मुंबई-ठाणेकरांची वाढत्या निवाऱ्याची मागणी प्रसंगी कंपन्यांना त्यांचे उत्तम स्थितीतील प्रकल्प हलवून जागा रिकामी करण्यास भाग पाडत आहे. शहरातील प्रकल्पाची जागा बिल्डर-विकसकांना देण्याचा कित्ता गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांनी गिरविला आहे. याच क्रमात ‘क्लॅरियन्ट केमिकल्स’ने ठाण्यातील ८७ एकर जागा बांधकाम क्षेत्रातील लोढा डेव्हलपर्सला १,१५४ कोटी रुपयांना विकण्याचा मंगळवारी सौदा केला. जमीन विक्रीसाठी झालेल्या बोली प्रक्रियेत लोढासह कल्पतरू, ओबेरॉय तसेच रुणवाल असे या क्षेत्रातील अन्य बिल्डरही सहभागी झाले होते.
मूळ स्वित्झर्लण्डची भारतीय कंपनी असलेल्या ‘क्लॅरियन्ट केमिकल्स’च्या ताज्या सौद्यातून जागेच्या व्यवहारातून तिने दशकभरात ७५ ते ८५ टक्क्यांनी कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ मध्ये ठाण्यातच एकरसाठी २ कोटी रुपये भाव मोजणाऱ्या ‘क्लॅरियन्ट’ने आता, २०१४ मध्ये प्रति एकरमागे जवळपास १३.२६ कोटी रुपये कमावले आहेत. तर मुंबई उपनगरात यासाठीचे भाव आता एकरमागे ३० ते ४५ कोटी रुपयांच्याही पुढे गेले आहेत. ठाण्यानजीकची मुकंद, भांडूपमधील सिएटच्या जागा यापूर्वीच रिकाम्या झाल्या आहेत.
ठाण्यातील ही जागा विकण्याचा ठराव ‘क्लॅरियन्ट’ने जुलैमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतच पारित केला होता. कोलशेत भागातील एक निर्मिती विभाग ठाण्यानजीकच्या भिवंडी येथे स्थलांतरित करण्यासही त्या वेळी परवानगी देण्यात आली होती. तर सप्टेंबरमध्ये कंपनीचा वस्त्र रसायन विभाग, कागदनिर्मिती विभाग आर्कोमा इंडियाला २०९ कोटी रुपयांचे देण्याचे सप्टेंबर २०१३ मध्येच मान्य करण्यात आले होते. यातील काही भाग कंपनीने रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे हलविला. ठाण्यातील जागा टप्प्या-टप्प्याने विकण्याची ‘क्लॅरियन्ट’ची प्रक्रिया २००४ पासून सुरू आहे. कंपनीने बाळकूम येथील २५ एकर जागा बांधकाम क्षेत्रातीलच कल्पतरू समूहाला ५० कोटी रुपयांना विकली होती. यानंतर सहा वर्षांनी याच समूहाने कंपनीकडून आणखी ३५ एकर जागा २४० कोटी रुपयांना खरेदी केली. कंपनीने आता ८७ एकर जागा १,१५४.२५ कोटी रुपयांना विकली आहे. मेसर्स ईश्वर रिएल्टी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या लोढा डेव्हलपर्सच्या उपकंपनीमार्फत हा व्यवहार झाला आहे.
गेल्याच महिन्यात टाटा स्टीलने तिची बोरिवलीतील २५ एकर जागा ओबेरॉय रिएल्टीला १,११५ कोटी रुपयांनी विकली. तर याच दरम्यान केईसी इंटरनॅशनलने ७ एकर जागा टाटा हाऊसिंगला २१४ कोटी रुपयांना दिली. तर लोढा डेव्हलपर्सने यापूर्वी २०१२ मध्ये लोअर परेल येथील डीएलएफची १७ एकर जागा २,७२५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. मुंबई, ठाण्यासह पुणे आणि हैदराबाद येथे बांधकाम विकास करणाऱ्या लोढा डेव्हलपर्सतर्फे विविध २० प्रकल्पांसाठी ३.५ कोटी चौरस फूट जागा विकसित करण्यात येत आहे.