बिर्ला समूहातील सर्वात मोठी कंपनी आदित्य बिर्ला नुवो लि.ची संपूर्ण अंगीकृत कंपनी ‘एबीएनएल आयटी आणि आयटीईएस लि.’ने शुक्रवारी बीपीओ व्यवसायात कार्यरत असलेल्या ‘आदित्य बिर्ला मिनक्स वल्र्डवाइड लि.’मधून संपूर्ण अंग काढून घेतल्याची घोषणा केली. सीएक्स पार्टनर्स आणि कॅपिटल स्क्वेअर पार्टनर्सच्या नेतृत्वाखालील वित्तीय गुंतवणूकदारांना या कंपनीतील सर्व हिस्सा विकण्यात येणार असल्याचे कंपनीने ३० जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. हा व्यवहार आज पूर्ण करण्यात आला. अशा तऱ्हेने आयटी आणि आयटीसंलग्न सेवा व्यवसायातून आदित्य बिर्ला समूह पूर्णपणे बाहेर पडला आहे, असे आदित्य बिर्ला नुवोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राकेश जैन यांनी सांगितले. तथापि नात्याचा हा शेवट नसून, यापुढेही समूहातील कंपन्यांची कामे मिनक्सद्वारे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणानुसार, कंपनीने गेल्या वर्षी कार्बन ब्लॅक व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय अमलात आणला आहे. या निर्गुतवणुकीतून मिळालेल्या निधीचा विनियोग कंपनीकडून कर्जदायित्व कमी करण्यासाठी आणि त्यायोगे वित्तीय ताळेबंदाला सशक्त बनविण्यासाठी केला जाईल, असे जैन यांनी सांगितले.
‘बालाजी अमाइन्स’कडून ५०% लाभांश
मुंबई: विविध उद्योगांमध्ये वापरात येणाऱ्या औद्योगिक रसायनांच्या निर्मिती व निर्यातीतील अग्रेसर कंपनी बालाजी अमाइन्सची महाराष्ट्रातील सोलापूरस्थित हॉटेल मालमत्ता कार्यान्वित झाली असून, नामांकित सरोवर समूहाकडून ती चालविली जात आहे. कंपनीने गेल्या वर्षी आदरातिथ्य व्यवसायात पाऊल टाकल्याची घोषणा केली होती. सरलेल्या जाने-मार्च २०१४ तिमाहीत या हॉटेल व्यवसायाचे महसुली योगदान तब्बल ५२.२ टक्क्यांनी उंचावले आहे. परिणामी २०१३-१४ या संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनीचे उत्पन्न ५११.८० कोटींवरून ६१०.१३ कोटी असे १९.२ टक्क्यांनी वाढले आहे. परिणामी करोत्तर नफाही ३१.१८ कोटींवरून यंदाच्या मार्चअखेर ३३.५३ कोटी रुपयांवर गेला आहे. या उमद्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीने २ रुपये दर्शनी मूल्याच्या समभागावर प्रत्येकी १ रुपया (५०%) अंतिम लाभांश तिच्या भागधारकांना जाहीर केला आहे.
शेव्हर्लेच्या एन्जॉयची वर्धापनदिन आवृत्ती
मुंबई: जनरल मोटर्स समूहातील पहिल्या मल्टिपर्पज व्हेईकल श्रेणीने भारतातील व्यवसायाचे एक वर्ष पूर्ण केले आहे. कंपनीने यानिमित्ताने तिच्या शेव्हर्ले नाममुद्रेच्या एन्जॉयची वर्धापनदिन आवृत्तीही सादर केली आहे. मे २०१३ मध्ये सादर झालेल्या एन्जॉयची संख्या २० हजार झाली आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सक्सेना यांनी दिली. सात व आठ आसनी प्रकारातील व सहा विविध रंगांतील या वाहनाची विशेष आवृत्ती ही मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
मुंबईच्या गंगर आयनेशनचा कच्छमध्ये विस्तार
मुंबई : नेत्रनिगा व संबंधित उपकरण क्षेत्रातील मुंबईच्या आघाडीच्या गंगर आयनेशनचे गुजरातेतील गांधीधाम येथे नवे दालन अस्तित्वात आले आहे. कच्छ भागातील कंपनीचे हे पहिले दालन आहे. कच्छसारख्या भागात सेवा पुरविताना आम्हाला आनंद होत असून ही नाममुद्रा देशस्तरावर विस्तारित करण्याचा आमचा मानस असल्याचे कंपनीचे संचालक प्रज्ञेश गंगर यांनी सांगितले. शहरातील चावला चौकातील कंपनीचे हे नवे दालन आहे. १९७७ ची स्थापना असलेल्या गंगर आयनेशनची मुंबई, पुणे, सुरत, वडोदरा, अहमदाबादसह एकूण ४० हून अधिक दालने आहेत.