मुंबई शेअर बाजाराची इमारत पर्यटकांसाठी लवकरच खुली करण्यात येणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे शब्द महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ट्रेडमार्क म्हणून शासनाच्या ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बठक सोमवारी येथे पार पडली. यावेळी पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील डेक्कन ओडिसी व त्याचे बोधचिन्ह यांची ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करणे, घृष्णेश्वर-वेरुळ परिसरात पर्यटन विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर महादेव वनाची निर्मिती करण्याकरीता वन विभागास जागा उपलब्ध करुन देणे, माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय सुविधा विकसित करणे, घारापुरी बेटावरील गावकऱ्यांना महामंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठयाबाबच्या प्रस्तावांना या बैठकीत मान्यता देण्यात आली. जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपाटी दरम्यान सी-प्लेनद्वारे हवाई सफर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी काही अटी व शर्तीवर मान्यता दिली असून पर्यटकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गिरगाव चौपाटी येथील जलक्रीडा केंद्राशेजारील जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सह व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी आदी उपस्थित होते.