उद्योगक्षेत्रात ‘अच्छे दिना’चे प्रतिबिंब उमटतील आणि उद्योगधंद्याकडून कर्ज मागणीला बहर येईल अशी चिन्हे दिसत नसली, तरी बँकांच्या रिटेल कर्ज व्यवसायाने सणासुदीच्या तोंडावर अपेक्षित गती पकडली असून, ऑक्टोबर महिना बँकांसाठी गेल्या काही वर्षांतील दुष्काळ संपवून खऱ्या अर्थाने उत्सवी हंगामाचा ठरणार आहे.
गेला पंधरवडा आणि नवरात्रीपासून गृहकर्ज आणि वाहनकर्जाच्या मागणीने जोर पकडला असल्याचे स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर दुबे यांनी सांगितले. दिवसाला १०० कोटी रुपये मूल्याच्या म्हणजे साधारण २००० कारसाठी कर्जमागणीचे अर्ज बँकेकडे दाखल होत असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ असल्याचे दुबे यांनी सांगितले. शिवाय कर्जमंजुरी मिळविणाऱ्यांचे प्रमाणही खूप अधिक वाढले आहे. केवळ मुंबईत सरलेल्या सप्टेंबर महिन्यात ५,००० कारसाठी कर्जाना मंजुरी दिली गेली, असे त्यांनी सांगितले.
सणोत्सवाच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती, ऑफर्सची घोषणेची भारतात परंपरा असून, अनेक बँकांकडूनही अशी प्रथा पाळली जात आहे. स्टेट बँकेने गेल्या महिन्यात गृहकर्जात किंचित घट करीत, वाहनकर्जाच्या दरातही कपात केली आहे, तर दोन्ही प्रकारच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत संपूर्ण माफ केले आहे, असे दुबे यांनी सांगितले.
स्टेट बँकेसाठी ग्राहक कर्जामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहनकर्जाचा, त्या खालोखाल गृहकर्ज आणि नंतर क्रेडिट कार्ड व्यवसाय व वैयक्तिक कर्जाचा क्रम येतो, अशी दुबे यांनी माहिती दिली. विद्यमान सणासुदीच्या काळात गृहकर्जाच्या मागणीतही वाढ बँकेला अपेक्षित असून, दिवसाला सुमारे ३०० कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी अर्ज दाखल होतील आणि २६० ते २७० कोटी रुपयांची कर्जमंजुरी दिली जाईल, असे स्टेट बँकेचे लक्ष्य आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित महाराष्ट्र हाऊसिंग इंडस्ट्री चेंबरद्वारे आयोजित गृहप्रदर्शनात स्टेट बँकही एक भागीदार असून, या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५०० निवासी प्रकल्पांमध्ये घरांचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना तात्काळ कर्जमंजुरीची सुविधाही बँकेने देऊ केली आहे. अशा प्रकारचे उपक्रमही ग्राहकांमध्ये बळावलेल्या मानसिकतेचा प्रत्यय देतात आणि अर्थात बँकांसाठी ही चांगली व्यवसायसंधीही असते, असे दुबे यांनी सांगितले. स्टेट बँकेप्रमाणे अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक व अन्य अनेक बँकांनी याच कारणासाठी प्रदर्शनात सहभाग केला असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग क्षेत्र मात्र नरमलेलेच!
ग्राहकांमध्ये खरेदीचे मनोबल उंचावले असले तरी, उद्योग क्षेत्राचा मानस तितकासा बदललेला नाही, नवीन प्रकल्प गुंतवणूक अथवा विस्ताराच्या योजनांना अद्याप गती आलेली नाही, असे स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक सुधीर दुबे यांनी स्पष्ट  केले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून उपलब्ध माहितीनुसार, सरलेल्या ऑगस्ट महिन्यात देशाच्या बँकिंग व्यवस्थेत ग्राहक कर्जामध्ये वर्षांगणिक १२.८ टक्क्यांची वाढ दिसून आली, तर उद्योगधंद्यांना कर्जवितरणात ७.६ टक्क्यांची वाढ दिसून आली. चालू ऑक्टोबर महिन्यात तर ग्राहक कर्जामध्ये आणखी मोठी वाढ दिसण्याची शक्यता आहे, असे दुबे यांनी सांगितले.