या महाराष्ट्रात विनोदाची जाण नाही हे मराठी भाषक घरात जन्माला येऊनही तुम्हास समजू नये? तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच..

गुणि बाळ असा जागसि का रे वाया.. नीज रे नीज शिवराया..तुमच्या लेखणीतील शाई आटली कशी नाही हे लिहिताना? साक्षात शिवरायांना तुम्ही नीज रे असे अरेतुरेत म्हणता? त्यात तुमचा तो जिवाजीपंत! विनोदी पात्र असले, नाटकात असले, प्रसंग दहाच मिनिटांचा असला, म्हणून काय झाले

राम गणेश..  तुमच्या दुर्दैवास काही सीमा? एक तर तुम्ही महाराष्ट्र नामक केवळ नावातच महा असलेल्या राज्याला कर्मभूमी मानले. जन्म नवसारीत, त्यात पुन्हा चांद्रसेनीयांच्या कुटुंबात. म्हणजे ना तुम्ही ब्राह्मण, ना मराठा, ना अनुसूचित जातीचे ना जमातीचे. तुम्ही दलितांतही मोडत नाही. कोण राहणार तुमच्या मागे? फक्त बाजीप्रभू आणि पुढे चिंतामणराव देशमुख एवढेच. नंतर तसे ठाकरेही आहेत म्हणा. परंतु त्यांचे चांद्रसेनीयपण मर्द मराठय़ांच्या सेवेपेक्षा मारवाड प्रांतातून मुंबापुरीत आलेल्यांच्या मानपानातच खर्च झाले. म्हणजे तसे तुम्ही एकटेच. जन्माला यायचे गुजरातेतल्या नवसारीत, वर चांद्रसेनीयांसारख्या अल्पसंख्याकी कुटुंबात आणि पुन्हा लिहावयाचे मराठीत. यातील एकेक घटक हा एकेक जन्म बुडवण्यास पुरेसा असताना तुम्ही तीनही कर्मे एकाच जन्मात केलीत. काय म्हणावे या दुर्दैवास अहो राम गणेश..

तुम्ही कविताही लिहिल्यात गोविंदाग्रज या नावाने. वाग्वैजयंती तुमचीच. कशाला केलात तो उद्योग तुम्ही राम गणेश. ‘काही गोड फुले सदा विहरती स्वर्गागनांच्या शिरी, काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी’ ही कविता तुमचीच. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षांव पडो मरणांचा’ म्हणणारे तुम्हीच, ‘अल्लड प्रेमास’, ‘पहिले चुंबन’, ‘एखाद्याचे नशीब’, ‘राजहंस माझा निजला’ वगैरे कविता तुमच्या. हे काय विषय असतात कवितेचे. त्यात ना क्रांती ना पददलित उद्धार. मराठी कवितेत क्रांती करणाऱ्या केशवसुतांबद्दल ‘केशवसुत कसले मेले?’ असे काव्य तुम्ही करता. काय म्हणावे तुमच्या या प्रतिगामित्वास अहो राम गणेश. या असल्या साडेतीन टक्क्यांना सुखावणारे काव्य- तेही मराठीत- प्रसवण्यापेक्षा राम गणेश तुम्ही बाबा ब्लॅकशीप- वा तत्सम चिमखडे इंग्रजी बोल लिहिले असतेत तरी अजरामर झाला असतात. राम गणेश.. अहो या राज्यांत मुळात मराठीच वाचायची बोंब. त्यात कोण वाचणार तुमच्या कविता? हे पुरे नाही म्हणून की काय राम गणेश तुम्ही विनोदी वाङ्मयाच्याही वाटय़ास गेलात. अहो.. केवढी ही चूक!  या महाराष्ट्रात विनोदाची जाण नाही हे मराठी भाषक घरांत जन्माला येऊनही तुम्हास समजू नये? विनोद फक्त टवाळांनाच आवडतो यावर या महाराष्ट्राचा विश्वास आहे आणि तरीही तुम्ही बाळकराम अशा टोपणनावाने विनोदी लिहून पाहिलेत. ‘सुंदर चेहऱ्याचा मुका कोणास आवडत नाही..’ हा प्रश्न तुम्हीच विचारलात. केवढे हे धाडस राम गणेश. अहो हसला ना महाराष्ट्र तुमच्या या प्रयत्नांना. त्यातही तुमचे औद्धत्य म्हणजे विनोदी लिहिताना तुम्ही कवी आणि कवितेची चेष्टा करता? ‘स्वर्गलोकांतून पाताळाकडे अमृतकुंभ नेणाऱ्या गरुडाबरोबर हिने (म्हणजे कवितेने) भरारी मारली आहे. ‘तशी लालबागेच्या सगुण पोपटां’बरोबर बेवडय़ाची बाटली घेऊन भटकण्यातही हिने मागे-पुढे पाहिले नाही’, हे लिहिण्याचे धाडस करता तुम्ही राम गणेश? बरे झाले तुम्ही पूर्वी होऊन गेलात. अहो आता जर असे काही तुम्ही केले असते तर समस्त लालबाग, तेथील सर्व शाखाप्रमुख, तसेच ठिकठिकाणचे बेवडे आणि पोपटही आपल्या मागे हात धुऊन लागले असते राम गणेश. अहो का म्हणून काय विचारता? त्यांची अस्मिता दुखावली तुम्ही राम गणेश..

राम गणेश, तेच अस्मिता दुखावण्याचे पाप तुमच्या जिवाजीपंत कलमदान्याने केले. हे म्हणे विनोदी पात्र. अहो हिमालयास खाली मान घालावयास लावणाऱ्या उंचच उंच अशा छत्रपती शिवरायांचे वर्णन तुमचा हा जिवाजी ‘मूठदाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा, काळगेल्या रंगाचा, लिहिणे पुसणे बेतास बात’, असे करतो म्हणजे काय? कसे हे सहन होणार तुम्हीच ज्याला ‘नाजुक देशा, कोमल देशा’ म्हटलेत त्या महाराष्ट्रास? ‘शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे लागले, का शेळीने आपापली पोर वाघाच्या पेटय़ाला दिली, का कणसातून माणसे उपजली? अरे, केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठेशाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झाले इतकेच!’, असे या जिवाजीने म्हणावे? भले ते नाटकात असेल, विनोदात असेल. पण तरी महाराजांविषयी जिवाजीचे मत पाहता त्यास कलुषा कब्जीच म्हणावयास हवे. अहो राम गणेश तुम्हाला कळत कसे नाही हे अस्मिता नामक प्रकरण हे कचकडय़ाचे असते. जेवढा समाज मोठा, सक्षम, संघटित आणि दांडगट तेवढी त्याची अस्मिता तोळामासा हे तुम्हास माहीत कसे नाही. अर्थात हे कसे कळणार म्हणा तुम्हाला. तुम्ही पडलात चांद्रसेनीय. राष्ट्रीय स्तरावर जसे पारशी तसे महाराष्ट्रात तुम्ही चांद्रसेनीय. पारशांना कुठे असते अस्मिता? आता हे बिचारे पारशी राब राब राबतात, कारखाने उभे करतात, संपत्ती निर्माण करतात, संस्था निर्माण करतात आणि अस्मिता मिरवणाऱ्यांना भांडी घासायला ठेवतात हे जरी खरे असले तरी अहो राम गणेश या अस्मितेशिवाय काही खरे नाही. तेव्हा तुम्ही अस्मितेची ओळख करून घ्यायला कमी पडलात आणि छत्रपती, त्यांचे चिरंजीव संभाजी यांच्याविषयी नको ते लिहून बसलात.  ‘गुणि बाळ असा जागसि का रे वाया.. नीज रे नीज शिवराया..’ हा बळवंत मोरेश्वर आणि मंगेशकरी हृदयनाथ यांच्या शिवकल्याण राजातील अप्रतिम ‘पाच देवींचा पाळणा’ खरे तर आपणच लिहिलात राजसंन्यासात. राम गणेश तुमच्या लेखणीतील शाई आटली कशी नाही हे लिहिताना? साक्षात शिवरायास तुम्ही नीज रे असे अरेतुरे म्हणता? ‘‘जरिपटक्यासह भगव्या झेंडय़ाच्या एकचि देशा’’ म्हणत या राकट-कणखर देशाला प्रणाम करू पाहणारे तुम्ही.. ‘‘बढत्या ताकदीचा असो, की चढत्या अकलेचा असो; असा म्हणून एकही सिंहगड सापडायचा नाही, की ज्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाही!’’, असे तुमचाच जिवाजी त्याच दहा मिनिटांच्या प्रसंगात म्हणतो राम गणेश राजसंन्यासात. अहो हे जर खरे असेल तर अस्मिता दुखवून घेण्यासाठी एकही कारण सापडायचे नाही असे तुम्हाला वाटलेच कसे? की वाटूनही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत? तसे असेल तर तुमच्या हातून अक्षम्य पाप घडले असेच म्हणायला हवे अहो राम गणेश..

तुम्हास आचार्य अत्रे यांनी भाषाप्रभू ही उपाधी दिली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे जसे खरे तसे शत्रूचा मित्र तो आपला शत्रू हेही खरे. तेव्हा राम गणेशांचे कवतिक करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्यावरही खरे तर समाजाचा राग व्यक्त व्हायचा. पण ते तूर्त टळले. याचे कारण माहीत आहे का तुम्हास राम गणेश? अहो हे आचार्य आडनावाने अत्रे असले तरी त्यांनी काढलेल्या वर्तमानपत्राचे नाव ‘मराठा’ हे होते. यालाच चातुर्य म्हणतात राम गणेश. हे नाव देऊन संभाव्य अस्मिताभंगाच्या पापाचे अत्रे यांनी आधीच क्षालन करून घेतले. हे तुम्हास जमले नाही राम गणेश.

तेव्हा आता भोगा आपल्या पापाची फळे राम गणेश. भावबंधन, एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव अशी एकापेक्षा एक थोर नाटके लिहिलीत तुम्ही राम गणेश. पण त्यानंतरचे राजसंन्यास अर्धेच ठेवलेत तुम्ही. कारण तुम्हालाही अंदाज आला असणार बहुधा संभाव्य अस्मिताभंगाचा. कारण काहीही असो. तुमचे राजसंन्यास १९१७ साली संपले. अर्धवटच. आज २०१७. म्हणजे नाटक लिहून झाल्यानंतर शंभराव्या वर्षी का असेना महाराष्ट्राला हे नाटक असल्याचे समजले, यातच आनंद मानायला हवा तुम्ही राम गणेश. खरे तर तुम्ही आणखी एक नाटक लिहिले आहे. वेडय़ांचा बाजार. त्यातला मधुकर म्हणतो, ‘‘वेडय़ांचा बाजार आहे आमचे घर म्हणजे’’ – राम गणेश, तुमचे हे एकच नाटक तेवढे खरे. वास्तवदर्शी आणि काळावर पुरून उरणारे. तेवढे एकच लिहून गप्प बसला असतात तर बरे झाले असते. पण नाही. ‘राजा म्हणजे प्रजेचा उपभोगशून्य स्वामी’ हे सूत्रही नाटकातूनच मांडायची तुम्हाला हौस. इतके सारे लिहून तुम्ही इतक्या साऱ्यांची अस्मिता दुखावली आहे राम गणेश की आता तुमची यातून सुटका नाही. उद्या मंत्रालय, सरकारी कार्यालये आदींतील बाबूंची संघटनाही तुमच्याविरोधात उभी राहील, ‘कारकुनी कानांवरील दोन जिव्हांच्या नागिणी’चे माहात्म्य गाणाऱ्या जिवाजी कलमदाने याच पात्रामुळे आमची अस्मिता दुखावते म्हणून. तेव्हा कोणा कोणाला तोंड द्याल अहो राम गणेश!