निर्ढावलेल्या कर्जबुडव्यांना अर्थमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

मद्यसम्राट विजय मल्या यांनी बँकांची थकबाकी सन्मानाने परत करावी अन्यथा ऋणको आणि तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कडक कारवाईला सामोरे जावे, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. आपल्याला व्यक्तिगत प्रकरणात भाष्य करण्यात स्वारस्य नाही, मात्र विजय मल्या यांच्यासारख्या बडय़ा समूहांनी बँकांच्या थकबाकीची परतफेड करावी, असे जेटली म्हणाले.

विजय मल्या यांच्याकडील थकबाकी नऊ हजार कोटी रुपये इतकी आहे, बँका आणि अन्य यंत्रणांकडे काही कठोर उपाय आहेत आणि त्याबाबत संबंधित यंत्रणा तपास करीत आहेत, असेही अर्थमंत्री म्हणाले.

सार्वजनिक बँकांमध्ये लवकरच अतिरिक्त ५,०५० कोटींचे सरकारी भांडवल

वाढत्या बुडित कर्जाचा सामना करणाऱ्या  सार्वजनिक बँकांमध्ये सरकार लवकरच आणखी ५,०५० कोटी रुपये भांडवल ओतण्याच्या तयारीत आहे. काही बँकांना अर्थसाहाय्याचा सरकारचा निर्णय चालू आठवडय़ातच होण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीलाच संसदेने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यानुसार यंदाच्या फेऱ्यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, विजया बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांना लाभ होण्याचे सांगितले जाते. चालू आर्थिक वर्षांत बँकांना द्यावयाच्या २५,००० कोटी रुपयांच्या सरकारच्या धोरणाचा भाग म्हणूनच ही रक्कम दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ सार्वजनिक बँकांना १९,९५० कोटींचे अर्थसाहाय्य दिले गेले होते. पैकी स्टेट बँकेला सर्वाधिक ५,३९३ कोटी मिळाले आहेत.