रा. ग. जाधव यांची समीक्षा मोलाची आहेच, पण संत साहित्यापासून चित्रपटांपर्यंत सामाजिक आशयाकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टीही त्यांनी निर्माण केली..
कोणत्याही संकेतांमध्ये न अडकता फुले- आंबेडकरांपासून हेमा मालिनी किंवा दादा कोंडकेंपर्यंतच्या बदलत्या समाजवास्तवाचा विचार काही वस्तुनिष्ठ तत्त्वांच्या आधारे कसा करावा, याचा वस्तुपाठ देणारे रा. ग. जाधव हे निव्वळ समीक्षक नव्हे, तर ‘संश्लेषक’ होते.
‘सैराट’ हा शब्द आजपासून जवळपास तीस वर्षांपूर्वी, समीक्षक रा. ग. जाधव यांनी वापरला होता. तोही दादा कोंडके यांच्या संदर्भात. दादांच्या सैराट लीला हाही आता संकेताचाच भाग झाला असल्याचे त्यांचे समीक्षकीय निरीक्षण किती खरे आहे हे पुढे दिसत राहिलेच, पण आज याची आठवण काढायची ती, ‘समीक्षक उगाच कुणाला माहीत नसलेले, कठीण शब्द वापरतात’ हा सार्वत्रिक समज १९८७ साली वापरल्या गेलेल्या या ‘सैराट’ या शब्दालादेखील लागू पडला असणार, हे ध्यानात घेण्यासाठी. शब्द कठीण आहेत म्हणून समीक्षकांना अडगळीत फेकायचे, असा करंटेपणा आपण मराठीजन नेहमीच करीत आलो आहोत. आणि वर मराठी भाषा बुडत आहे अशी ओरडही करीत आलो आहोत. मुला-मुलीला डॉक्टरच करण्याचा चंग बांधलेली पालकमंडळी प्रवेश परीक्षेच्या ‘काठिण्यपातळी’ची ओरड वर्षांनुवर्षे करतात त्यात जितकी लबाडी, तितकीच समीक्षक मंडळींविषयीच्या या आक्षेपात. बरे, त्या पालकांची सुटका सरकारच्या एखाद्या कोलांटउडीने होते तरी, इथे समीक्षकांना फेकूनच दिले, तर मराठी भाषेच्या वाङ्मयीन संस्कृतीचे रक्षण करायला कोणताही वटहुकूम उपयोगी पडणार नाही. अर्थात, समीक्षकांना ही अशीच वागणूक मराठीभाषक वर्षांनुवर्षे देत आहेत, याची जाणीव जाधव यांनाही होती. ७७व्या अ. भा. साहित्य संमेलनाध्यपदी त्यांची अविरोध निवड झाल्यापासून ते औरंगाबादेत हे संमेलन झाले तोवरच्या प्रवासाबद्दल त्यांनीच नोंदवलेली निरीक्षणे मार्मिक आहेत – ‘‘ साहित्यप्रेमी मराठी समाज व मराठी प्रसिद्धीमाध्यमे या दोहोंनाही माणूस म्हणून व साहित्यिक म्हणून माझ्याविषयी जवळपास काहीच माहिती नव्हती. माझी छत्तीसेक पुस्तके वाचलेले तर सोडाच, पण त्यांची नाममात्र कल्पना असलेली मंडळी अल्प-अल्प-अल्पसंख्याक होती.. .. वावदूक व विवाद्य माणूस म्हणून माझी आठवण कुणालाच होण्यासारखी स्थिती नव्हती.’’
हे रा. ग. जाधव शुक्रवारी सकाळी निवर्तले. समीक्षक कसा ‘वाद खेळणारा’ असला पाहिजे, असा माधव मनोहर किंवा म. वा. धोंड यांच्यामुळे मराठी साहित्यप्रेमींमध्ये घट्ट झालेला विचार जाधव यांनी कधी केला नाही. आदल्या पिढीतले समीक्षक वा. ल. कुलकर्णी हे ‘समीक्षेने प्रश्न उपस्थित केले पाहिजे’ म्हणत, तसेही न करता जाधव यांनी इथे आणि आत्ताची उत्तरे शोधण्यावर अधिक भर दिला. पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतरही- स्वातंत्र्योत्तर काळात ‘एसटी’मध्ये दहा वर्षे कारकून या पदावर नोकरी केली म्हणूनही असेल, पण जाधव यांना सिद्धान्तांवर आधारलेल्या वस्तुनिष्ठ चर्चेपेक्षा स्वत: काय पाहिले, स्वत:ला काय जाणवले, याचे मोल अधिक वाटे. ते मूळचे कवी. पुढे एल्फिन्स्टन कॉलेज, मिलिंद महाविद्यालय अशा ठिकाणी प्राध्यापक आणि त्यानंतर विश्वकोश मंडळाच्या मानव्यविद्या विभागाचे संपादक आणि त्याहीनंतर, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष. त्यामुळे आकलनाचा परीघ मोठाच. व्यक्तिगत आकलनाची मांडणी वस्तुनिष्ठ तत्त्वांच्या आधारे केली तरच ती समीक्षा, हे तारतम्य त्यांनी पाळले; पण वस्तुनिष्ठतेचा बाऊ न करता. त्याऐवजी त्यांच्या लेखी ‘वैयक्तिक क्रांतदर्शित्वा’ला महत्त्व होते. याचा एक सोपा अर्थ, पलीकडले पाहण्याची दृष्टी. कलाकृतीच्या पलीकडे का पाहायचे? कलाकृतीची पाळेमुळे खोदली आणि ती वाङ्मयीन सिद्धान्तांशी कुठे मिळतीजुळती आहेत याच्या नोंदी केल्या की काम झाले, असे का नाही समजायचे? याचेही महत्त्वाचे उत्तर रा. ग. जाधव यांना उमगलेले होते.
हे उत्तर थोडक्यात, ‘समीक्षा व समीक्षक हे समाजधारणा करणारे घटक आहेत,’ असे सांगता येईल. समाजधारणेचा हा वसा जाधव यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला होता आणि म्हणून ते समाजाच्या सर्वच्या सर्व अंगांकडे पाहायला तयार होते, हे त्यांची पुस्तके सांगतात. त्यापैकी ‘निळी पहाट’ हे गाजले आणि ‘निळी क्षितिजे’, ‘निळे पाणी’ ही गाजली नाहीत. दलित साहित्याने बुद्धसंदेशाकडे पाहिले पाहिजे, केवळ विद्रोहाचा उद्घोष करून भागणार नाही, हे जाधव यांचे म्हणणे आहे. विद्रोह समजून घेऊन मग त्याच्या पलीकडची दिशा जाधव यांनी दाखवली होती. विद्रोहाचे आव्हान संस्कृतीच्या सातत्याला नव्हे तर त्यातील प्रदूषक घटकांना असायला हवे, हे त्यांनी सांगितले होते. मराठी समीक्षकांना हे बौद्ध सौंदर्यशास्त्र समजून घ्यावे लागेल, याची आठवणही त्यांनी दिली होती. अर्थात, लेखक आणि समीक्षक या दोघांनीही तसे केले नाही. दलित साहित्य उतरणीला लागल्याची बोंब ठोकण्यास सारे पुढे असतात. जाधव यांनी अशी कोणतीही बोंब कधीही ठोकली नाही. साहित्य संमेलनांचे आजचे स्वरूप ‘सेलिब्रेशन’सारखे असल्याची स्पष्ट जाणीव असूनही तक्रार न करता, ते असे आहे तर यातून पुढे कसे जावे, असा विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. विळखा पडला, म्हणून खचण्याऐवजी विळख्याची ओळख सांगोपाग करून घ्यायची आणि ‘विद्रोह’ काय आहे ते टिपायचे, असे त्यांचे म्हणणे होते. साहित्य संमेलनाध्यक्ष या पदावरून हे सांगण्याआधी अर्थातच, जाधव यांनी महाराष्ट्रात वेळोवेळी झालेल्या विद्रोहांचा अभ्यास केलेला दिसतो. संत तुकारामांचा कवी म्हणून वेध दिलीप चित्रे यांच्याआधी ‘आनंदाचा डोह’ या १९७६ सालच्या पुस्तकातून जाधव यांनी घेतला, तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनाचा धांडोळा ‘संस्कृतीचा मूल्यवेध’ या १९९२ सालच्या पुस्तकातून घेतला. या प्रकाशन वर्षांचे आकडे म्हणजे, देशाच्या राजकीय-सामाजिक अस्वस्थतेची बंद कपाटे उघडणाऱ्या किल्ल्या आहेत. हे लक्षात घेतले तर जाधव यांच्या संवेदनशीलतेबद्दल वेगळे सांगण्याची गरज पडू नये. ‘पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य’ या पुस्तकाचे १९९६ हे प्रकाशन वर्षही असेच महत्त्वाचे- त्याच वर्षी इंग्रजीतही ‘द इकोक्रिटिसिझम रीडर’ हे पुस्तक अमेरिकी विद्यापीठविश्वात निघाले होते. पुढे जाधव यांनी ‘साहित्यकृतीचे जीवनचक्र एका सांस्कृतिक पर्यावरणात सुरू असते’ असे सांगणारा साहित्याच्या परिस्थितिकीचा सिद्धान्तही मांडला. तरीही जाधव यांची ओळखच नव्याने करून द्यावी लागते, याचे कारण ‘साहित्य समीक्षक’ असा आपण त्यांच्यावर मारलेला शिक्का. प्राध्यापकी वळणाचे आणि सैद्धान्तिकच समीक्षा करणारे साहित्य समीक्षक जाधव यांना मोजत नसत यापेक्षाही जाधवांवरचा मोठा अन्याय म्हणजे, या साहित्य समीक्षकांत त्यांची जिम्मा करून थांबणे. अर्थात मूळच्याच ऋजू स्वभावाचे, तक्रार न करता एकटय़ानेच जगणे स्वीकारणारे जाधव हे अन्यायाचा विचार स्वत:बद्दल करीत नसत. ‘आधी मी अस्तित्ववादी होतो’असे सहज सांगणाऱ्या जाधवांनी या एकटेपणाला कुरवाळणारे तत्त्वज्ञान बनवले नाही. त्यांना माणसे हवी, गप्पा हव्या असत. पंचाहत्तरीनंतरच्या गेल्या सात-आठ वर्षांत तर पुण्यातील त्यांच्या मठीत कोणी आल्यावरचा त्यांचा आनंद अवर्णनीय म्हणावा असा असे. याच मठीतून डॉ. नरेंद्र दाभोलकर २० ऑगस्टच्या सकाळी फिरायला बाहेर पडले, आणि पुढल्या आठ दिवसांत ‘साधना’चे अध्यक्षपद जाधवांकडे आले. परंतु स्वत:स वैचारिक उजवे समजणाऱ्यांनी जाधव यांचे लिखाण, त्यांची पुस्तके मुद्दाम मिळवून वाचावीत.. जाधव समरसतावादीच असल्याचा दावा त्यापैकी कैक जण करू लागतील. ‘श्यामची आई’ आणि भारतमाता यांचा जाधव यांनी उलगडून दाखवलेला संबंध तर सर्वानीच वाचावा. ‘बापू- एकभाषित चिंतनकाव्य’ या अलीकडल्या पुस्तकात काव्य कमी आणि चिंतन अधिक असले, तरी एखाद्या वादाचा शिक्का जाधवांवर मारायचाच झाला तर तो गांधीवाद, एवढे त्यातून कळावे. जाधव यांची ३६ पुस्तके गेल्या दहा वर्षांत ४० वर गेली आहेत. जाधव यांची साकल्याची भूमिका त्यांच्या माजी प्रकाशकांनी समजून घेतल्यास, समग्र रा. ग. जाधव असे खंडही निघू शकतात. तसे झाल्यास एक लक्षात येईल की, साहित्यापेक्षा साहित्यव्यवहाराचा – समाजाचा विचार करणारा हा समीक्षक होता. कोणत्याही संकेतांमध्ये न अडकता फुले- आंबेडकरांपासून हेमा मालिनी किंवा दादा कोंडकेंपर्यंतच्या बदलत्या समाजवास्तवाचा विचार काही वस्तुनिष्ठ तत्त्वांच्या आधारे कसा करावा, याचा वस्तुपाठ देणारा निव्वळ समीक्षक नव्हे, तर ‘संश्लेषक’ होता.
कलाकृतींपासून माणसांपर्यंत साऱ्यांना समजून घेणारे हे संश्लेषकत्व होते. या संश्लेषणातूनच जाधव यांचा लेखनपसारा वाढला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे साहित्यव्यवहार, भाषाव्यवहार वाढेल कसा त्याचे भरणपोषण कसे व्हावे, याची काळजी घेणारे जाधव हे मातृहृदयी होते. ते कसे, याचा पडताळा आता त्यांच्या उपलब्ध पुस्तकांतूनच घ्यावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi literary critic rg jadhav
First published on: 28-05-2016 at 04:05 IST