तुम्ही किती चालता? असा प्रश्न कुणी विचारला तर अचूक उत्तर देणे कुणालाही शक्य होणार नाही. कारण आपण दिवसभर अविरतपणे ज्या हालचाली करत असतो, त्यातील चालणे ही महत्त्वाची क्रिया आहे. अगदी घरातल्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठीही आपण हीच क्रिया करतो. चालणे ही तंदुरुस्तीसाठी आवश्यक क्रिया आहे. या हालचालीदरम्यान शरीरातील सर्वाधिक अवयव एकाचवेळी कार्यरत असतात. त्यामुळेच डॉक्टरही चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देत असतात. अर्थात आपण किती चालतो, याचं मोजमाप तोंडी किंवा मनात ठेवणं सोपं नाही. पण स्मार्टफोनवरील ‘पेडोमीटर’ (Pedometer) हे अ‍ॅप तुम्हाला याबाबतीत हमखास मदत करू शकेल. तुम्ही दिवसभर जितके चालाल तितक्या पावलांची नोंद या अ‍ॅपमध्ये होते. तुम्ही किती अंतर चालला, किती वेळ चालला आणि त्यातून किती कॅलरी खर्च केल्या हा सर्व तपशील हे अ‍ॅप नोंदवून ठेवतं.
सध्या मानवी हालचालींची, हृदयक्रिया, नाडीचे ठोके, रक्तदाब अशा गोष्टींची अचूक आणि २४ तास नोंद करणाऱ्या ‘फिटनेस गॅझेट’चा जमाना आहे. पण ही महागडी गॅझेट प्रत्येकालाच परवडतात असं नाही. म्हणूनच याची सुरुवात म्हणून ‘पेडोमीटर’ वापरण्यास हरकत नाही.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com