा उल्लेख झाला. तेव्हा कोणी काय सोडले आणि कशाच्या बदल्यात कोणास काय मिळाले याचा हिशेब करण्याचे भान आपल्याला असायला हवे. ते नसल्यामुळे उगाच केवळ पाकिस्तानचा उल्लेख झाला म्हणून विजयोत्सव साजरा करण्याचे कारण नाही. तसा तो कधी करता आला असता? जर आपली एक महत्त्वाची मागणी चीनने मान्य केली असती तर.

ती आहे ब्रिक्स देशांची स्वतंत्र मानांकन- म्हणजे रेटिंग- यंत्रणा विकसित करण्याची. जगात सध्या स्टँडर्ड अ‍ॅण्ड पुअर म्हणजे एसअ‍ॅण्डपी, फिच किंवा मूडीज याच संस्था मानांकनाच्या क्षेत्रात मान्यवर मानल्या जातात. या संस्थांकडून कोणत्या देशाचे मानांकन कसे केले जाते यावर अनेक गुंतवणूकदार निर्णय घेतात. गेले काही महिने भारत सरकार या तीनही मानांकन कंपन्यांवर नाराज आहे आणि आपण ती नाराजी विविध मार्गानी बोलूनही दाखवलेली आहे. आपला प्रश्न आहे तो चीनच्या तुलनेत भारतास दिल्या जाणाऱ्या मानांकन दर्जाचा. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर या तीनही कंपन्या भारतास चीनच्या तुलनेत कमी दर्जा देतात. इतकेच नाही तर आपल्या या संदर्भातील आक्षेपांनाही दाद देत नाहीत. भारतात सुरू असलेल्या विविध आर्थिक सुधारणांची दखल या मानांकन कंपन्या घेत नाहीत असे आपले म्हणणे तर या कथित सुधारणांचा परिणाम अजूनही तळापर्यंत झिरपलेला नाही, सबब परिस्थितीत काही फार मोठा बदल झालेला नाही, असे त्यावर या मानांकन कंपन्यांचे प्रत्युत्तर. भारतात जे काय झालेले नाही वा व्हायला हवे याबाबत या कंपन्या ठाम असून त्यामुळे आपल्या मानांकन दर्जाबाबतच्या तक्रारींची त्या दखलही घेत नाहीत. त्यामुळे भारताने या कंपन्यांवर तिसऱ्या जगाविरोधी असल्याचा शिक्का मारावयास सुरुवात केली. त्याचाच पुढचा भाग म्हणून ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांनी स्वतंत्र मानांकन यंत्रणा उभारावी अशी भारताची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली जवळपास दोन वर्षे ही कल्पना ब्रिक्स देश संघटनेच्या गळी उतरवू पाहत आहेत. याही ब्रिक्स परिषदेत त्यांनी हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु चीन आणि रशिया हे देश बधले नाहीत. या दोन्ही देशांनी असे काही करण्याचे टाळले. तेव्हा पाकिस्तानचा उल्लेख दहशतवादासंदर्भात करण्याचे मान्य केले हा मुद्दा जर विजय म्हणावयाचा असेल तर स्वतंत्र मानांकन यंत्रणा निर्मितीस नकार, हा पराभव मानावयास हवा.

परंतु हे दोन्ही करण्याची गरज नाही. याचे कारण परराष्ट्र संबंधांचा हिशेब हा दीर्घकालीन असतो. त्याचा जमाखर्च भांडवली बाजारातील सेन्सेक्सप्रमाणे करावयाचा नसतो, हे यामागील साधे तत्त्व. म्हणजे मोदी सत्ताधीश झाले आणि त्यांच्या प्रेमापोटी वा व्यक्तिमत्त्वामुळे चीनचे मत आणि मनपरिवर्तन झाले, असे कधी होत नाही. झालेच तर ते फक्त भक्तांच्या दरबारांतच होते. तेव्हा राजनैतिक संबंधांकडे आपण विजय, पराजय, सरशी, माघार आदी शब्दसाच्यांचे चष्मे बाजूला ठेवून पाहावयास हवे. कारण तसे न करणे प्रौढत्वाचा अभाव अधोरेखित करणारे असते. कोणत्याही एकाच आंतरराष्ट्रीय परिषदेत सहसा कोणताही नव्या धोरणांचा इमला बांधून उभा राहत नाही. एकेक वीट तेवढी चढवली जाते. ब्रिक्सच्या चीन परिषदेतही तेच आणि तेवढेच झाले आहे. उगाच आत्मप्रतारणा करण्याचे कारण नाही.

First Published on September 7, 2017 3:20 am

Web Title: brics summit 2017 highlights narendra modi
 1. S
  sareswathi devi
  Sep 9, 2017 at 12:46 am
  "म्हणजे मोदी सत्ताधीश झाले आणि त्यांच्या प्रेमापोटी वा व्यक्तिमत्त्वामुळे चीनचे मत आणि मनपरिवर्तन झाले, असे कधी होत नाही. झालेच तर ते फक्त भक्तांच्या दरबारांतच होते ". हे विधान बरोबर नाही. संपादकाने neutral राहून लेख लिहिला पाहिजे.
  Reply
  1. H
   Hemant Purushottam
   Sep 7, 2017 at 11:19 pm
   लोकसत्ता संपादकियाच्या विरोधात वाचकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया वगळण्याकरिता खाशी व्यवस्था करून झाल्यावर, विरोधी प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांच्या नावाने शंख करण्याकरिता रोजंदारीवरचे बाजारबुणगे उभे करूनही आजच्या प्रतिक्रिया गिरीष कुबेरांच्या कथीत बुध्दीमत्तेची लक्तर वेशीवर टांगणाऱ्या आहेत. कोडगी व्यक्तीच मोहाच्या पदाला घट्ट चिकटु शकते.
   Reply
   1. M
    Manoj Dongare Patil
    Sep 7, 2017 at 8:55 pm
    आदरणीय कुबेर सर, आपण उगीच ओढाताण करून संपादकीय लिहिल्यासारखे व्हायला लागले आहे...मोदींनी दरवर्षी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तान चा उल्लेख करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? तसे असेल तर कठीण आहे..दर वेळी भक्त भक्त म्हणून भाजप समर्थकांना हिणवणे आपल्यासारख्या संपादकाला शोभत नाही..आज काल तुमचे संपादकीय जरा जास्तच एकांगी व्हायला लागले आहेत...जनतेची आणि सरकारची अर्थ समज काढून दर वेळी हिणवून अर्थशास्त्र ची मक्तेदारी आपणाकडे आहे असे वाटून घेऊ नका...नोटबंदी सारख्या विषयावर तर तुम्ही तुमच्या मताचे टोक गाठले आहे...सरकारात बसणाऱ्या सर्वांना तुम्ही फार वेड्यात काढत आहात आणि अगदीच बावळट समजत आहात..ते योग्य नव्हे ... आणखी आपणास काय सांगावे..?
    Reply
    1. S
     shalva
     Sep 7, 2017 at 7:24 pm
     जी गोष्ट गुप्तपणे केली जात होती ती अशी चव्हाटय़ावर आणून भारताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला, असेही बोलले गेले. भारताच्या या विधानावर रशिया आणि चीन या दोन देशांनी नापसंती व्यक्त केली होती. त्याचा परिणाम गत गोव्यात भरलेल्या ब्रिक्स परिषदेत दिसून आला. त्या परिषदेत ""भारताच्या "" पाकिस्तानविषयक भूमिकेस चीन आणि रशिया यांनी ""भीक ""घातली नाही. - संपादक नेमके कुठच्या देशाचे आहेत, एकदा सांगूनच टाका . स्वतःच्या देशाबद्दल असले शब्द वापरणे योग्य नाही.
     Reply
     1. R
      Rakesh
      Sep 7, 2017 at 6:05 pm
      वृद्ध लंकेश यांच्या निघृण हत्त्येच्या बातमीवर श्रीराम यांची प्रतिक्रिया आणि त्याला माझे उत्तर. एकदा रक्ताची चटक लागली की मग जनावराला फक्त रक्त हवे असते मग ते कोणाचे का असेना. प्रतिक्रिया "ह्या बाईविरुद्ध बदनामीचा आरोप सिद्ध होऊन तिला कैदेची शिक्षा झाली होती आणि जामीन घेऊन ही बाई बाहेर होती ही माहिती दडवली का जात आहे ?" माझे उत्तर एका भारतीय वयस्कर स्त्रीचा निघृण खून झाला, याचे या श्रीरामाला काहीच वाटत नाही. नरभक्षक जनावराला पण यांनी मागे टाकले आहे. यांच्यासारखे खुनाचे समर्थन करणारे आणि प्रत्यक्ष खून करणारे याना आता मानवी रक्ताची चटक लागली आहे. सध्या वृद्ध व्यक्तींवर घाला घातला जात आहे. तसेच झुंडीने यांनी लोकांचे लचके तोडलेच आहेत. प्रतिक्रिया १८:04 वाजता.
      Reply
      1. S
       Somnath
       Sep 7, 2017 at 4:27 pm
       हा घ्या कुजकट संपादक तुमच्याच पेपरच्या नंतर दिलेल्या बातमीचा पुरावा. होय, आमच्या देशात दहशतवादी संघटना सक्रीय पाकिस्तानची प्रथमच कबुली--पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विधान.ब्रिक्स परिषदेत दहशतवादी संघटनांच्या यादीचे जाहीर वाचन करण्यात आल्याचा परिणाम पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाला आहे.थोबाड फुटेपर्यंत वाचक आपली प्रतिक्रिया देतात तरी कुबेर राष्ट्रप्रेम,वाचकांचे प्रेम विसरून डुप्लिकेट गांधी घराण्याच्या प्रेमापोटी गहाण टाकलेली पत्रकारिता करून लेखणी खरडीत असतात
       Reply
       1. R
        Rajesh
        Sep 7, 2017 at 3:42 pm
        अग्रलेखा पेक्षा कंमेंट्स जास्त वाचनीय आहेत . नेहमीप्रमाणे.
        Reply
        1. रांका
         Sep 7, 2017 at 3:38 pm
         ा वाटते अशा निरुपद्रवी लेखा कडे दुर्लक्ष केले तर काय होईल ? कशाला प्रतिवाद करायचा? ना यांचे विचार मोदी पर्यंत पोहचणार ना आपल्या प्रतिक्रिया. वांझ विचार काय कामाचे ? योग्य वेळी आपण मोदींना मत देऊच की. मोदी विरोधी एकांगी लिहिल्याने मोदींचाच फायदा होतोय हे आज पर्यंत अनुभवास आले आहे. उलट आपण प्रतिक्रिया देऊन अडाणी संपादकांचे महत्व का वाढवावे ? तरी सर्वाना विनंती की आज पासून दुर्लक्ष करा ...अगदी संपादकीय वाचलं नाही तरी काही बिघडत नाही !!!
         Reply
         1. R
          Rakesh
          Sep 7, 2017 at 2:12 pm
          "याचे कारण आपण डोकलाममधून माघार घेत आहोत हे चीनने सपशेल नाकारले असून ज्या प्रकल्पामुळे भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाला होता त्या महामार्ग प्रकल्पाचे काम थांबवणार नसल्याचेही त्या देशाने स्पष्ट केले आहे." उर्मिला ताई हे वाक्य मराठीमध्येच लिहिले आहे.
          Reply
          1. S
           Shriram Bapat
           Sep 7, 2017 at 1:52 pm
           खरे आहे. भारताने 'विवेक' दाखवावा आणि 'प्रपोगेनडा' करू नये. १९६२ नेहेरुजींनी चीनची एवढी धूळधाण केली. चीनने त्याचा एवढा धसका घेतला की भारतावर २०१४ पर्यंत नेहरू घराण्याची सत्ता होती तोपर्यंत सीमेवर साधे खुसपट काढण्याचे धैर्य चीनला झाले नाही. त्यानंतर मोदी आल्यावर चीन पुन्हा सीमावाद उकरून काढू लागला. काल एका वाहिनीतर्फे पत्रकारांचा १०० फूट लांबीचा 'मेणबत्ती मोर्चा' लंकेश खुनाचा निषेध करण्यासाठी निघाला होता. कोणी खरे म्हणून पत्रकार 'सुमारांसकट' सर्व थोर्थोर संपादकांचे 'चिमणे बोल' प्रसारित करत होते. त्यात दाढी कोठे दिसली नाही. कदाचित ती विटा ढासळत आहेत की रचल्या जात आहेत याबद्धल लिहीत असेल. नाहीतरी असल्या रस्त्यावरच्या संपादकांच्या पातळीला दाढी उतरू शकत नाही. आणि अशा प्रकारे 'प्रपोगेनडा' करणे तिला आवडत नाही. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी दाढीचे अग्रलेख वाचून लाखोंनी त्यावर पसंतीचे ब्लॉग लिहून पाठवत असतात. (कोणी म्हणते दाढीच ते ज्युनियर पत्रकारांकडून लिहून घेते). असा सॉलिड बेस असल्यावर 'प्रपोगेनडा' करण्याची गरजच काय ?
           Reply
           1. J
            jai
            Sep 7, 2017 at 1:50 pm
            भरघोस मतांनी निवडून दिलेल्या नेत्या ला आपण किती सांगू शकता..लोकांनी निवडला आहे म्हणूनच एखादी व्यक्ती नेता होते कमीत कमी BJP मध्ये काही अंशी तर हे खरे आहे.बळेबळे फक्त एका ठराविक परिवार चे जोडे उचलणारे आणि त्यांची भक्ती करणाऱ्यांचे दिवस आता दूर आहेत. लेख मध्ये टीका जरूर करा पण त्या बरोबर उपाय पण सांगा आणि तटस्थ भूमिका मांडा..
            Reply
            1. V
             Vinayak
             Sep 7, 2017 at 1:49 pm
             अगदीच उथळ आणि पाणचट लेख!
             Reply
             1. A
              abhishek dabli
              Sep 7, 2017 at 1:06 pm
              अतिशय सुमार लेख (अग्रलेख म्हणत नाही कारण त्याची बौद्धिक पातळी मुळात वेगळीच असते). मोदींचं एकवेळ सोडून द्या. डोकलाम मध्ये भारताच्या परंपरागत मुत्सद्देगिरीचा विजय झालाच आहे. मुळात तो प्रांत विवादित. विवाद आहे ान आणि चीन मध्ये. ान चे रक्षण आणि स्वतः च्या सामरिक हितांसाठी भारताने आधी सैन्य ताकत आणि नंतर मुत्सद्देगिरी यांचा सुरेख मेळ घातला. मुद्दा रस्ते बांधणीचा होता. चीन चा तो प्रयत्न अयशस्वी झाला तो फक्त भारतामुळे. लेख लिहिताना थोडा अभ्यास करा आणि आसपास काय सुरु आहे याचे भान राखा.
              Reply
              1. M
               Mahesh
               Sep 7, 2017 at 12:38 pm
               इतका जळकुकडेपणा बरा नव्हे कुबेरजी आणि हा काय अग्रलेख झाला का कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडता लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा जाहीर उल्लेख करणे किंवा न करणे याचा पाकिस्तान मधल्या आतंकी संघटनांचा ब्रिक्स च्या जाहीरनाम्यात उल्लेख होण्याचा काय संबंध आणि डॉकलाम बद्दल तुम्ही तद्दन खोटे बोलताय थोडं NDTV सोडून भारताबाहेरील न्युज चॅनेल्स पण पाहत चला त्यात वस्तुस्थिती सांगितली जातेय कि चीनने आपले सैन्य माघारी घेतलेत आणि तिथलं काम पण थांबवलंय, आपल्या देशाला जर जागतिक पातळीवर महत्वाचे स्थान मिळत असेल तर तुम्हाला पोटदुखी होण्याचे काय कारण ?
               Reply
               1. G
                Ganeshprasad Deshpande
                Sep 7, 2017 at 11:39 am
                तुमचा मूळ मुद्दा चुकीचा नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण तत्व किंवा नैतिकतेवर नव्हे तर देवाणघेवाणीवर चालते हे अगदी सत्य आहे. दुसरे सत्य हेही आहे की इथे यशस्वी होणे हीच अंतिम कसोटी आहे. जो जीता वहीं सिकंदर हाच इथला नियम आहे. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची बाजू न्यायाची ठरते आणि अणुबॉम्बचा वापरही क्षम्य ठरतो. पण म्हणून मोदी सरकारला दरवेळी इतकेही खोचून बोलण्याची गरज नाही. चीनने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आपण रस्त्याचे बांधकाम सध्यापुरते' थांबवले असल्याचे सांगितले आहे. चीनच्या अहंकाराला लागलेली ठेच त्याला ही सारी पश्चात बडबड करायला लावते आहे. ती हसून सोडून द्यायला हरकत नाही. आशियात भारताची विश्वासार्हता डोकलाम प्रकरणामुळे वाढली हे मान्य करायला काय हरकत आहे?
                Reply
                1. U
                 umesh
                 Sep 7, 2017 at 11:38 am
                 मोदींचा प्रत्येक दौरा म्हणजे संपादकांना एक संधी असते मोदीद्वेषाची गरळ ओकून टाकण्याची. ब्रिक्स बैठकीने पुन्हा त्यांना हि संधी दिली त्याबद्दल मोदींचे अभिनंदन. संपादकांचे आजचे संपादकीय म्हणजे पुन्हा काँग्रेसच्या तिसऱ्या दर्जाच्या नेत्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. या पेक्षा संपादक काँग्रेसचे पत्रक योग्य ते श्रेय देऊन प्रसिद्ध का करत नाहीत? किती सोपे होऊन जाईल म्हणजे वाचकही अग्रलेख ना वाचता कचऱ्यात टाकून देतील हल्ली तो वाचल्यावर टाकून द्यावा लागतो लोकसत्ताने स्वतःचे एक परराष्ट्र व्यवहार खाते सल्ला केंद्र सुरु करावे म्हणजे स्वराज आणि मोदींना भरपूर पगार देऊन परराष्ट्र खाते सांभाळावे लागणार नाही प्रत्येक जागतिक घडामोडीवर आणि फडतूस कसलाही अभ्यास नसलेले आणि अतिसामान्य दर्जाचे संपादकीय लिहिलेच्च पाहिजे असा नियम लोकसत्ताच्या नोकरीच्या शर्तीमध्ये आहे कि काय कोण जाणे? या संपादकीयातून अभ्यासपूर्ण आणि विचारांना खाद्य पुरवणारे असे काहीही नाही संपादकांनी आपल्याच इंडियन एक्सप्रेस या भावंडांचे अग्रलेख भाषांतर करून छापले तरी उत्तम होईल. त्यांचे अग्रलेख किती सुंदर आणि विचारपरिप्लुत असतात
                 Reply
                 1. M
                  manish
                  Sep 7, 2017 at 11:03 am
                  This is due to North Korea. China has to pay attention to that region more than Doklam, it will be back after that
                  Reply
                  1. V
                   vivek
                   Sep 7, 2017 at 10:49 am
                   खूप काही केल्याचा प्रपोगेनडा आणि त्याचा प्रचार यातच धन्यता मानणे हेच मुख्य धोरण झालय. आर्थिक धोरणे तर सपेशल अपयशी ठरली आहेत विविध अहवाल तेच सांगत आहेत.
                   Reply
                   1. B
                    bhakti
                    Sep 7, 2017 at 10:32 am
                    "तेव्हा राजनैतिक संबंधांकडे आपण विजय, पराजय, सरशी, माघार आदी शब्दसाच्यांचे चष्मे बाजूला ठेवून पाहावयास हवे. कारण तसे न करणे प्रौढत्वाचा अभाव अधोरेखित करणारे असते." आपण हि आपल्या लेखणीने प्रौढत्वाचा अभाव ठाई ठाई दाखवून देत आहात... नाहीतर तुम्हाला आजचा लेख(अग्र?? ) लिहून जय पराजय दाखवून देण्याची काहीच जरूर नव्हती... अगदी साधे आणि सोपे तत्त्वआहे कुबेरजी.. विवेचन वेगळे आणि टीका वेगळी. पहिल्या परिच्छेदात बरीच आत्मस्तुती झाली असं नाही का वाटत?
                    Reply
                    1. S
                     SG Mali
                     Sep 7, 2017 at 10:25 am
                     आपण ज्याप्रमाणे लिहिता त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत असतात असा जो आपला अट्टहास आहे तो कौतुकस्पदच आहे कारण आपला अतरराष्टीय पातळीवरची प्रत्येक बाब शब्द:शा खरी ठरते हे आपणाशिवाय कोणी म्हणण्याचे धाडस करूच शकत नाही. ( अमेरिकेच्या निवडणुका हिलरी जिंकणार असे आपण म्हणाला होता तो पण खरा ठरला कारण ट्रंप यांचा विजय हा नैतीक नव्हताच मुळी!) यावरून एकाच सिद्ध होते ते म्हणजे आपल्या विद्वट्तेला पर्याय नाही. अग्रलेखतील बुद्धीभ्रम करणारी भाषा किंवा कोलान्ट्या म्हणा, किंवा आपल्या लिखानाशी मत नसणर्याविषयी शेलके हलक्या पातळीवरचे शब्द वापरण्याची कला इ.इ.बघितल्यास याची साक्ष वाचकाना नक्कीच पटेल. वास्तवीक दुकानदाराना गिर्हाईक देवसारखे असते तद्वत वाचक हे वर्तमानपत्राचे देव नाहीत पण वाचकाचा आश्रय महत्वाचा . पण आपल्या लेखी वाचक म्हणजे आपले हलके लिखाण वाचणारी गुलाम जमात कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण सर्वद्न्य विद्वान.
                     Reply
                     1. K
                      Kamlakar
                      Sep 7, 2017 at 10:10 am
                      मोदीजी सबूरीनेच ग्यावेलागेल कारण बाजवां राष्ट्र चीन रशिया पाकिस्तान ला पोशशित आहेत . वेळकाढू पणा. करावा लागेल
                      Reply
                      1. Load More Comments