नव्या सप्ताहाची सुरुवात घसरणीने करणारा मुंबई शेअर बाजार सोमवारी दीड महिन्यांच्या तळात विसावला. महागाईचा दर नरम होऊनही घसरत्या रुपयाबद्दल चिंता व्यक्त करीत गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी विक्री अवलंबिली. सत्रात तब्बल २४५ अंशांपर्यंत आपटल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत ३१.१२ अंशाने घसरत २७,३१९.५६ पर्यंत घसरला. तर व्यवहारात ८,२०० चा स्तर सोडणारा निफ्टी दिवसअखेर ४.५० अंश घसरणीने ८,२१९.६० वर थांबला.
परकी चलन व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६२.५० च्याही खाली प्रवास करताना थेट ६३ नजीक जाण्याचा प्रयत्न केला. चलनाचा हा गेल्या ११ महिन्यांतील नीचांक होता. तर याचदरम्यान नोव्हेंबरमधील घाऊक किंमत nirdeshankनिर्देशांक शून्यावर येऊनही बाजारात उत्साह दिसला नाही. ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनाच्या ४.२ टक्केदराने गुंतवणूकदारांमध्ये अद्यापही निराशाच आहे. तेल व वायू, बँक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये २१ समभाग घसरले. यामध्ये सेसास स्टरलाइट, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, टाटा मोटर्स, हिंदुस्तान यूनिलिव्हर, इन्फोसिस, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा स्टील, रिलायन्स यांचा समावेश होता.
गेल्या आठवडय़ात सलग दोन व्यवहारांत सेन्सेक्समध्ये ४८०.४२ अंशांची उतार नोंदला गेला आहे.

कमी महसुलीबाबत टीसीएसची चिंता
चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षित महसुलाबाबत चिंता व्यक्त केल्याने टाटा समूहातील टीसीएसचा समभाग व्यवहारात ४ टक्क्यांपर्यंत आपटला. भारताबाहेरील व्यवसायामुळे अधिक महसूल मिळणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने ख्रिसमस व नव्या वर्षांच्या सुटय़ांमुळे विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होती.
सत्रात त्याला २,३५६.४५ रुपये असा नीचांक भाव मिळाला. तर व्यवहाराअखेर तो ३.७८ टक्क्यांनी घसरत २,३६२.८० रुपयांवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये घसरणीत तो सर्वात वर राहिला. शुक्रवारीही समभागात १.५ टक्के आपटी नोंदली गेली. सलग दोन दिवसांतील मोठय़ा घसरणीमुळे कंपनीचे बाजारमूल्य २५,४१३.७५ कोटी रुपयांनी खालावले.