सलग आठ सत्रांतील तेजी भांडवली बाजाराने सप्ताहअखेरीस मोडीत काढली. याचबरोबर सेन्सेक्ससह निफ्टीदेखील त्याच्या सर्वोच्च शिखरापासून ढळला. गेल्या दोन्ही व्यवहारांत विक्रमी स्तरावर असलेल्या बाजारात वधारलेल्या मूल्यांवर समभागांची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधली.
शुक्रवारी १४५.१० अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,१२६.७५वर, तर निफ्टी ४०.१५ अंश नुकसानासह ७७९०.४५वर येऊन ठेपला. निफ्टीने ७८००ची पातळी सोडली असली तरी सेन्सेक्सचा २६ हजारांपुढील प्रवास मात्र कायम राहिला आहे. बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालांवर पसंती दर्शवीत या कालावधीत विशेषत: विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली.
बुधवार व गुरुवार असे सलग दोन दिवस सेन्सेक्ससह निफ्टीने सर्वोच्च टप्पा राखला होता. तसेच सप्टेंबर २०१२नंतरची सलग आठ सत्रांतील निर्देशांकाची वाढ नोंदवली होती. असे करताना सेन्सेक्स २६ हजारांच्या वर २६,३०० पर्यंत पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ७८०० हा स्तर इतिहासात प्रथमच पार केला होता.