भारताच्या मातीतून उगवलेल्या माणसांवर किती प्रेम करावे आणि त्याच्या परदेशातील विजयाचा किती उन्माद करावा, याला या देशात धरबंध नसतो. असे करताना आपण आपल्या तात्त्विक भूमिकेपासून दूर जात आहोत, याचे भान भारतीयांना कधीच आलेले नाही. त्याबाबतीत आपला दुटप्पीपणा हेच आपले व्यवच्छेदक लक्षण. पाकिस्तानी खेळाडूशी विवाह केल्याबरोबर सानिया मिर्झा देशद्रोही आणि गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती होताच, त्यांच्या भारतीय असण्याबद्दल अपार आनंद. हे असे दुटप्पीपण भारतीय माणसांच्या जणू नसानसांत भिनलेले आहे. इतके की, वागण्यातील विसंगती आपणा भारतीयांच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे कोणाही भारतीयाने परदेशात जाऊन काही विजय संपादन केला, की त्याचे कारण तो मूळचा भारतीयच आहे, असे सांगण्यात आपण वाकबगार; पण कोणा परदेशीयाने भारतात येऊन काही यश संपादन केलेच, तर मात्र त्याची गय नाही. लिओ वराडकर केवळ भारतीय आहेत, म्हणूनच ते पंतप्रधान होऊ   शकले, हा युक्तिवाद आता सगळेच जण करू लागतील; पण हेच लिओ वराडकर, ज्यांनी आपण समलिंगी असल्याचे आधीच जाहीर केले आहे, जर भारतीय निवडणुकीत उभे राहिले, तर त्यांची काय गत होईल, हे कुणालाही सांगायची गरज नाही. ज्या देशात पंतप्रधानपदावरील व्यक्ती परदेशी मूलवंशाची आहे, शिवाय समलिंगी असल्याचे जाहीरही करते आहे, याबद्दल कोणालाही कसलीही अडचण नाही, त्या देशासारखी स्वातंत्र्याची अशी बूज आपणासारखे किती भारतीय बाळगतात? सानिया मिर्झाला देशद्रोही ठरवण्यात पुढाकार घेणारे सगळे भारतीय ती भारतासाठीच खेळते, हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. हाच न्याय या देशात सोनिया गांधींना इतक्या सहजपणे लावला जातो की, त्याबद्दल कुणाला आपण दुटप्पी आहोत, हे लक्षातही घ्यायची गरज वाटत नाही. समजा, सोनिया गांधी पंतप्रधान झाल्याच असत्या, तर किती भारतीयांनी त्याचे मनापासून स्वागत केले असते? निदान जे आज लिओ वराडकर यांचे अभिनंदन करण्यात अग्रेसर आहेत, त्यांनी तरी असे स्वागत केले असते का? आपण सगळ्या घडामोडींकडे आपल्या चष्म्यातूनच पाहणार आणि तेच कसे बरोबर आहे, हेही उच्चरवात सांगणार.

भारतीय मानसिकतेचा हा आविष्कार जळीस्थळी दिसतो आणि त्याबद्दल कुणालाही जराही खंत वाटत नाही. लिओ यांचे अभिनंदन ते भारतीय आहेत म्हणून करायचे, की तेथील जनतेनेही त्यांचे मूलनिवासीपण लक्षात न घेता त्यांना पंतप्रधानपदी बसवले म्हणून? या सगळ्या घडामोडींकडे आपण किती संकुचितपणे पाहतो, हे यावरून सहज लक्षात येते. सोनिया गांधी भारतीय वंशाच्या नाहीत म्हणून त्यांना भारतात विरोध होतो, पण तेच कारण आयर्लण्डमध्ये असत नाही, याचे कारण तेथील समाज आपल्यासारखा दुटप्पी नाही. आपल्या या मनोवृत्तीमुळे अशा कोणाही व्यक्तीला तिच्या गुणांवर काही पद मिळण्याची शक्यताच उरत नाही. आपल्यासाठी त्या व्यक्तीचे मूळ गुणांपेक्षाही अधिक महत्त्वाचे असते. तरीही आपण स्वत:ला लोकशाहीवादी, सहिष्णू वगैरे म्हणवून घेतोच. ज्या देशांत गुणांचेच मौल्य अधिक मानले जाते, ते देश मानवी मूल्यांच्या पातळीवर नेहमीच पुढे असतात, हा इतिहासही आपण सहजपणे विसरतो. परदेशात जाऊन झेंडे लावले की ते कर्तृत्व आणि परदेशीयांनी येथे येऊन कर्तृत्व दाखवले की देशविरोधी. सगळ्याच गोष्टी एकाच तराजूत मोजू न शकणे, हे आपले वैगुण्य आहे, हेही मान्य करण्यास आपण तयार नाही. लिओ वराडकर यांचे अभिनंदन करतानाच, तेथील जनतेच्या या उदारमनस्कतेचाही म्हणूनच गौरव करायला हवा.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी