मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास पाटील यांच्या व्यवहारांची चौकशी करणे, हा झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील त्यांच्या नेमणुकीवर उतारा ठरेल..

‘विश्वास पाटील हे लेखक म्हणून अधिक अप्रामाणिक की सरकारी अधिकारी म्हणून?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे नाही. कदाचित ते त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणे असावे. त्या जशा ना धड इतिहास असतात ना कादंबऱ्या. वास्तविक पाटील यांच्यातील अप्रामाणिक लेखकपणाची चर्चा आणि कुजबुज इतके दिवस साहित्य वर्तुळात होतीच. परंतु ती दबलेलीच राहिली. याचे कारण पाटील यांचा एकूणच दरारा आणि अनेकांना उपकृत करून ठेवायचे चातुर्य. तसे पाहू जाता पाटील यांच्या खुद्द धाकटय़ा भावानेच लोकसत्तातील (लोकरंग, १७ जानेवारी २०१६) विस्तृत लेखात आपल्या ज्येष्ठ बंधूचे वाङ्मयचौर्य उघडे पाडले होते. त्यानंतर पाटील यांच्यातील लेखकावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न चव्हाटय़ावर आला होताच. वास्तविक त्याही आधी त्यांचे साहित्यबाह्य तसेच कार्यालयबाह्य ‘उद्योग’ अनेकांना माहीत होतेच. पण त्या लेखाने ते चच्रेत आले. आणि आता सरकारी अधिकारी म्हणूनही पाटील यांचे उद्योग समोर येताना दिसतात. पाटील हे महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाचे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीच्या आधीच्या मोजक्या काही दिवसांत विविध प्रकरणे ‘निकालात’ काढायचा धडाकाच पाटील यांनी लावला. निकालात काढणे याचा अर्थ मंजुरी देणे. येथे मंजुरीला मोल असते. पाटील यांना त्याचे महत्त्व चांगलेच माहीत असल्याने ही त्यांची कार्यक्षमता पाहून अनेकांचे डोळे दिपले. झोपडपट्टी पुनर्वसन हे राज्य प्रशासनातील हे एक नामांकित भ्रष्ट खाते. वास्तविक या खात्यात विश्वास पाटील यांची नेमणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पाटील यांनी फडणवीस यांनाही ‘मॅनेज’ केले की काय, असेही प्रश्न त्या वेळी विचारले गेले. याचे कारण पाटील यांच्या कर्तृत्वावर असलेला एकंदरच विश्वास. पाटील यांच्या याआधीच्या सर्व नेमणुका अशाच गाजल्या. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना वा चित्रनगरीचे प्रमुख म्हणून किंवा विमानतळ विकास प्राधिकरण चालविताना पाटील यांचे निर्णय संशयातीत होते असे म्हणता येणार नाही. त्याआधी ते ठाण्यात असताना येऊर येथील बेकायदा बंगल्यांचे काय आणि कसे झाले हे सरकारी वर्तुळात सर्वच संबंधित जाणतात आणि त्यांच्या या प्रकरणांचा फार बभ्रा कसा झाला नाही, याच्या सुरस कथादेखील अजूनही चर्चिल्या जातात.

mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक
Changes in Joint Entrance Examination Main Exam Dates by National Examination Authority Pune news
‘जेईई मुख्य’च्या तारखांमध्ये बदल

विश्वास पाटील हे आपल्याकडील व्यवस्थाशून्य व्यवस्थेचा वापर करून एखादा अधिकारी स्वतचे माहात्म्य कसे वाढवू शकतो आणि काय काय साध्य करू शकतो याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. व्यवस्थेचा लाभ उठवण्याची त्यांची कला दुहेरी आहे. लेखकांच्या बव्हंशी कणाहीन, बुळबुळीत वर्तुळात पाटील हे सरकारी अधिकारी म्हणून मिरवत राहिले आणि सरकारात वावरताना त्यांनी आपली लेखक कलावंतातील ऊठबस मिरवली. त्याच वेळी तिसऱ्या आघाडीवर माध्यमांतील गरजवंत आणि लाचारांना हाताशी धरून विश्वास पाटील सातत्याने आपले प्रतिमासंवर्धन करीत राहिले. विविध दैनिके, साप्ताहिकांच्या रविवार/ साहित्य पुरवणीवाल्यांची धरणबांधांवर सरकारी सोय करून, त्यांची बडदास्त ठेवून आपल्या पुस्तकांना यथास्थित प्रसिद्धी मिळेल याची खबरदारी घेण्याची कला पाटील यांनी फारच लवकर आत्मसात केली. त्याच्या पाऊलखुणा नव्वदीच्या दशकातच दिसू लागल्या. झाडाझडती ही पाटील यांची पहिली महत्त्वाची कलाकृती. विषयाचे वेगळेपण आणि त्या वेगळेपणासाठी कष्ट करायची वृत्ती ही पाटील यांची जमेची बाजू. परंतु असे कष्ट घेणारे वा घेऊ इच्छिणारे अनेक असतात. पण ते बडे सरकारी अंमलदार नसतात. पाटील तसे होते. त्यामुळे आपल्या मूळ चरितार्थ व्यवसायाचा सुयोग्य वापर करून त्यांनी आपला उपव्यवसाय – जो की लेखन – सतत जोमात राहील याची त्यांनी सतत आणि योग्य ती काळजी घेतली. यात तसे पाहता गर काही नाही. परंतु पाटील यांच्याबाबत ते तसे ठरते याचे कारण हा व्यवहार वाटतो तितका सरळ आणि स्वच्छ नव्हता. सरकारी अधिकारांच्या योगे घडणारे ‘लाभ’ कामी आणत पाटील यांनी सरस्वतीच्या अंगणात स्थान मिळवले. खरे तर ही मराठी साहित्य क्षेत्राची लाजिरवाणी बाजू. एखाद्याच्या लेखनगुणापेक्षा त्याच्या अन्य उपयुक्ततेचा विचार करून त्याच्या साहित्याचे बरेवाईटपण ठरवले जाते. त्यामुळेच अमेरिकेत वा इंग्लंडात गेल्यावर राहण्याजेवणाची (पूर्वी भारतात फोन करू देण्याची) व्यवस्था करणाऱ्यांचे हौशी लेखन मराठीत उच्च कोटीचे साहित्य मानले जाते. इतके दिवस ही कुप्रथा परदेशस्थित लेखकांपुरतीच मर्यादित होती. विश्वास पाटील यांच्यामुळे ती स्थानिक पातळीवर असू शकते, हे दिसले. हे निसंशय त्यांचे योगदान.

या निमित्ताने एकंदर साहित्यिक, त्याचे लेखनविषय आणि त्याची जीवनमूल्ये यांचाही एकदा हिशेब मांडावयास हवा. नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती संभाजी महाराज अशांवर या विश्वास पाटील यांनी कादंबऱ्या लिहिल्या. पानिपत हादेखील त्यांच्या कादंबऱ्यांचा विषय. पांगिरा या कादंबरीतून त्यांनी ग्रामीण हालअपेष्टांचे दर्शन घडवले. वास्तविक जिल्हाधिकारी वा त्या दर्जाच्या अधिकाऱ्याने २४ तास काम केले तरी उसंत मिळू नये, इतका त्याच्या कामाचा व्याप असतो. या कामास आणि पदास न्याय द्यावयाचा तर शब्दश मानेवर खडा ठेवून काम करावे लागते. असे करणारे अनेक उत्तम अधिकारी आपल्या आसपास आहेत. तेव्हा इतके काम असतानाही या पाटील यांना या कादंबऱ्यांसाठी संशोधन आणि लेखन यासाठी वेळ मिळत राहिला. शिवाय कोणत्या तरी भुक्कड कार्यक्रमांत तमाशांचे मूल्यमापनही त्यांना करावयाचे असते आणि चंद्रमुखी नामक प्रेमकथाही लिहावयाची असते. याखेरीज अनेक फुटकळ साहित्य संमेलने, मेळावे यांतून मार्गदर्शन वगरे करणे आहेच. कथा, कादंबरी, निबंध, काव्य, नाटक आदी प्रांतांत एकाच वेळी मुशाफिरी करणारे बहुप्रसवा लेखक तसे आपल्याकडे असतात. परंतु विश्वास पाटील यांची बातच वेगळी. ते बहुकरवादेखील दिसतात. म्हणजे एकाच वेळी बरेच काही करणारे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील कादंबरीसाठी आपण जग पालथे घातले असे विश्वास पाटील म्हणतात. महाराष्ट्रातील सरकारी पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना यासाठी इतका वेळ कसा काढता आला, हा प्रश्न पडतो. एकतर अधिक काम करावे लागणार नाही अशा पदांवर आपली नेमणूक होईल अशी व्यवस्था पाटील यांनी करून घेतली असा तरी याचा अर्थ असू शकतो किंवा आपल्या कामाकडे त्यांनी हवे तितके लक्ष दिले नाही, असे तरी असू शकते. यातील कोणतीही बाब सत्य असली तरी ती लेखनमूल्ये, लेखनविषय यांच्याशी असलेल्या बांधिलकीशीच प्रतारणा ठरते.

हे सगळे कमी म्हणून की काय, या पाटीलबोवांनी रज्जो नामक चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले. पुरवणी साप्ताहिकाच्या संपादकांना हाताशी धरून स्वतच्या पुस्तकाविषयी रकानेच्या रकाने छापून आणता येतात. त्यामुळे पुस्तकाच्या दोनपाच आवृत्त्यांची बेगमी होते. पण चित्रपटाचे असे नाही. तेथे काही प्रेक्षक धरून आणण्याची सोय नसते. त्यामुळे हा चित्रपट काही चालला नाही. या चित्रपटासाठी रसदपुरवठाही पाटील यांनी केल्याचे म्हणतात. खरे खोटे रज्जोच जाणे. असो. जे झाले ते झाले. परंतु ते तसे पुन्हा अन्य कोणाकडून होऊ नये म्हणून तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या व्यवहारांची चौकशी करावी. तशी त्यांनी ती केली तर तो पाटील यांच्या नेमणुकीवरील उतारा ठरेल. अन्यथा रज्जोच्या निमित्ताने सरकारी व्यवस्थेची जी काही लज्जो जायची ती गेलीच आहे.

  • पाटील हे महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाचे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. वास्तविक या खात्यात विश्वास पाटील यांची नेमणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.