फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीची गुंतवणूकदारांमध्ये चिंता

सलग दोन व्यवहारांतील तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गुरुवारी घसरण नोंदविली. तर निफ्टीतही घट राहिली. फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदरवाढीने गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली. ८०.१८ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ३१ हजारावर येऊन ठेपला. सेन्सेक्स ३१,०७५.७३ वर थांबला. तर ४०.१० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९,६००च्या खाली, ९,५७८.०५ वर स्थिरावला.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केल्याचे सावट बाजारात उमटले. गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री करत नफेखोरीचा अवलंब केला. मात्र यामुळे प्रमुख निर्देशांक त्यांच्या महत्त्वाच्या टप्प्यापासून काहीसे ढळले. गेल्या सलग दोन व्यवहारातील तेजीचे सत्र गुरुवारच्या सकाळच्या व्यवहारातही कायम राहिले. ३१,२२९.४४ पर्यंत झेप घेतल्यानंतर सेन्सेक्सने दिवसअखेर सत्रातील तळात स्थिरावणे पसंत केले.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा गुरुवारचा प्रवास ९,६२१.४० ते ९,५६०.८० दरम्यान राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक दिवसअखेर मात्र ९,६००च्याही खाली स्थिरावला.

परकी चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या २३ पैशांनी घसरणीचीही चिंता भांडवली बाजारात उमटली. फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीमुळे डॉलर अधिक भक्कम होऊन रुपयाच्या विस्तारित घसरणीची शक्यता वर्तविली जात आहे.

सेन्सेक्समधील ३० पैकी टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, ओएनजीसी, महिंद्रू अँड महिंद्र, कोल इंडिया यांचे मूल्य २.४२ टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू सर्वाधिक, १.१५ टक्क्य़ांनी घसरला.