‘केर्न इंडिया’तील व्यवहाराच्या प्रकरणात दोन बँक अधिकारी दोषी
भारतात काळ्या पैशावरून चर्चेत राहिलेल्या एचएसबीसी बँकेतील विदेशी चलन गैरव्यवहार प्रकरणात भारताचेच नाव गोवले गेल्याचे उघड होत आहे. एचएसबीसी बँकेतील ३.५ अब्ज डॉलरच्या गैरव्यवहाराच्या मुळाशी भारतात झालेल्या केर्न एनर्जीशी निगडित व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अमेरिकेत कायदेशीर कारवाईही सुरू झाली आहे.
मूळची ब्रिटनची असलेल्या केर्न एनर्जीने तिची भारतातील उपकंपनी केर्न इंडियातील हिस्सा विक्रीबाबतचे हे प्रकरण आहे. २०१० मध्ये केर्न इंडियातील हिस्सा विकताना त्याचे रूपांतर स्टर्लिग या युरोपीय चलनात करण्याकरिता एचएसबीसीच्या या व्यवहाराची जबाबदारी असलेल्या मार्क जॉन्सन व स्टुअर्ट स्कॉट यांना कोटय़वधी डॉलरचा लाभ झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पैकी जॉन्सन यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात येऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तर २०१४ मध्येच एचएसबीसी सोडणाऱ्या स्टुअर्ट यांची अद्याप चौकशीच सुरू आहे.
याबाबतची तक्रार २०११ च्या अखेरीस करण्यात आली होती. तर केर्न एनर्जीने या व्यवहारासाठी एचएसबीसीची निवड ऑक्टोबर २०११ मध्ये केली होती.
जॉन्सन व स्कॉट यांनी या व्यवहारासाठी आधीच एचएसबीसीकरिता गैररीतीने विदेशी चलन खरेदी करून ठेवले व केर्न एनर्जीच्या प्रत्यक्षातील हिस्सा विक्रीच्या व्यवहारापर्यंत स्वत:जवळच राखून ठेवल्याचा आरोप आहे. दोघांनी याद्वारे बँकेच्या लाभाकरिता हा प्रकार केला असला तरी यापोटी ग्राहकाला नाहक खर्च आल्याचा दावा न्यायालयात बाजू मांडताना करण्यात आला. एचएसबीसीला विदेशी चलन व्यवहारामार्फत ८० लाख डॉलरचा फायदा झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.