प्राप्तिकर कायद्याचा कलम १३९ एएनियम सरकारकडून अधिसूचित

येत्या शनिवार, १ जुलैपासून कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ मिळविण्यासाठी अर्ज करताना अथवा प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करताना, आधार क्रमांकाची नोंद करणे बंधनकारक होणार आहे. विद्यमान आधार कार्डधारकांना त्यांच्या ‘पॅन’शी आधार क्रमांकाशी संलग्नता अनिवार्य करणारा नियम केंद्र सरकारने अधिसूचित केला आहे.

आधार क्रमांकाद्वारे व्यक्तीची बायोमेट्रिक अनोखी ओळख निर्धारित होते. आता आधार क्रमांक आणि ‘पॅन’शी संलग्न केले गेल्याने एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक ‘पॅन’ असण्याचा आणि त्यायोगे करचोरीच्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे पॅनसाठी अर्ज करताना, १२ अंकी आधार क्रमांक किंवा नोंदणी अर्ज क्रमांक नमूद करणे सक्तीचे ठरेल.

देशात सध्या सुमारे २५ कोटी ‘पॅन’धारक आहेत, तर आधार क्रमांक मिळविणाऱ्यांची संख्या १११ कोटींच्या घरात जाणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यातील सुनावणीत पॅन कार्ड मिळविताना तसेच कर विवरण पत्र भरताना ‘आधार सक्ती’ला उचलून धरले आहे. तथापि सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविताना, आधार क्रमांकाची सक्तीचा मुद्दा मात्र घटनापीठाकडे निर्णयासाठी प्रलंबित आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प सादर करीत असताना, प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना आधार क्रमांकाची नोंद बंधनकारक करणारा प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने प्राप्तिकर कायद्यात ‘कलम १३९एए’चा अंतर्भाव करण्यात आला. पॅन वितरणासंबंधी असलेल्या नियम ११४ मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. कायद्यातील हा बदल सरकारकडून अधिसूचित केला गेल्याने या नियमाची अंमलबजावणी आता १ जुलैपासून होणार आहे. १३९ एए कलमाच्या पोटकलम(२) अन्वये करदात्यांना त्यांच्या प्राप्तिकर महासंचालक अथवा डीजीआयटीकडे त्यांचा आधार क्रमांक सूचित करणे बंधनकारक केले गेले आहे.

संलग्नता कशी करता येईल?

करदात्यांना त्यांच्या ‘पॅन’शी आधारच्या संलग्नतेची तरतूद प्राप्तिकर विभागाने त्यांच्या ई-फायलिंग संकेतस्थळावरच केली आहे.  https://incometaxindiaefiling.gov.in/  या संकेतस्थळावर जाऊन नव्या करदात्याला आवश्यक व्यक्तिगत तपशील भरून नोंदणी करता येईल. पुढे संकेतस्थळावरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ या टॅबवर उपलब्ध घटकांमध्ये ‘लिंक आधार’ या दुव्यावर क्लिक केल्यास, नवीन अर्ज नमुना पुढे येईल. या अर्जात करदात्याने नाव, जन्मतारीख, लिंग हा ‘पॅन’वरील तपशील नोंदवून, आधार क्रमांक आणि आधार कार्डावर नमूद नाव नोंदवावे लागेल. हा अर्ज ‘सबमिट’ केल्यावर यशस्वीपणे स्वीकृतीचा संदेश तत्क्षणी संगणकाच्या पडद्यावर दर्शविला जाईल आणि त्याची खातरजमा करणारा ई-मेल संदेश करदात्याला प्राप्त होईल. हा संदेश प्राप्त झाल्यानंतर तुमचा आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडला जाईल.