भारत-चीन सीमेवरील हिमालयातील उत्तुंग शिखरांवर तैनात इंडो-तिबेटियन बॉर्डर फोर्स अर्थात ‘आयटीबीपी’च्या अधिकारी व जवानांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नांमुळे संबंधितांविषयी आपण एक तर असंवेदनशील आहोत अथवा कृतघ्न तरी आहोत, यावर शिक्कामोर्तब केले आहे. कारण, देशाच्या संरक्षणाची भिस्त सांभाळणाऱ्या सैनिकांना सीमेवर भेडसावणारे आरोग्याचे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्तीही दर्शविली जात नाही. २० ते २२ हजार फूट उंचीवर बर्फाच्छादित भागात प्राणवायूची मात्रा अतिशय कमी असते. या प्रतिकूल वातावरणात सीमावर्ती क्षेत्रात तग धरणे हेच खरे आव्हान ठरते. या ठिकाणी शत्रूच्या गोळ्यांची नव्हे, तर प्राणवायूच्या कमतरतेची संबंधितांना अधिक धास्ती वाटते. या स्थितीत काम करताना आयटीबीपीचे काही अधिकारी व जवान मेंदूत रक्तस्राव, पक्षाघात, रक्तवाहिन्या गोठल्यामुळे शरीराचा काही भाग काढून टाकण्यापर्यंतची वेळ येणे अशा नानाविध व्याधींनी ग्रस्त असल्याची बाब नुकतीच समोर आली. लडाख व अरुणाचल प्रदेशात तैनात सैनिकांना या संकटाला आधिक्याने तोंड द्यावे लागते. या ठिकाणी कार्यरत राहिल्याने अनेकांना स्मृतिभ्रंश, छातीत पाणी होणे व छातीला सूज येणे यांसारख्या व्याधी जडल्या. आजारांनी ग्रस्त झालेले काही जण पुन्हा युद्धभूमीवर काम करण्यास असमर्थ ठरतात. आयटीबीपी सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु यामुळे प्रश्न मिटणार नाही. उपरोक्त क्षेत्रात नव्याने त्यांचे सहकारी तैनात होतात. पुन्हा त्यातील काहींसमोर हेच संकट उभे ठाकलेले असेल. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या लष्करी तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडत आहेत. त्याआधारे संबंधितांना प्रतिकूल वातावरणात काम करता येईल. या सामग्रीचे संशोधन वा प्राणवायूची उपलब्धता करणे अशक्यप्राय नाही. गेल्याच महिन्यात ‘डिफेक्स्पो’ या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र प्रदर्शनात देशातील सरकारी आणि खासगी उद्योग व संस्थांनी निर्मिलेली अत्याधुनिक सामग्री सादर झाली. त्यात बर्फाळ प्रदेशात जवानांना उपयुक्त ठरतील, अशा काही साधनांचाही अंतर्भाव होता. या प्रदर्शनात ‘मेक इन इंडिया’चा बराच गाजावाजा झाला. मात्र, असे जटिल प्रश्न सोडविण्यास आपले प्राधान्य आहे की नाही, याची स्पष्टता होत नाही. गेल्या फेब्रुवारीमध्ये सियाचेन भागात हिमनदीत कर्तव्य बजावताना मद्रास रेजिमेंटचे १० जवान मरणाच्या खाईत ढकलले गेले होते. कमी प्राणवायू असणाऱ्या क्षेत्रात काही काळ काम करणे जिकिरीचे आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे ठरते. मागील तीन दशकांत बर्फाच्छादित भागात कर्तव्य बजावताना ८६९ भारतीय सैनिक मरण पावले. या क्षेत्रात काम करण्यासाठी सैनिकांना विशेष पोशाख आणि गिर्यारोहणाची साधने उपलब्ध केली जातात. त्यावर दर वर्षी कोटय़वधींचा निधी खर्च होतो. ही सामग्री बहुतांशी आयात केली जाते. ती कितपत उपयोगी ठरते याचाही आढावा घेण्याची वेळ आली आहे. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याचा दावा करणाऱ्या सरकारने सीमावर्ती भागात वाईट हवामानामुळे जायबंदी होणाऱ्या सैनिकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याची संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे.