सरळ सोप्या मराठीत, कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती शैली टाळून सर्वसामान्य वाचकास शहाणे करून सोडता येते हे वि. . कानिटकर यांनी सिद्ध करून दाखवले..

परंतु दु: हे की समीक्षक म्हणवून घेणाऱ्या जमातीने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. वाङ्मय म्हणजे फक्त कथाकादंबरी आणि कविता इतकेच समजण्याचा समीक्षकी कर्मदरिद्रीपणा हा विग कानिटकर, विस वाळिंबे यांच्या काळापासूनच सुरू आहे..

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…

वि. ग. कानिटकर मंगळवारी निसर्गनियमानुसार निवर्तले तेव्हा ते नव्वदीत होते. बातमी आणि व्यक्तीचे महत्त्व आठवडाभरापुरतेच असते असे मानले जाण्याच्या काळातील पिढीस लेखक वि. ग. कानिटकर यांची महती सांगणे सांस्कृतिकदृष्टय़ा गरजेचे आहे. ज्या काळात इंटरनेट हा शब्ददेखील जन्माला आला नव्हता, ज्या काळात गुगलच्या आधारे तात्पुरते पांडित्य मिळवणे शक्य नव्हते आणि ज्या काळात बातमी हवेसारखी हुंगणे अत्यावश्यक नव्हते त्या काळात वि. ग. कानिटकर या व्यक्तीने महाराष्ट्रातील सुजाणांना आंतरराष्ट्रीय घटनांकडे पाहण्यास शिकवले. अशा घटनांचा अभ्यास करता येतो हे दाखवून दिले आणि या अभ्यासातून आपणास जे उमगले ते सर्वसामान्य वाचकास सरळ सोप्या मराठीत, कंटाळवाणी प्राध्यापकी पंडिती शैली टाळून सांगत शहाणे करून सोडता येते हे सिद्ध करून दाखवले. म्हणून कानिटकर यांनी जे केले, हे करण्यासाठी त्यांना ज्यांनी हवी ती उसंत दिली त्यांच्या मोठेपणाचे स्मरण आज करणे आवश्यक ठरते. याचे कारण कानिटकर, वि. स. वाळिंबे यांनी मळलेल्या चरित्र आणि इतिहासलेखनाच्या पायवाटेचा आज हमरस्ता झाला असून कचकडय़ाच्या कथा-कादंबऱ्या आणि उसासे टाकणाऱ्या कवितांपेक्षा असे मूल्यवर्धित माहितीपर लेखन मराठी वाचक प्राधान्याने वाचू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर कानिटकर यांच्या लेखनथोरवीची ही उजळणी. तसे करण्याचे आणखी एक कारण आहे. त्याचा समाचार येथे घेतला जाईलच. परंतु त्याआधी कानिटकर यांच्या लेखनाविषयी.

आजपासून पाच दशकांपूर्वी, १९६३ च्या सुमारास ‘विग’ यांनी ‘माणूस’ या साप्ताहिकात ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ ही लेखमालिका सुरू केली. तो काळ ‘माणूस’च्या आणि श्री. ग. माजगावकर यांच्या संपादकीय चातुर्याने हरखून जाण्याचा. नेमस्त मराठी सज्जनांना ‘माणूस’ आणि माजगावकर यांनी वैचारिकतेचा एक मधलाच क्रियाशील मार्ग उलगडून दाखवला होता. हे नवीन होते. एका बाजूला स्वातंत्र्यश्रेयाच्या प्रभावळीत अडकून राहिलेली काँग्रेस आणि दुसरीकडे स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात असलेले संघीय असे ते वातावरण. या काळात ‘माणूस’ जन्माला आला आणि विग लिहिते झाले. पुढच्याच वर्षी याच साप्ताहिकात त्यांची नाझी भस्मासुराचा उदयास्त समजावून सांगणारी दुसरी मालिका प्रसिद्ध होऊ लागली. हे होणे अचंबित करणारे. कारण तोपर्यंत रंजक लिखाण म्हणजे कथा-कादंबऱ्याच असेच मानले जात होते. कथेतही गृहिणींना सगळी कामे आटोपून दुपारी लवंडल्यावर वाचवेल असे काही किंवा तत्सम. तत्कालीन मासिकेदेखील अशा कथांनी ओसंडून जाणारी असत. अशा वातावरणात दुसऱ्या महायुद्धासारखा अजूनही अभ्यासला जाणारा विषय रंजक आणि सुबोधपणे जनसामान्यांना समजावून सांगणाऱ्या मालिकेचा विचार करणेदेखील शौर्य पुरस्कारास पात्र ठरवणारे होते. पण ते शौर्य श्रीगमा यांनी दाखवले. ते किती सार्थ होते याचा प्रत्यय लगेचच आला. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की माणूस साप्ताहिकावर त्या वेळी वाचकांच्या उडय़ा पडत. ‘माणूस’ कधी हाती येतो याची वाट पाहणारे वाचक होते आणि या लेखांची कात्रणे जमा करून ठेवणारे अभ्यासक होते. या मालिकेने ‘माणूस’ आणि ‘विग’ या दोघांनाही हात दिला. तोपर्यंत आर्थिकदृष्टय़ा डगमगणारा ‘माणूस’चा गाडा नाझींमुळे काहीसा स्थिरावला. हे श्रेय श्रीगमा आणि अर्थातच विग यांचे. जनसंपर्काची कोणतीही प्रचलित माध्यमे नसतानाच्या काळात विग यांच्या लेखमालेवर श्रीगमा यांच्याकडे हजारोंनी पत्रे येत. तोपर्यंतचा ललितलेखनाचा सगळाच्या सगळा बाज विग यांनी आपल्या लिखाणाने बदलला.

ही मालिका दोन वर्षे चालली. १९६६ साली पुढे तिचे पुस्तकरूपाने प्रकाशन झाले. तेही माजगावकर बंधूंच्या राजहंस प्रकाशनातर्फे. या पुस्तकाची तडाखेबंद विक्री आज २६ व्या आवृत्तीनंतरही अव्याहत सुरू आहे. त्या वेळी असे पुस्तक काढणे हे भलतेच अवघड होते. त्याची कारणे दोन. एक म्हणजे विषय. आणि दुसरे म्हणजे आकार. दोन वर्षे चाललेल्या मालिकेला एका ग्रंथात सामावणे आर्थिकदृष्टय़ा भलतेच अवघड होते. तरीही या मालिकेस ग्रंथरूप देण्याचा निर्णय राजहंस प्रकाशनाने घेतला. तो किती योग्य होता हे विग यांच्या ‘नाझी’चे लेखक या ओळखीने दिसून येते. या नंतर विग यांना आपल्या लिखाणाची पट्टी गवसली. त्याचमुळे पुढील काळात विन्स्टन चर्चिल ते अब्राहम लिंकन अशा तालेवार व्यक्तींवर त्यांनी मौलिक आणि काळावर पुरून उरणारे लेखन केले. या लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्या त्या व्यक्ती वा विषयाची समर्पकता या ग्रंथांच्या शीर्षकापासूनच सुरू होते. उदाहरणार्थ लिंकन यांचे वर्णन ते ‘फाळणी टाळणारा महापुरुष’ असे करतात. यातून भारतीयांना जे व्हायचे ते योग्य प्रकारे ध्वनित होते. ‘व्हिएतनाम- अर्थ आणि अनर्थ’ पुस्तकाच्या शीर्षकाचेही तेच. त्या देशावर लादल्या गेलेल्या युद्धाची तीव्रता आणि त्यातील व्हिएतनामींची असहायता योग्य प्रकारे व्यक्त होते. उत्तरायुष्यात विग यांनी मराठीतील गाजलेल्या ग्रंथांच्या प्रस्तावनांचे संपादन केले. मराठीत या अशा प्रस्तावनांची दीर्घ आणि समृद्ध परंपरा आहे. विग यांनी त्यास ग्रंथरूप देऊन उत्तमोत्तम प्रस्तावना दोन मुखपृष्ठांच्या मध्ये आणल्या. परंतु हे आणि इतकेच काही विग यांचे मोठेपण नाही. विग हे उत्तम विनोदी लेखक होते. अनेकांना हे माहीतही नसेल. परंतु नाझी आदी गंभीर विषयांच्या बरोबरीने त्यांनी माणूस साप्ताहिकात ‘मुक्ताफळे’ या नावाने विनोदी सदरदेखील चालवले. पुढे साप्ताहिकातील विनोदी लेखनाचा मानदंड बनलेल्या जयवंत दळवी यांच्या ठणठणपाळाने विग यांच्या विनोदी लिखाणास मनसोक्त दाद दिली होती, ही बाब आवर्जून नमूद करण्यासारखी. दळवी यांचा ठणठणपाळ हा बव्हंशी साहित्यिक घडामोडींचा तिरक्या अंगाने वेध घेण्यात वाकबगार होता. ‘मुक्ताफळां’ना फक्त साहित्याची सीमा नव्हती. राजकीय, सामाजिक आदी अनेक विषयांवर या ‘मुक्ताफळां’त चरचरीत भाष्य असे. त्या वेळचा माणूसवर फिदा असणारा वाचकांचा एक मोठा वर्ग विग यांच्या ‘मुक्ताफळां’चा चाहता होता. याच्या जोडीला विग यांनी इतर लिखाणही बरेच केले. ७० च्या दशकात गाजलेल्या गोऱ्हेशास्त्री यांच्या धर्मातरावर त्यांनी ‘होरपळ’ ही कादंबरीदेखील लिहिली होती. या अशा चौरस वाङ्मयकौशल्याचा उपयोग त्यांना ऐतिहासिक महत्त्वाच्या चरित्रलेखनात झाला. ललितरम्य शैलीतील ही चरित्रे आणि इतिहास ही मराठी साहित्यातील मौलिक संपदा म्हणावी लागेल.

परंतु दु:ख हे की समीक्षक म्हणवून घेणाऱ्या जमातीने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. विग यांच्या साहित्य थोरवीस आदरांजली का वाहायची यामागील हे दुसरे कारण. वाङ्मय म्हणजे फक्त कथा-कादंबरी आणि कविता इतकेच समजण्याचा कर्मदरिद्रीपणा मराठी समीक्षक आजही करतात. विग कानिटकर, विस वाळिंबे यांच्या काळापासूनच तो सुरू आहे. वाचकांच्या प्रेमास पात्र ठरणाऱ्यांविषयी केवळ असूया बाळगणाऱ्या या समीक्षकांनी विग यांच्या विनोदी आणि ललित लेखनाचीही कधी दखल घेण्याचे औदार्य दाखवले नाही. त्या अर्थाने विग हे नेहमीच उपेक्षेचे धनी राहिले.

अर्थात याची कोणतीही कसलीही खंत विग यांना नव्हती. ते शेवटपर्यंत वाचन, लिखाण आदीत मस्त मश्गूल होते. अगदी शेवटच्या काळात, रुग्णशय्येवर असतानादेखील ‘अस्वस्थ हिंदु मन’ या पुस्तकाच्या अनुवादात ते रमलेले होते. या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे जेव्हा त्यांना सांगितले गेले तेव्हा रुग्णालयात जाणिवेच्या सीमेवर त्यांचे असणे-नसणे सुरू होते. त्याही अवस्थेत पुस्तकाच्या वृत्ताने त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर स्मित उमटले. असा ग्रंथोपजीविये लेखक आज आपल्यातून कायमचा गेला. मराठीतील या अस्सल चरितकहाणीकारास लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली.