अ‍ॅक्सिससह बँक समभागांवर दबाव

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निकालात बँकिंग क्षेत्राची सुमार कामगिरी बजावत असल्याचे बुधवारी भांडवली बाजारावर विपरीत पडसाद उमटले.

सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना सेन्सेक्स बुधवारी २५४.९१ अंश आपटीने २८ हजाराच्याही खाली उतरला. मुंबई निर्देशांक २७,८३६.५१ वर स्थिरावला. तर निफ्टी ७६.०५ अंश घसरणीसह ८,६१५.२५ पर्यंत खाली आला.

खासगी क्षेत्रातील तिसऱ्या स्थानावरील अ‍ॅक्सिस बँकेने वाढीव अनुत्पादित मालमत्ता तसेच नफ्यातील घसरणीचे तिमाही निष्कर्ष बुधवारी जाहीर केले. परिणामी बाजारातील एकूणच बँक समभागांवर झाला. मुंबई शेअर बाजारातील एकूण बँक निर्देशांक १.८९ टक्क्यांनी घसरला. तर नफ्यात ९० टक्क्यांची घसरण नोंदविणाऱ्या अ‍ॅक्सिसचा सेन्सेक्समध्ये घसरणीत सर्वात वरचा क्रम राहिला. या समभागाचे मूल्य मंगळवारच्या तुलनेत दिवसअखेर ८ टक्क्यांहून अधिक घसरले. बँकेचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात १०,१३३ कोटी रुपयांनी खाली आले. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक हे घसरणीतील इतर बँक समभाग राहिले. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, विप्रो, एशियन पेंट्स, सिप्ला, पॉवर ग्रिड, सन फार्मा, ल्युपिन, गेल, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे मूल्य ३.६५ टक्क्यांपर्यंत घसरले. टाटा सन्समधील घडामोडींमुळे समूहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस यांचे समभाग मूल्य बुधवारी आणखी खाली आले. बँकनंतर पोलाद, पायाभूत सेवा, आरोग्यनिगा निर्देशांक १.३७ टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९० व ०.६६ टक्क्याने घसरले.