केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर येणाऱ्या भाजपाप्रणित मोदी सरकारने सोमवारी वर्षपूर्ती केली. या दरम्यान भांडवली बाजाराची मालमत्ता १० लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
या कालावधीत मूल्य तेजी नोंदविणाऱ्या समभागांमध्ये अदानी, भारती, टाटा, एचडीएफसी, सन समूहाचा समावेश राहिला आहे. दोन्ही रिलायन्स समूहासह वेदांता, आयटीसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो यांच्या बाजारमूल्यात मात्र गेल्या वर्षभरात घसरण झाली आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल २० टक्क्य़ांनी आपटले आहे. तर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचे मूल्य ५० हजार कोटी रुपयांनी खाली आले आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी शपथ घेतली होती. गेल्या वर्षभरात भांडवली बाजाराच्या माध्यमातून संपत्ती संचय करणाऱ्यांमध्ये बिर्ला, महिंद्र, आयसीआयसीआय, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचाही क्रम राहिला आहे. त्याचबरोबर इन्फोसिस, विप्रो, एचसीएस या आयटी कंपन्यांनीही साथ दिली आहे.
वार्षिक तुलनेत भांडवली बाजार १२ टक्क्य़ांनी वाढला आहे. सेन्सेक्सची वाढ २,९५० अंश आहे. मुंबई निर्देशांकाने ३० हजार हा विक्रमी टप्पा याच वर्षांत गाठला. तर बाजार मालमत्तेचा १०० लाख कोटी रुपयांचा टप्पाही याच वर्षांत नोंदला गेला.
भारतात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्यांना पूर्वलक्ष प्रभावाने भांडवली कर लावण्याच्या सरकारच्या धास्तीने बाजारातून एकटय़ा एप्रिलमध्ये ९०० कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. त्यापासून यंदाच्या मेमध्ये बाजार काहीसा सावरला आहे.
8