हिंदुजा समूहातील गल्फ ऑईल ल्युब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड गुरुवारी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारातही सूचिबद्ध झाली. मुंबई शेअर बाजार इमारतीत यावेळी पारंपरिक घंटानादाने कंपनीच्या समभागांच्या व्यवहारांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गल्फ ऑईल इंटरनॅशनलचे वित्त संचालक पीटर हटन, गल्फ ऑईल ल्युब्रिकन्ट्सच्या संचालक कांचन चितळे, अध्यक्ष संजय हिंदुजा, व्यवस्थापकीय संचालक रवी चावला, मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान व कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मनीष कुमार गंगवाल आदी उपस्थित होते. कंपनीने व्यवसाय विस्ताराची घोषणा करताना चेन्नई येथे ७५ हजार टन वार्षिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी १४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे स्पष्ट केले आहे. याच क्षमतेचा कंपनीचा एक प्रकल्प सध्या सिल्व्हासा येथे आहे. वंगण क्षेत्रातील या कंपनीने आगामी कालावधीत ७ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य राखले आहे.