घसरत्या तेल, सोने आयातीने सरकारी तिजोरीवरील भार हलका
रांगेत सलग १६ व्या महिन्यात घसरताना देशातील निर्यात मार्चमध्ये २२.७१ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे. वार्षिक तुलनेत त्यात ५.४७ टक्के घसरण झाली आहे.
आयातीत २१.५६ टक्के (२७.७८ अब्ज डॉलर) घसरण झाली असून व्यापार तूट गेल्या महिन्यात ५.०७ अब्ज डॉलर राहिली आहे. आयात – निर्यातील फरक समजली जाणारी व्यापार तूट वर्षभरापूर्वी – मार्च २०१५ मध्ये ११.३९ अब्ज डॉलर होती.
एकूण २०१५-१६ या आर्थिक वर्षांत निर्यात १५.८५ टक्क्य़ांनी कमी होत ती २६१.१३ अब्ज डॉलर; तर आयात १५.२८ टक्क्य़ांनी घसरत ती ३७९.६० अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळे गेल्या आर्थिक वर्षांतील एकूण व्यापार तूट ११८.४५ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. भारताचा अमेरिका (१०.८१%), युरोपीय यूनियन (७.४०%), चीन (११.३७%) व जपानमधील (१२.८५%) आदींमधील निर्यात हिस्सा यंदा रोडावला आहे. पेट्रोलियम पदार्थाची निर्यात २१.४३ टक्क्य़ांनी घसरली आहे. तसेच अभियांत्रिकी वस्तू निर्यात ११.२९ टक्क्य़ांनी खाली आली आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये तेल आयात १५.२८ टक्क्य़ांनी तर सोने आयात ८०.४८ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरील भार काही प्रमाणात हलका झाला आहे.