गुजरातमधील प्रकल्प गुंडाळून महाराष्ट्रात वाहननिर्मितीची मनीषा व्यक्त करणाऱ्या अमेरिकी जनरल मोटर्सने दहा वाहने तयार करण्याचे ध्येय राखले आहे. भारतात १९९६ मध्ये शिरकाव करणाऱ्या जनरल मोटर्सचा सध्या वाहन बाजारपेठेत अवघा १.८ टक्के हिस्सा आहे.
शेव्‍‌र्हले नाममुद्रेंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहने तयार करणाऱ्या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात भेट घेतली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी व सहमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हेही या वेळी उपस्थित होते.
कंपनीचे पुण्यानजीकच्या तळेगाव प्रकल्पातील वाहन उत्पादन येत्या दोन वर्षांत सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. अन्य एक अमेरिकी वाहन कंपनी क्रिसलरने राज्यात २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे मान्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कंपनी भारतात ६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट करतानाच बॅरा यांनी कंपनीचा गुजरातेतील हलोल येथील प्रकल्प गुंडाळणार असल्याचे नमूद केले होते. यानुसार जनरल मोटर्स महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करेल, असेही त्या म्हणाल्या. बॅरा यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत ‘मेक इन इंडिया’साठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.