तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या वीस दिवसांपासून चाललेल्या रटाळ, कंटाळवाण्या स्वरूपाच्या घसरणीसदृश अंधाऱ्या वातारणातून निफ्टी निर्देशांकाने निर्णायक मुसंडी मारली. अगोदरच्या उच्चांकाला गवसणी घालून तेजीच्या नवनव्या दालनात निर्देशांकाचा प्रवेश सुकर झाल्याच्या आनंदी, उत्साही वातावरणाला कविवर्य सुधीर मोघे यांच्या गाजलेल्या गीतातील वरील ओळी चपखलपणे लागू पडतात.

पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची वाटचाल :

  • शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स- २९,९१८.४० निफ्टी- ९,३०४.०५
  • गेल्या आठवडय़ातील लेखात एक महत्त्वाचे वाक्य होते. ‘जोपर्यंत निर्देशांक २९,२४०/ ९,०७५ चा स्तर टिकवून आहेत तोपर्यंत नवनवीन तेजीची दालने निर्देशांकासाठी उघडत जातील.’ याचा प्रत्यय आपण अनुभवत आहोत. आता उच्चांक मारून चालू असलेल्या संक्षिप्त घसरणीचे पहिल खालचे उद्दिष्ट २९,६००/ ९,१५०- ९,२०० आणि त्यानंतर कदाचित २९,०००/ ९,००० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो.
  • त्यानंतर मात्र निर्देशांक पुन्हा ३०,५००/ ९,३८० ते ९,४५० हे निर्देशांकाचे प्रथम वरचे उद्दिष्ट व त्यानंतर ३१,०००/ ९,५०० ते ९,६०० पर्यंत झेपावेल.

सोने किमतीचा आढावा : निफ्टी मंदीतून सावरली व सोने गडगडले. ही घसरण एवढय़ा तीव्र स्वरूपाची होती की सोन्याने आपला २९,००० रुपयांचा भरभक्कम आधार तोडला. आजही सोने ३०० रुपयांच्या पट्टय़ात हलते राहील. तो पट्टा २८,४०० – २८,७०० – २९,००० व २९,३०० हा सोन्याचा सामान्य मार्गक्रमण मार्ग असेल. (सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)

सलग घसरणीने सेन्सेक्स ३० हजारांखाली! साप्ताहिक स्तरावर मात्र निर्देशांकांची मार्चनंतरची सर्वोत्तम झेप..

मुंबई : गेल्या सलग व्यवहारातील तेजीसह सर्वोच्च टप्प्याला पोहोचलेल्या प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहअखेर सलग घसरणीने माघार घेतली. परिणामी सेन्सेक्सने शुक्रवारी ३० हजारांचा अनोखा टप्पा सोडला, तर निफ्टी जेमतेम ९,३०० वर स्थिरावला.

१११.३४ अंश घसरणीसह सेन्सेक्स २९,८४८.२१ वर तर ३८.१० अंश नुकसानीसह निफ्टी ९,३०४.०५ वर थांबला. तथापि सेन्सेक्स-निफ्टीने अनुक्रमे ५५३.१० व १८४.६५ वाढीसह मार्चनंतरची सर्वोत्तम सप्ताहझेप या आठवडय़ात नोंदविली आहे.

प्रमुख निर्देशांक अद्यापही त्यांच्या गेल्या सहा आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर आहेत. सलग तीन सत्रांतील तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराची सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात निर्देशांक वाढीसह झाली. मात्र व्यवहारात तो २९,८४८.२१ पर्यंत घसरला. नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात निफ्टी प्रवासही ९,३४२.६५ वरून ९,२८२.२५ पर्यंत खाली आला.

सेन्सेक्समधील ११ समभागांचे मूल्य घसरले, तर १९ समभाग तेजीच्या यादीत राहिले. सर्वाधिक नुकसान आयटीसीच्या समभागाला २.२८ टक्क्यांच्या रूपात झाले. तसेच एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर, भारती एअरटेल, रिलायन्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो हेही घसरले. मूल्यवाढ नोंदविणाऱ्या समभागांमध्ये ओएनजीसी, स्टेट बँक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, गेल, हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, कोल इंडिया यांचा ३.७६ टक्क्यांपर्यंतचा समावेश राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिडक व स्मॉल कॅप अनुक्रमे ०.१८ व ०.६१ टक्क्यांसह वाढले. येत्या सोमवारी कामगार दिनानिमित्ताने भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत.