निफ्टी ७,४०० खाली तर सेन्सेक्समध्ये घसरण; घसरत्या रुपयाचाही सप्ताहारंभी दबाव

सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या नव्या आकडय़ाच्या पाश्र्वभूमीवर भांडवली बाजारात सप्ताहारंभी समभाग विक्रीचा दबाव निर्माण झाला. परिणामी एकाच सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ३०० हून अधिक अंशांनी खाली आला. तर शतकी घसरणीने निफ्टीही ७,४०० चा स्तर सोडता झाला.

मुंबई निर्देशांकांत गेल्या शुक्रवारच्या तुलनेत ३२९.५५ अंश घसरण होऊन सेन्सेक्स २४,२८७.४२ वर स्थिरावला. निर्देशांकातील एकाच व्यवहारातील ही २० जानेवारीनंतरची सर्वात मोठी घसरण ठरली. गेल्या दोन व्यवहारात सेन्सेक्स मात्र ३९३.६५ अंशांनी वाढला होता. १०१.८५ अंश नुकसानासह निफ्टी ७,३८७.२५ वर थांबला. निफ्टी व्यवहारात ७,५१२.५५ ते ७,३८७.२५ दरम्यान राहिला. सेन्सेक्स सत्रात २४,६९८.९५ पर्यंत पोहोचला होता.

चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील भारताच्या विकास दराबाबतची उत्सुकता बाजाराने सुरुवातीपासून अनुभवली. सोमवारच्या सत्राची सुरुवात स्थिरकडून घसरणीकडे होताना बाजारात युरोपातील बाजाराच्या घसरणीचा प्रभाव दिसला. लुनार वर्षांरंभाच्या निमित्ताने प्रमुख आशियाई बाजार सोमवारी बंद होते.

सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, आयटीसी, ओएनजीसी, सन फार्मा, टीसीएस, विप्रो, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचडीएफसी लिमिटेड, हिंदुस्थान यूनिलिव्हर, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आदींचे मूल्य घसरले. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले.

तर अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, भारती एअरटेल, ल्युपिन, गेल, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील हे समभाग तेजीच्या यादीत स्थिरावले. कमी इंधन दर आणि वाढणारी प्रवासी संख्या या जोरावर गेल्या तिमाहीत ४६७ कोटी रुपये नफा कमाविणारा जेट एअरवेज सत्रअखेर ४ टक्क्य़ांनी उसळला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.९५ टक्क्य़ांसह माहिती तंत्रज्ञान निर्देशांक घसरणीत सर्वात पुढे राहिला. पाठोपाठ वाहन, आरोग्यनिगा आदी निर्देशांकांमध्ये एक टक्क्य़ांहून अधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅपमध्ये मात्र किरकोळ अगदी पाव टक्क्य़ांहनही कमी घसरण राहिली. डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा सत्रातील ३० पैसेपर्यंतच्या घसरणीच्या प्रवासाचीही चिंताही बाजाराने वाहिली.

स्टील समभाग मूल्यांमध्ये चकाकी

स्वस्त स्टील आयातीचा संबंधित स्थानिक बाजारपेठेला फटका बसू नये म्हणून सरकारने सोमवारी निश्चित केलेल्या किमान आयात दर निर्णयाचे बाजारात स्वागत झाले. या क्षेत्राशी संबंधित भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग सप्ताहारंभी ६ टक्क्य़ांहून अधिक वाढले. यामध्ये भूषण स्टील ६.२८% तर जेएसडब्ल्यू स्टील व टाटा स्टील अनुक्रमे ०.९९% व ०.१९% वाढले.