स्टेट बँकेची सामान्य विमा क्षेत्रातील संयुक्त भागीदारीतील कंपनी एसबीआय जनरल इन्श्युरन्समधील भांडवली हिस्सा सध्याच्या २६ टक्क्य़ांवरून ४९ टक्क्य़ांवर नेण्याचा निर्णय इन्श्युरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप (आयएजी)ने गुरुवारी जाहीर केला.
भारतातील खासगी विमा कंपनीत विदेशी भागीदाराचा हिस्सा कमाल ४९ टक्क्य़ांपर्यंत उंचावण्याची मुभा देणाऱ्या बराच काळ प्रलंबित राहिलेल्या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटल्यानंतर एसबीआय जनरलमधील ऑस्ट्रेलियन भागीदाराने विनाविलंब या निर्णयाची घोषणा केली आहे.
कंपनीच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या कार्यकारी समितीने भागीदारी कराराप्रमाणे स्टेट बँकेचा कंपनीतील हिस्सा सौम्य करून तो आयएजीकडे वर्ग करण्याबाबत निर्णय २५ मार्च रोजी घेतला. या व्यवहाराचे मूल्यांकन आणि किमत निश्चितीसाठी त्रयस्थ मूल्यांकनकर्त्यां संस्थेच्या नियुक्तीचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे स्टेट बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये स्पष्ट केले.
याआधी ब्रिटनस्थित बुपा समूहानेही देशातील आरोग्य विमा क्षेत्रातील एकमेव कंपनी मॅक्स बुपामध्ये भागीदारी ४९      टक्क्य़ांपर्यंत नेण्याचा मानस स्पष्ट केला आहे.
तर भारती, रिलायन्स, मॅक्स इंडिया या भारतातील उद्योगसमूहांनी सुरू केलेल्या खासगी विमा कंपन्यांतील विदेशी भागीदारांसाठी आपापला हिस्सा सौम्य करण्याची तयारी दर्शविली आहे.