परदेशी ‘जीपीएस’चीच सवय झालेल्या भारतीयांना ‘इस्रो’च्या प्रणाली प्रगत आहेत, याची खात्री कदाचित पटणारही नाही..
आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष ठिकाणच्या चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत. या प्रयोग/चाचण्या यशस्वी झाल्या तर नक्कीच आपण अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्यांना तोंड देण्यास सक्षम होऊ शकू. पण घरची कोंबडी ही डाळीसारखीच या वृत्तीमुळे कोणतीही समस्या उभी ठाकली की आपले तोंड परदेशांकडे वळते..
आपल्या देशात काय होते यापेक्षा परदेशात काय झाले आणि तेथून आपल्यासाठी जी सुविधा आली तीच योग्य अशी मानसिकता असलेल्यांसाठी कदाचित भारतात आणि भारतीयांसाठी इस्रो या भारतीय अंतराळ संस्थेने बनवलेली ‘ग्लोबल पोझिशनिंग प्रणाली’ (जीपीएस) गुरुवारी पूर्णत्वाला गेली ही बातमी महत्त्वाची वाटणार नाही. आपल्या देशातील अनेकांना तर इस्रोने केलेल्या अशा अनेक कामगिऱ्या म्हणजे केवळ वैज्ञानिकांची वैज्ञानिकांसाठीची विज्ञानक्रीडा वाटते. याचे कारण मूलभूत विज्ञानाच्या महत्त्वाबद्दलचे अपार अज्ञान. मूलभूत विज्ञानापेक्षा उपयोजित विज्ञानाचाच उदोउदो करण्याची एक अज्ञानजन्य संस्कृती आजच्या ‘वापरा आणि फेकून द्या’च्या काळात फोफावली आहे. इस्रोच्या कामगिरीवर सातत्याने टीका करीत असलेल्यांचा पंथ या मानसिकतेचा. मात्र मूलभूत विज्ञान हीच तंत्राची जन्मदात्री असते. वस्तुत: हे सामान्यज्ञान झाले. ते कोणास सांगण्याचीही आवश्यकता भासू नये. पण तरीही ते सांगावे लागते, ही भारतातील वैज्ञानिक परंपरेची शोकांतिकाच म्हणावी लागेल. इस्रोच्या माध्यमातून जी संशोधने होतात, जे प्रयोग केले जातात, त्यांतून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लाभल्या आहेत, हे विसरता कामा नये. याचे एक उदाहरण म्हणजे दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) उपग्रह. जगातील तमाम अंतराळ संशोधन संस्थांच्या तोडीस तोड, कदाचित काही बाबतीत मागेच टाकणारी दूरसंवेदन प्रणाली भारतीय अंतराळ संस्थेने शोधून काढली आहे. आता या प्रणालीचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा संबंध काय? तर तिच्यामुळेच हवामानाचा अंदाज, समुद्री वादळे येथपासून भूगर्भात कोणत्या भागात सर्वाधिक खनिजे असतील किंवा समुद्रात कोणत्या भागात जास्त मासे मिळतील असा तपशीलही मिळणे शक्य झाले आहे. व्यावसायिक पातळीवर इस्रोकडून हे काम गेली दोन दशके सुरू आहे, परंतु सामान्यांच्या लेखी त्याची कोठेच नोंद नसते. इस्रोच्या ‘भुवन’ या नकाशा प्रणालीतून एखादे छायाचित्र प्रसिद्ध झाले तर ते ‘गुगल अर्थ’चेच आहे असे वाटणाऱ्यांची संख्या कमी नाही. कारण बहुधा भुवन हे नाव अगदीच देशी वाटते! हेच ‘भाग्य’ ‘नाविक’च्या वाटय़ालाही आल्याचे दिसते.
‘नाविक’ म्हणजे गुरुवारी भारतीय अंतराळ संस्थेने अंतराळात सोडलेला उपग्रह. त्यातून इस्रोने ‘इंडियन रीजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम-१जी’ अंतराळात सोडली आणि स्वदेशी जीपीएस प्रणाली स्वयंपूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या उपग्रहाचे नामकरण ‘नाविक’ असे केले. ही जीपीएस प्रणाली केवळ अमेरिका, चीन, युरोप आणि रशिया यांच्याकडेच उपलब्ध होती. आज त्या यादीत भारताचेही नाव कोरले गेले आहे. भारताची स्वत:ची अशी प्रणाली असणे ही बाब केवळ आपल्या छातीची कक्षाच रुंदावणारी नसून, त्याचा संबंध थेट संरक्षण क्षेत्राशी आणि अर्थकारणाशीही आहे. आज जगभरात जीपीएस क्षेत्रात अमेरिकेची मक्तेदारी आहे. त्यासाठी अमेरिकेचे ३३ उपग्रह कार्यरत आहेत आणि ती सुविधा व्यावसायिकरीत्या अमेरिका जगास पुरविते. पण त्यातही मेख अशी, की अमेरिकेने तिची अचूकता कमी ठेवली आहे. आज ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून मिळणाऱ्या ठिकाणाची अचूकता असते ती २० ते ३० मीटरच्या परिघातील. याहून जास्त अचूकता कोणताही देश देत नाही. आपल्या संरक्षण यंत्रणांना सक्षम करण्यासाठी याच अधिक अचूकतेची गरज होती. ती गरज आता इस्रोच्या या प्रकल्पातून पूर्ण होऊ शकणार आहे. जीपीएस प्रणाली असलेल्या या देशांना प्रणाली सक्षम करण्यासाठी तब्बल २० उपग्रहांची मदत घ्यावी लागते. तीच गरज आपण सात उपग्रहांच्या माध्यमातून भागवली आहे आणि या संपूूर्ण प्रकल्पाचा खर्च केवळ १४२० कोटी इतकाच आला आहे. इतर देशांच्या खर्चाच्या तुलनेत तो फारच कमी आहे. आता इस्रोसमोर आव्हान असणार आहे, ते याचा व्यावसायिक वापर करून त्यातून उत्पन्न मिळवण्याचे.
आपण जेव्हा मोबाइल फोनची खरेदी करतो तेव्हा त्यात काही परवान्यांचे पैसेही भरत असतो. जीपीएस प्रणालीचा परवाना हा त्याचाच भाग. त्याचे जे पैसे असतात ते थेट अमेरिकेला पोहोचतात. कारण अमेरिकेची मक्तेदारी. हेच आता भारतीय अंतराळ संस्थेने केले तर जीपीएस परवाना शुल्क कमी होईल आणि पर्यायाने मोबाइलच्या किमतीही कमी होऊ शकतील. पण यातून गुगल अर्थसारखी अचूकता मिळेल का? तर त्याचे उत्तरही होकारार्थी आहे. कारण आपली ‘भुवन’ ही नकाशा प्रणाली ‘गुगल अर्थ’पेक्षा जास्त अचूक आहे. यामध्ये आपल्याला २० मीटपर्यंतची अचूकता मिळते. संरक्षण यंत्रणांसाठी तर ती याहीपेक्षा अधिक असेल. जीपीएस प्रणालीवर काम करणाऱ्यांनाही या ‘भुवन’चा उपयोग होऊ लागला आहे. त्यातील माहिती खूप जास्त आणि अचूक तर आहेच, पण ती राज्यनिहाय आहे. भुवन आणि नाविक या दोन्ही प्रणाली जेव्हा एकत्र काम करू लागतील तेव्हा आपण स्वदेशी ‘नेव्हिगेशन’चा वापर करू शकू. पण सरकारी अनास्था म्हणा किंवा वापरकर्त्यांला गुगलची सवय असल्यामुळे म्हणा भुवन हे फार लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. जे सीडॅकच्या भारत ऑपरेटिंग प्रणालीबाबत झाले, तेच भुवनबाबत. २००६ मध्ये सीडॅकने विकसित केलेली ही प्रणाली भारतीय संगणकांपासून कित्येक मैल दूर आहे. सरकारी यंत्रणांनी जरी या स्वदेशी यंत्रणा वापरायचे ठरवले तरी परदेशात जाणारा मोठा पैसा आपल्या देशातच राहील. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. विविध देशांच्या तुलनेत आपली आकाशातली भरारी जरी उंच असली, तरी पाय मात्र आजही दुबळेच राहिले आहेत, ते या इच्छाशक्तीच्या अभावामुळेच.
दुष्काळासारख्या समस्येवर आजही आपण तोडगा काढू शकत नाही. भाभा अणुसंशोधन केंद्रापासून काही अंतरावरच असलेल्या देवनारच्या कचराभूमीसारखा प्रश्न सोडवण्यातही आपण यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी गगनभरारी घेणारे आपले विज्ञान अपुरे पडते का? असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा असे उत्तर मिळते की विज्ञान नाही तर आपले अज्ञान आणि त्यावरून होणारे राजकारण त्यात खोडा घालत असते. प्रयोगशाळेत झालेले विज्ञान जोपर्यंत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासले जात नाही तोपर्यंत त्या विज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. पण आपण मात्र हे विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेरच येऊ नये म्हणून प्रयोगशाळाच कुलूपबंद करतो. मग जेव्हा एखादी समस्या आपल्या जिवावर उठते तेव्हा मात्र विज्ञानाकडेच बोट दाखवले जाते. पण विज्ञानाने आधी काय करून ठेवले आहे आणि त्याला भारतीयांनीच कसा अटकाव आणला यावर कोणी बोलतच नाही. आजही देशात शेकडो प्रयोग हे प्रत्यक्ष ठिकाणच्या चाचणीवाचून प्रयोगशाळेतच पडून आहेत. या प्रयोग/चाचण्या यशस्वी झाल्या तर नक्कीच आपण अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्यांना तोंड देण्यास सक्षम होऊ शकू. पण घरची कोंबडी ही डाळीसारखीच या वृत्तीमुळे कोणतीही समस्या उभी ठाकली की आपले तोंड परदेशांकडे वळते आणि दुसरीकडे ‘देशातील प्रयोगशाळा काय करतात? त्यांनी आता उपयोजित विज्ञानावर भर दिला पाहिजे’ असे सल्ले मात्र दर विज्ञान दिनाला दिले जातात. ते देणारी प्रवृत्ती शोधण्यासाठी आपल्याला कोणत्याही ‘भुवन’ची आणि ‘नाविका’ची आवश्यकता नाही. आपल्या राजकीय आणि सामाजिक तारूच्या नाविकांकडे पाहिले तरी ती दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully launches irnss 1g navigation satellite
First published on: 30-04-2016 at 03:23 IST