तपन आणि मी भेटू लागलो. मी त्याला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातही रस्किन बाँड यांची ‘माय फादर अ‍ॅण्ड आय’ ही आत्मचरित्रात्मक कथा आणि रवींद्रनाथ टागोरांची रायचरण आणि चन्नाची कथा त्याला फार आवडली. पिता-पुत्रांच्या या कथा ऐकताना तपनचं भान हरपत असे. नवल म्हणजे तपननं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा माझ्यापाशी कधीच उल्लेख केला नाही. हळूहळू तपननं स्वत:ला सावरलं. नव्हे, त्याच्या कथालेखनानं त्याला सावरलं..

डोंगराच्या कुशीत दडलेलं एक छोटंसं गाव. निसर्गानं मुक्त हस्तानं आपलं सौंदर्य विखुरलं होतं त्या गावावर. त्या गावाच्या कुशीत एक शाळा वसली होती. टुमदार, सुंदर शाळा. त्या शाळेत मी गोष्टी सांगायला जायला लागले, त्या दरम्यान मला तपन भेटला. तपन! किती सुंदर नाव. बंगाली साहित्यात नेहमी आढळणारं. हाही बंगालीच. कोलकात्याजवळ असलेल्या एका खेडय़ात त्याचं मूळ घर होतं.
तपनची आणि माझी पहिली भेट माझ्या पक्की लक्षात राहिली आहे. तपनचा वर्ग शाळेच्या बैठय़ा इमारतीच्या दर्शनी भागात असायचा. माझ्या सत्रासाठी मी गेले आणि वर्गातून खूप आरडाओरडा ऐकू आला. कोणी तरी मुलगा मोठमोठय़ानं काही तरी बोलत होता. दुसरा मुलगा हळू आवाजात आपली बाजू मांडत होता. बाईंचा समजावणीचा आवाजही त्यात मिसळला होता. मी वर्गात शिरल्यावर बाईंनी ते भांडण आवरतं घेतलं खरं, पण भांडणारा तपन माझ्या लक्षात राहिला तो कायमचाच. मोठे डोळे (भावनांनी ओतप्रोत भरलेले) सावळा वर्ण, अगदी सरळ नासिका आणि वळलेल्या मुठी. मी वर्गात शिरल्यावर आपोआप भांडण थांबलं. त्या संधीचा फायदा घेऊन मी गोष्ट सांगायला लागले. दाखवलं की काहीच घडलंच नव्हतं. आश्चर्य म्हणजे तपनही लगेच शांत झाला. चेहऱ्यावरचा ताण निवळत गेला. मन लावून एकतानतेनं त्यानं गोष्ट ऐकली. गोष्ट संपल्यावर ती आवडली असंही खुशीनं सांगितलं.
त्यानंतरही अधूनमधून तसंच होत गेलं. वर्गात, क्रीडांगणावर, जेवण घरात अगदी क्षुल्लक कारणांवरून तपन भांडायला उठायचा. शिक्षकांच्या समजावणीनंतरदेखील वाद घालणं सुरूच असायचं. पण कथाकथनाचा मात्र त्याच्यावर चांगलाच परिणाम होत असावा. कारण गोष्ट सुरू झाली की तपनची आक्रमकता एकदम मावळून जायची. तो शांत व्हायचा. हनुवटीखाली हात धरलेली, गोष्ट ऐकायला उत्कंठ झालेली त्याची मूर्ती मोठी सुंदर वाटायची. गोष्टींचं वेड होतं त्याला. एकदा असंच कथाकथनाचं सत्र संपवून मी माझ्या खोलीत आले. सायंकाळ उलटून चालली होती. शाळेतील मुलांचा खेळ आटपत आला होता. दिवसभर गजबजलेली शाळा शांत होऊ लागल्यानं उदास वाटायला लागलं होतं. अशा वेळी समोरून तपन येताना दिसला. हातात वहीचं बाड होतं. घाईघाईनं माझ्याकडे येऊन, ‘माय स्टोरी बुक’ असं म्हणून हातात ती वही देऊन निघूनही गेला.
मी खोलीत आले. तपनच्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. नंतरचे दोन एक तास मी तपनची वही वाचत होते. साधारण दहा एक गोष्टी तपननं लिहिल्या होत्या. तपन त्या वेळी सहावीत होता. त्याचं वय असेल जेमतेम दहा-अकरा वर्षांचं. गोष्टी वाचताना त्यातली कोवळीक तर जाणवत होती. पण तपनचं कौतुक वाटत होतं. एवढय़ा लहान वयात हा मुलगा इतकं लिहितोय, ही निश्चितच वाखाणण्याजोगी बाब होती. तपनच्या गोष्टी वाचून पूर्ण केल्या, तेव्हा रात्र झाली होती. तपनला उद्या भेटायचं असं मनाशी ठरवून त्याची वही बाजूला ठेवली. त्याच वेळी माझ्या लक्षात एक गोष्ट आली. तपनच्या सगळ्या कथांमध्ये कथानायकाचा मृत्यू झालेला होता. कथानायकाचा मृत्यू हीच त्याच्या कथांमधील मध्यवर्ती घटना होती. कधी हा मृत्यू अपघातात झाला होता तर कधी कथानायक दीर्घ आजारानं मरण पावला होता. कधी नायकाची हत्या झाली होती, तर कधी त्यानं आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता. कथेतल्या बाकी घटना वैविध्यपूर्ण होत्या. पण कथानायकाचा मृत्यू ही मात्र अगदी अटळ, अपरिहार्य घटना होती. दुसरे दिवशी अपेक्षेप्रमाणेच तपन मला भेटायला आला. त्या कोवळ्या कथालेखकाला मनापासून शाबासकी दिली. त्याचं कौतुक केलं. पण मनात आदल्या दिवसापासून निर्माण झालेल्या प्रश्नाचा मी तपनपाशी उल्लेखही केला नाही. मिळालेल्या शाबासकीनं तपनची कळी एकदम खुलली.
दुपारी तपनच्या वर्गशिक्षकांना भेटले. तपनविषयी थोडी अधिक चौकशी केली. त्यातून जे समजलं ते धक्कादायक तर होतंच, पण मी आदल्या दिवशी ज्या गोष्टी वाचल्या होत्या, त्यांची संगती लावणारंदेखील होतं. तपनचे आईवडील चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करत होते. त्यामुळे आपल्या तीनही मुलांकडे लक्ष देणं त्यांना जड जात होतं. कामाच्या जबाबदाऱ्या वाढत होत्या. मुलांना अधिकाधिक वेळ नोकरांवर सोपवण्याचे दुष्परिणाम दिसत होते. शेवटी या जोडप्यानं जड अंत:करणानं मुलांना निवासी शाळेत ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलं आईपेक्षाही वडिलांशी काकणभर अधिक जोडलेली होती. तपनच्या वडिलांना मुलांची फार आवड. निवासी शाळेत ठेवल्याच्या पहिल्या वर्षांत तर त्यांच्या शाळेत किती तरी फेऱ्या झाल्या. शेवटी मुलं रुळली असं वाटल्यावर त्यांनी आपलं येणं कमी केलं (थांबवलं नाहीच). मग एका दिवाळीच्या सुट्टीत तीनही मुलं घरी गेली. पण या वेळी त्यांचे वडील त्यांच्या स्वागतासाठी हजर नव्हते. होती ती फक्त आई. भग्न, दु:खी, एकाकी! तपनचे वडील त्यांना जूनमध्ये शाळेत सोडून आल्यावर एका अपघातात मरण पावले होते. तपनच्या आईनं ही दु:खद बातमी त्या वेळी मुलांपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सहा महिन्यांनी मुलं घरी आली आणि त्यांच्यासमोर ते रखरखीत वास्तव आलं.
तपनच्या वर्गशिक्षिका सांगत होत्या की, तपन सुट्टीहून परत आला तेव्हा तो पार बदलून गेला होता. पूर्वीच्या हुशार, खेळकर, नेहमी बक्षीस पटकावणाऱ्या तपनची जागा आक्रमक, भांडखोर, चिडक्या तपननं घेतली होती. वहीत काही तरी गिरगिटायचं, चुकलं म्हणून ते खोडायचं आणि कधी कधी रागानं वहीची पानं टराटरा फाडून टाकायची, याचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्या मानानं तपनच्या मोठय़ा भावानं परिस्थिती खूपच चांगली हाताळली होती. धाकटी बहीणही एकदम खिन्न झाली होती खरी, पण तपनच्या स्वभावात एकाएकी आलेल्या आक्रमकतेचा मागमूसही तिच्या वागण्यात नव्हता.
मी तपनच्या बाईंपाशी त्याच्या कथांचा, त्यातील नायकाच्या मृत्यूचा अजिबात उल्लेख केला नाही. एखादे वेळेस इतरांशी निर्हेतुकपणे झालेल्या चर्चेच्या ओघात ती गोष्ट तपनपर्यंत चुकीच्या मार्गानं जाऊ शकली असती. ती फक्त तपनशी दोस्ती करण्याचं ठरवलं. शाळेच्या संचालकांशी मी तसं बोलले व त्यांचं फार उत्तम सहकार्य मला लाभलं. त्यानंतर तपन आणि मी अनेकदा भेटू लागलो. मी त्याला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातही रस्किन बाँड यांची ‘माय फादर अ‍ॅण्ड आय’ आत्मचरित्रात्मक कथा आणि रवींद्रनाथ टागोरांची रायचरण आणि चन्नाची कथा त्याला फार आवडली हे स्पष्ट दिसलं. रस्किन बॉण्ड यांनीही वयाच्या दहाव्या वर्षी आपले वडील गमावले आणि आज वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षीदेखील वडील हेच त्यांचे हिरो आहेत. उण्यापुऱ्या फक्त दहा वर्षांच्या सहवासात रस्किन आणि त्यांचे वडील यांच्यात एक अप्रतिम स्नेहबंध निर्माण झाला होता. तो स्नेह, ते प्रेम रस्किन यांना उर्वरित आयुष्यात पुरून उरलं. रवींद्रनाथांच्या कथेतदेखील पिता-पुत्रांमधील नात्याचा एक अनोखा गोफ रवींद्रनाथांनी गुंफला आहे. पिता-पुत्रांच्या या कथा ऐकताना तपनचं भान हरपत असे. जणू त्याचे प्राण कानात येत. नवल म्हणजे तपननं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा माझ्यापाशी कधीच उल्लेख केला नाही. त्या विषयावर तो कधीच बोलत नसे. जणू मला ते माहीत असावं हे त्यानं गृहीत धरलं होतं. हळूहळू तपननं स्वत:ला सावरलं. नव्हे त्याच्या कथालेखनानं त्याला सावरलं.
तपन गोष्टी लिहीत राहिला. अधिक जोमानं लिहीत राहिला. त्याच्या कथांमधली मृत्यूची व्याप्ती सावकाशीनं कमी होत गेली. त्याची जागा दुसऱ्या घटना घेऊ लागल्या. इथं मुद्दाम त्याच्या एका कथेचा उल्लेख करावासा वाटतो. एका कथेत तपननं आपला कथानायक रेल्वेच्या पुलावरून उडी मारून मरतो, असं दाखवलं होतं. नंतर त्यानं ती घटना बदलून तो रेल्वे रुळाखाली येणाऱ्या एका माणसाचे प्राण वाचवतो असं दाखवलं. मला हा बदल फार फार लक्षणीय वाटला. त्यानंतर तपन झपाटय़ानं बदलला. बदलत गेला. खेळात, निबंध स्पर्धेत, चित्रकलेत भाग घेऊ लागला, त्याला बक्षिसं मिळू लागली. मुख्य म्हणजे त्याच्या गोष्टीतलं मरण नाहीसं झालं.
काही वर्षांनी मुंबईहून एक फोन आला. तपनची आई माझ्याशी बोलली. तपन खूप बदललाय. आनंदी, प्रसन्न असतो, असं तिनं आवर्जून सांगितलं. त्यातल्या माझ्या सहभागाचाही तिनं उल्लेख केला. तिचा आवाज भरून आला होता. मग तपन बोलला. तो फोनवर ‘हॅलो टीचर’ असं म्हणाला आणि त्या आनंदी, हसऱ्या आवाजानंच अशी अनुभूती मिळाली की पुढं काही बोलण्याचं कारणच उरलं नाही.
eklavyatrust@yahoo.co.in