तिमाही व्याज दर फेररचना होणार!
अन्य व्याजदरांशी सांगड घालण्यासाठी सरकार येत्या एक-दोन दिवसांत अल्पबचतीच्या व्याजाच्या दरांची फेररचना करणार आहे. मात्र मुलींसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांच्या व्याजदरांत बदल करण्यात येणार नाहीत.
सरकारने याबाबत निर्णय घेतला असून त्या संदर्भातील अधिसूचना व आदेश एक-दोन दिवसांत जारी केला जाणार आहे, असे केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.
अल्पबचतीचे दर सरकारी रोख्यांशी निगडित असतात आणि दरवर्षी त्यांची फेररचना केली जाते. आता लवकरच तिमाही तत्त्वावर त्यांची फेररचना केली जाणार आहे. नवे दर १ एप्रिल २०१६ पासून लागू होणार आहेत, असेही सचिवांनी सांगितले.
सुधारित व्याजदरांची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी होईल. अल्पबचत योजनेमध्ये पोस्टाची मासिक बचत योजना व मुदत ठेव योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आदींचा अंतर्भाव आहे. तथापि सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनांचे व्याजदर कायम राहण्याचे संकेत आहेत.