व्होडाफोन आणि आयडिया यांचे एकत्र येणे हे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला नवे वळण देणारे ठरेल.. अशा संकराची भारतीय बाजारपेठेस गरज होती. ग्राहकांना मोफत वा अतिस्वस्त सेवेची प्रलोभने दाखवल्याने दूरसंचार क्षेत्राचा आडवा विस्तार होतो आहे, पण दरडोई महसूल मात्र वाढत नाही. अशा वेळी महसूलपात सहन करण्यापेक्षा  स्पर्धेस एकत्रितपणे तोंड देण्याचा मार्ग या दोन कंपन्यांनी निवडला आहे..

भारतीय बाजारपेठेतील व्होडाफोन आणि आयडिया या दोन दूरसंचार कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय ही या क्षेत्रासाठीची उत्तम घटना म्हणायला हवी. दूरसंचार क्षेत्राचा आपल्याकडचा लौकिक अभिमान बाळगावा असा नाही. या क्षेत्रातील ज्या कंपन्यांची सरकारदरबारी ऊठबस होती/आहे, त्यांचे नेहमीच भले झाले. याचे कारण या क्षेत्राच्या हाताळणीत सरकारी पातळीवर आपल्याकडे पारदर्शकता नाही. याचा दोष अर्थातच व्यवसायांकडे नसून भारतातील छद्मभांडवलशाही व्यवस्थेत आहे. परिणामी अशा सरकार नियंत्रित क्षेत्रातील कंपन्या भ्रष्टाचार, नियमभंग, नियमवळसे, आकडय़ांचे फुगे आदी अनेक डाग अंगावर वागवतच आपापला व्यवसाय विस्तार करीत दुनिया मुठ्ठी में घेण्याचा प्रयत्न करीत असतात आणि सरकार आपल्या परीने त्यांना मदत करीत असते. पेट्रोलियम, दूरसंचार, कोळसा आदी खाणउद्योग ही याची काही उदाहरणे. या सर्वच क्षेत्रांत मोठय़ा झालेल्या कंपन्या या नियमनाधारित व्यवसायासाठी ओळखल्या जात नाहीत. किंबहुना नियमभंगाची वा नियमाला वळसे घालण्याची सोय वा स्वत:ला हवे तसे नियम करवून घेण्याची क्षमता यावर या क्षेत्रातील उद्योगांचे लहान-मोठे होणे अवलंबून असते. कोणतेही सरकार आले तरी या व्यवस्थेचे छद्मपण संपवण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे सरकारी मर्जीतील काही उद्योग वारेमाप मोठे होतात. या अशा मोठय़ा झालेल्या उद्योगांना आवरणे हे नियमाधारित व्यवसाय करू पाहणाऱ्यांना शक्य होत नाही. अशा वेळी एकमेकांत हातमिळवणी करून स्पर्धेस तोंड देणे इतकाच पर्याय त्यांना उरतो. व्होडाफोन आणि आयडिया यांनी तोच निवडला. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या संकरातून जन्माला आलेली नवीन कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरेल.

Transaction of more than 1000 crore shares of Vodafone Idea a private sector telecom company
व्होडा-आयडियाच्या उलाढालीचा विक्रम; १,००० कोटी समभागांचे व्यवहार
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध

या अशा संकराची भारतीय बाजारपेठेस गरज होती. याचे कारण मुदलात पेट्रोलियम क्षेत्रातील अमाप नफ्याच्या आधारे दूरसंचार क्षेत्रात आलेल्या ताज्या दमाच्या जिओ कंपनीने सुरू केलेले दरयुद्ध. जिओ ही अंबानींची कंपनी. तेव्हा भारतीय बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे काही ज्या कोणत्या मार्गाने करावे लागते त्याचे उपजतच ज्ञान आणि ते करण्याची क्षमता या कंपनीच्या ठायी आहे, याचे आश्चर्य नाही. अंबानी परंपरा वागवत जन्माला आलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनीदेखील दूरसंचार क्षेत्रात आहे. भाजपचे तत्कालीन मुत्सद्दी कै. प्रमोद महाजन यांचा कृपाप्रसाद या कंपनीस जन्मप्रसंगी कसा लाभला याच्या मनोरंजक कथा आजही भारतीय राजकारणात चवीने चघळल्या जातात. सुखराम, प्रमोद महाजन, ए राजा अशा अनेक आदरणीयांनी दूरसंचाराचा गुंता सोयीस्कर वाढवण्यात कसा आपापला हातभार लावला, हा भारतीय छद्मभांडवलशाहीचा ताजा इतिहास आहे. यामुळे अचानक काही कंपन्यांचे भाग्य फळफळले आणि काही कंपन्यांना सरकारप्रेरित विरोधी वाऱ्यांना तोंड द्यावे लागले. असा विरोध सहन करणाऱ्यांतील आघाडीची कंपनी म्हणजे व्होडाफोन. या मूळच्या ब्रिटिश कंपनीस पाश्चात्त्य जगातील नियमाधारित व्यवस्थेतील व्यवसायाची सवय. खेळ सुरू झाल्यावर मध्येच नियम बदलणाऱ्या भारतीय व्यवस्थेशी तिचा तितका परिचय नसावा असे या कंपनीस भारतात जे काही भोगावे लागले त्यावरून दिसून येते. या कंपनीच्या मालकी वादाचा प्रश्न चिघळला, प्रचलित नियमांच्या आधारे व्होडाफोनच्या भारतीय प्रवर्तकांनी केलेली गुंतवणूक विरोधी वाऱ्यात सापडली आणि पुढे तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी तर या कंपनीसमोर भलतीच अडचण निर्माण केली. या कंपनीने नवीन कर पूर्वलक्ष्यी प्रभावाने द्यावा असा फतवा मुखर्जी यांनी काढला होता. हे भयंकरच. याचे कारण करवाढ आदी तरतुदी या पूर्वलक्ष्यी प्रभावाने करावयाच्या नसतात हा साधा संकेत मनमोहन सिंग सरकारने त्या वेळी पाळला नाही. साहजिकच प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने त्या वेळी व्होडाफोनची बाजू उचलून धरली. परंतु तरीही सरकारने करवसुलीचा धोशा सोडला नाही. यात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतरदेखील काहीही फरक पडला नाही, ही बाब उल्लेखनीय. मोदी यांनी आपल्या परदेश दौऱ्यात पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणी होणार नाही असे आश्वासन दिले, व्होडाफोन विषय संपल्याचे भाष्य केले. परंतु प्रश्न होता तेथेच राहिला. कदाचित परदेशी असल्यामुळे करआकारणीची मागणी कशी मिटवायची याचे पडद्यामागचे कौशल्य नसल्यामुळे असेल, पण व्होडाफोनचा वाद बराच काळ चिघळला.

त्यात आता दूरसंचाराच्या या क्षेत्रात झालेला जिओचा प्रवेश. पेट्रोलियममधून आलेला बक्कळ पैसा जिओच्या मुळाशी असून त्यामुळे मोफत सेवा आदी प्रलोभने ग्राहकांना दाखवणे जिओस शक्य झाले. ही अशी कृत्रिम स्वस्ताई करून ग्राहकांना आकर्षित करणे धोकादायक असते. याचे कारण सेवेसाठी शुल्क मोजण्याची मानसिकता ग्राहकांत विकसित होत नाही आणि त्याच वेळी कंपन्या मात्र महसूलपात सहन करीत बसतात. परिणामी अशा क्षेत्राचा नुसता आडवा विस्तार होतो पण वाढ होत नाही. भारतीय दूरसंचार क्षेत्राचे हे असे झाले आहे. या कंपन्यांनी वाढण्याच्या, बाजारपेठा पादाक्रांत करण्याच्या नादात अतिस्वस्तदरांत आपापल्या सेवा दिल्या. त्यातून त्यांना ग्राहक मिळाला. परंतु दरडोई महसूल मात्र वाढू शकला नाही. अशा वातावरणात भांडवलाची मजबूत पाठराखण नसणाऱ्या कंपन्या नामशेष होतात वा आर्थिक संकटात सापडतात. आपल्याकडे तसेच होण्याचा धोका होता. व्होडाफोन आणि आयडियाच्या हातमिळवणीने तो टळेल. याचे कारण या दोघांतून तयार होणाऱ्या या नवसंकरित कंपनीकडे तब्बल ३९ कोटी इतके प्रचंड ग्राहकबळ असेल आणि ती देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरेल. आतापर्यंत या स्थानी मित्तल यांची एअरटेल कंपनी विराजमान होती. एअरटेलकडे २६ कोटी ग्राहक आहेत. अवघ्या काही महिन्यांपूर्वी बाजारात आलेल्या जिओने ७ कोटी ग्राहक मिळवले असून मोफत, अतिस्वस्त अशा प्रलोभनांमुळे या कंपनीची सेवा झपाटय़ाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. वास्तवात ते दिसते तसे नाही. याचे कारण जिओच्या खास अंबानी शैलीतील प्रलोभनांमुळे प्रत्यक्षात दूरसंचार बाजारपेठ विस्तारली. याचा अर्थ अन्य कंपन्यांची सेवा वापरणाऱ्या अनेकांनी इतक्या स्वस्तात वा मोफत आहे तर घेऊ या आणखी एक फोन असा विचार करीत जिओस जवळ केले. याचा अर्थ या ग्राहकांनी ते वापरत होते त्या कंपनी सेवेचा त्याग केला असे झाले नाही. परंतु भविष्यात तसे होण्याचा धोका मात्र होता. मोबाइल फोनच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच शिरणाऱ्या ग्राहकाने मोफत वा अतिस्वस्त सेवेच्या आश्वासनास भुलून अन्य कंपन्यांकडे पाठ फिरवण्याचे संकट वास्तव होते.

व्होडाफोन आणि आयडिया यांच्या संकराने ते टळू शकेल. या दोन्हीही कंपन्यांना परस्परांच्या दूरसंचार सेवासुविधा, म्हणजे मोबाइल टॉवर्स आदी वापरता येतीलच. परंतु बाजारपेठ विस्तारासाठी आणि दरयुद्धात टिकाव धरून राहण्यासाठी एकमेकांचे भांडवलदेखील वापरता येईल. यातील दुसरा घटक अत्यंत महत्त्वाचा. कारण बाजारपेठेत मुसंडी मारणाऱ्या जिओच्या पाठीशी जितका भांडवलसंचय आहे तितका तो अन्य कंपन्यांना उपलब्ध नाही. एकत्र आल्याने या दोन कंपन्यांना तो मिळेल. तसेच यामुळे एअरसेल, आरकॉम आणि टाटा अशा अन्य छोटय़ा कंपन्यांनाही एकत्र येण्याची प्रेरणा मिळेल. आपल्या प्रतिस्पध्र्यास कसे भिडावे याचे मार्गदर्शन करताना समर्थ रामदासांनी ‘‘ठकासी व्हावे ठक’’ असे म्हणत ‘‘लौंदासी आणून भिडवावा, दुसरा लौंद’’ असा सल्ला दिला आहे. व्होडाफोन आयडिया यांचा संकर हा असा दुसरा लौंद ठरू शकेल.