यंदा अक्षय्य तृतीयेला विक्रमी विक्रीत अपेक्षित

लग्नसराईचा हंगाम सुरू असताना, शुक्रवारी म्हणजे सप्ताहअखेरीस आलेल्या यंदाच्या अक्षय्य तृतीयेला देशभरात सोने विक्रीत गेल्या वर्षांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढीचा सुवर्ण उद्योगाचा अंदाज आहे.

सोन्याच्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन (जीजेएफ)चा कयास आहे. निश्चलनीकरणानंतर आलेल्या सोने खरेदीच्या या पारंपरिक मुहूर्ताला ग्राहकांच्या मागणीबद्दल सराफ वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

सध्याची परिस्थिती पाहता सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंमत हाच या व्यवसायाच्या विकासातील महत्त्वाचा घटक असेल. अनेक सराफांनी ग्राहकांच्या मागणीत वाढ होण्यासाठी जोमदार अशा मोहिमा आणि विविध आकर्षक सवलतींच्या घोषणा केल्या आहेत. एकुणात मागणी पाहता जास्तीत जास्त विक्री आणि गेल्या वर्षांच्या तुलनेत त्यात २० ते ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे, असे जीजेएफचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हणाले.

जागतिक पातळीवरील राजकीय व आर्थिक स्थिती चिंताजनक नाही. त्यामुळेच सोन्याच्या किमतीत यापुढे स्थिरपणे वाढ सुरू राहील असे वाटते, असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. जीएसटी करप्रणाली लवकरच लागू होत असल्याने सोने नजीकच्या भविष्यात महाग होईल, याची लोकांना कल्पना आहे. शेअर बाजार आजवरच्या उच्चांकी पातळीला पोचले आहे. दक्षिण भारतात तर यंदा अक्षय्य तृतीया २८ एप्रिल आणि २९ एप्रिल या दोन्ही दिवशी साजरी होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना शुभमुहूर्तावर सोने खरेदीची वाढीव संधी मिळणार आहे. हे सर्व घटक लक्षात घेता ही अक्षय्य तृतीया सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साहाची व विक्रम नोंदवणारी ठरेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीत यंदा किमान ४० टक्के वाढ होण्याची अपेक्षा गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे. पीएनजी ज्वेलर्सने हिऱ्यांच्या अलंकारांच्या घडणावळीत ५० टक्के, तर सुवर्ण अलंकारांच्या घडणावळीत १० टक्के सवलत देऊ  केली आहे.

निश्चलनीकरणानंतर सोने खरेदीचा हा पहिला महत्त्वाचा दिवस आहे, तर वस्तू व सेवा करप्रणाली लागू होण्यापूर्वीचा हा शेवटचा खरेदी मुहूर्त आहे. यामुळेच अक्षय्य तृतीयेला विक्रीला जोरदार चालना मिळेल अशी उद्योगक्षेत्राला खात्री वाटते. शिवाय चांगल्या मान्सूनचे भाकीत येत्या वर्षांतील शाश्वत विक्रीसाठी मदतकारक ठरू शकेल.  नितीन खंडेलवाल, अध्यक्ष जीजेएफ

निश्चलनीकरणानंतर रक्कम अदा करण्याचे अधिक उत्तम पर्याय आणि बँकांचा पाठिंबा यामुळे सोने व्यवहारांत तेजी राहील. विशेषत: लग्नासाठी वधूचे अलंकार, सोन्याची नाणी, हिऱ्यांचे अलंकार यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने मुहूर्ताला आकर्षक किमत व सवलतीत या दागिन्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होईल.  सौरभ गाडगीळ, अध्यक्ष पीएनजी ज्वेलर्स