नेत्यांच्या कौटुंबिक जीवनाची चर्चा चव्हाटय़ावर आणणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातील यादवीमुळे मुलायमगृहकलहांची उजळणी सुरू झाली आहे..

राजकीय वा सामाजिक नसलेला हा संघर्ष केवळ बाप, सावत्र आई आणि मुलगा यांच्यातीलच नाही. अनेक यादव यात गुंतलेले असून ते सर्वच मुलायमसिंह यांचे जवळचे नातेवाईक आहेत. व्यवस्था आणि ध्येयधोरणांविना केलेले राजकारण नात्यागोत्यांच्या संघर्षांतूनच पुढे जाते आहे..

मुलायमसिंह यादव एके काळी कुस्ती खेळायचे. वयोमानानुसार आणि आजारपणांमुळे ती सुटल्यानंतर आज चिरंजीव अखिलेश यादव यांनी त्यांना शब्दश: आसमान दाखवले. हे असे कधी ना कधी होणार होते. किंबहुना मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षात आज जे काही झाले ते इतके दिवस कसे न होता राहिले, हा प्रश्न आहे. आवरता येणार नाही इतका पसारा घातल्यावर हे असेच होते. हा पसारा मुलायमसिंह यांनी जसा आपल्या राजकारणात घातला. तसाच तो कौटुंबिक आयुष्यातही घातला. सध्या जे काही सुरू आहे त्यामागे राजकारण आहे असे दाखवले जात असले तरी ते खरे नाही. यामागे आहे कौटुंबिक कलह. इतके दिवस तो पडद्याआड होता. या संदर्भात उत्तर प्रदेशचे कवतिक करावयास हवे. कारण सामाजिकदृष्टय़ा एरवी अत्यंत मागास असलेल्या या राज्याने मुलायमसिंह, मायावती अशांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही चिखलफेक केली नाही आणि एका अर्थाने त्यांचा खासगी आयुष्याचा अधिकार मान्य केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताज्या कृतीने यातील एकाचे, म्हणजे मुलायमसिंह यांचे, खासगी आयुष्य चव्हाटय़ावर आले असून राजकारणाची ही कौटुंबिक किनार ही त्या पक्षाच्या मुळावर येणारी आहे. तेव्हा वरकरणी दाखवला जातो तेवढा आणि तितकाच हा सामाजिक संघर्ष नाही. त्याची सुरुवात मुख्यमंत्री अखिलेश यांची आई मालती देवी २००३ साली निवर्तली तेव्हा झाली.

मुलायम यांच्या कौटुंबिक खटल्यात आतापर्यंत इतरांना नाक खुपसण्याचे कारण नव्हते. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. परंतु त्या वैयक्तिक प्रश्नाने उत्तर प्रदेशातील राजकारणाची वाताहत केली असून बुंदेलखंडसारख्या प्रांतात भूकबळी गेल्याचे वृत्त येत असताना राज्य प्रशासन मात्र या एका कुटुंबाच्या राजकीय खेळात ओढले गेले आहे. म्हणून त्यावर भाष्य करणे आवश्यक ठरते. अखिलेश हे मुलायमसिंह यांच्या निवर्तलेल्या पत्नीचे अपत्य. त्यानंतर २००७ साली साधना गुप्ता नामक महिला ही आपली पत्नी असेल असे मुलायमसिंह यांनी जाहीर केले. या साधनेचे अस्तित्व पहिली पत्नी असतानाही आसपास होते आणि पहिलीपासून झालेला अखिलेश असताना दुसरीपासूनचा प्रतीकही यादवांत जमा झाला होता. अलीकडे मुलायम यांच्या या नव्या धर्मपत्नीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद आपल्याच पतीकडे असायला हवे, असा लडिवाळ हट्ट आपल्या वयोवृद्ध पतीकडे धरला. हा वयोवृद्ध पती म्हणजे अर्थातच मुलायमसिंह. गुंतागुंतीचे आजार, त्यातून सुजत चाललेले शरीर आणि परिणामी मंदावलेल्या शारीरिक हालचाली यामुळे त्रस्त झालेला हा एके काळचा पैलवान पत्नीनेच मुख्यमंत्रिपदाचा धोशा लावल्याने गोंधळला असेल तर ते समजून घ्यायला हवे. यातील योगायोगाचा भाग म्हणजे साधना गुप्ता यांनी मुलायम यांना मुख्यमंत्रिपदाची गळ घालणे आणि त्याआधी काही दिवसच मुलायम यांचे जुने साथीदार अमरसिंग यांनी अन्य उद्योग करून झाल्यावर पुन्हा समाजवादी पक्षात परतणे. तेव्हा साधना गुप्ता यांच्या या मागणीशी अमरसिंग यांचा काहीही संबंध नसेल हे संभवनीय नाही. त्यामुळेच अखिलेश हे अमरसिंग यांच्यावर संतप्त आहेत. घरात सावत्र आई आणि बाहेर आपला मानावा लागलेला हा काका अशा दोन सावत्र आघाडय़ांवर तोंड देऊन कावलेल्या अखिलेश यांनी प्रथम गेल्या महिन्यात आपला इंगा दाखविला. मुलायम यांचे बंधू शिवपालसिंह हे मंत्रिमंडळात आहेत. मुलायम यांनी पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे दिल्याने संतापलेल्या अखिलेश यांनी शिवपाल यांना मंत्रिमंडळातून काढले आणि वडिलांना पहिला धक्का दिला. त्यातून सावरलेल्या मुलायम यांनी आपल्या धाकटय़ा बंधूस पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायला लावले खरे. परंतु तेव्हापासून हा संघर्ष पुन्हा एकदा भडकणार हे दिसत होतेच. तसेच झाले. आता तो हाताबाहेर जाताना दिसतो. याचे कारण हा संघर्ष केवळ बाप, सावत्र आई आणि मुलगा यांच्यातीलच नाही. अनेक यादव यात गुंतलेले आहेत.

आणि ते सर्वच मुलायमसिंह यांचे जवळचे नातेवाईक आहेत. एक भाऊ शिवपालसिंह. दुसरा भाऊ खासदार रामगोपाल यादव. हा अखिलेश यांचा साथीदार. साधना गुप्ता यांच्यापासून मुलायम यांना विवाहबंधनाबाहेर झालेला मुलगा प्रतीक. अक्षय यादव हा पुतण्या. दुसऱ्या भावाचा मुलगा आदित्य. पत्नी साधना. तिचे वडील सुघर सिंह. माजी पत्नी मालती देवी. बहीण कमला देवी. आणखी एक भाऊ अभय राम सिंह. चुलत नातू तेज प्रताप आणि अक्षय प्रताप यादव. असे अनेक यादव दाखले देता येतील. गत निवडणुकांत यांपैकी प्रतीक याने खासदार व्हावे असा आग्रह मुलायम यांच्या विद्यमान पत्नीने धरला. परंतु प्रतीक यास तयार नव्हता. अखेर ही खासदारकी अखिलेश यांची पत्नी डिम्पल यांच्या गळ्यात पडली. आपला मुलगा खासदार नाही झाला तरी आपल्या सावत्र मुलाच्या पत्नीस ही खासदारकी मिळू नये असा साधना गुप्ता यांचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला नाही. सध्या मुलायमसिंह यांचे पत्नीपद सांभाळणाऱ्या या साधना गुप्ता पूर्वायुष्यात समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी होत्या. त्यामुळे त्यांना राजकारणाची जाण आहे. परंतु त्यांची ही जाण आपल्या मुळावर येत असल्याचा अखिलेश यांचा समज आहे आणि त्यात काही गैर नाही. या साधना गुप्ता यांची प्रतिष्ठापना अधिकृतपणे यादव कुटुंबात करण्यात महत्त्वाचा वाटा अमरसिंग यांचा होता. एका अर्थी या अमरसिंग यांनी मुलायम यांना जोडीदारीणच मिळवून दिली. त्यामुळे त्यांचा अर्थातच अमरसिंग यांच्यावर जीव आहे. पण तो आपल्यासाठी जीवघेणा आहे, असे अखिलेश यांना वाटते. त्यामुळे एक वेळ मुख्यमंत्रिपद नाही मिळाले तरी चालेल, परंतु अमरसिंग यांना दूर करा अशी त्यांची मागणी आहे. ती मान्य करणे मुलायम यांना अद्याप तरी मंजूर नाही. त्यामुळे हा संघर्ष अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. वास्तविक हे इतके ‘कार्यरत’ मुलायम हे काही भारतीय राजकारणातील पहिले नाहीत. परंतु इतरांनी या उद्योगांना लागलेली फळे आणि राजकारण यांची गल्लत केली नाही. भारतातील दोन राजकारण्यांना यात अपयश आले. एक हे मुलायमसिंह यादव. आणि दुसरे तामिळनाडूतील करुणानिधी. त्यांच्या द्रमुकतील सध्याची यादवी आणि यादव यांच्या समाजवादी पक्षातील दुफळी दोन्हींत विलक्षण साम्य आहे. त्याचमुळे समाजवादी पक्षाप्रमाणेच द्रमुकमधील कलहावरदेखील तोडगा सापडलेला नाही. मुख्यमंत्री अखिलेश आणि काका शिवपालसिंह यांच्यात सोमवारी समाजवादी सभेत शब्दश: बाचाबाची झाली. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने आपले मंत्रिमंडळातील आतापर्यंतचे सहकारी शिवपाल यांचा ध्वनिक्षेपक खेचण्याचाही प्रयत्न केला. हे काही केवळ राजकीय मतभेदांमुळे घडलेले  नाही. त्यास ही वर उल्लेखलेली कौटुंबिक किनार आहे.

तिकडे दुर्लक्ष करून मुलायमसिंह यांना यावर तोडगा काढण्यात तात्पुरते यश येईलही. पण ते अगदीच क्षणभंगुर असेल. या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे मतभेद उसळून वर येतील हे निश्चित.  त्या वेळी या कुटुंबातील तिकिटोत्सुकांना आवरणे हे आव्हान असेल. त्यामुळे उत्तर प्रदेश पुढील काही महिने असाच खदखदत राहील. या यादवीमुळे भाजपस देखील घोर लागला असेल. कारण अशक्त समाजवादी पक्षाचा फायदा मायावतींच्या बसपला होणार असल्याने त्याचा फटका भाजपस बसण्याची शक्यता आहे. असो. जे झाले त्यात समस्त राजकीय पक्षांसाठी एक धडा आहे. व्यवस्था आणि निश्चित ध्येयधोरणे नसतील तर एकखांबी पक्षांच्या चिरफळ्या उडतात. मध्यवर्ती खांब पिचू लागला की हे असे होते.