मुंबई निर्देशांकामध्ये शतकी अंश भर; तर निफ्टी ९,५०० नजीक

वस्तू व सेवा कर प्रणालीचे स्वागत करताना भांडवली बाजार पुन्हा एकदा तेजीकडे वळला. सप्ताहारंभीच सेन्सेक्समध्ये शतकी भर पडली. मात्र निफ्टीत किरकोळ वाढ होत प्रमुख निर्देशांक ९,५०० नजीक पोहोचला. वस्तू व सेवा कर दररचनेच्या लाभार्थी समभागांना सोमवारीदेखील मागणी राहिली.

१०६.०५ अंश वाढीसह सेन्सेक्स दिवसअखेर ३०,५७०.९७ वर थांबला. तर निफ्टी १०.३५ अंश वाढीसह ९,४३८.२५ वर स्थिरावला. सेन्सेक्सने गेल्या सप्ताहाची अखेर ३० अंश वाढीसह केली होती. तर निफ्टीचा सप्ताहारंभीचा प्रवास सत्रात ९,४९८.६५ पर्यंत गेला होता.

वस्तू व सेवा कर दर निश्चितीसाठीची परिषदेची बैठकी शुक्रवारी समाप्त झाली. तत्पूर्वीच्या दोन्ही व्यवहारात बाजारात निर्देशांक वाढीने त्याचे स्वागत होतच होते. हाच क्रम नव्या सप्ताहारंभीदेखील कायम राहिला. मात्र निर्देशांकातील वाढ मोठय़ा प्रमाणात नव्हती.

सप्ताहारंभ करताना सेन्सेक्समध्ये शुक्रवारच्या तुलनेत २०० अंशांची भर पडली. मुंबई निर्देशांक यावेळी ३०,७०० नजीक होता. तर ६२ अंश वाढीसह निफ्टी ९,४९० पुढे होता. दुपापर्यंत निर्देशांकांमध्ये तेजीचा क्रम कायम असला तरी सत्रअखेरच्या टप्प्यात तो रोडावला. मात्र शुक्रवारच्या तुलनेत त्यात वाढ झाली.

वस्तू व सेवा कराचे टप्पे अधिक स्पष्ट झाल्यानंतर त्याचे लाभार्थी, जीवनावश्यक वापराच्या तसेच नित्याच्या वापराच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या समभागांचे मूल्य कमालीचे उंचावले. यामध्ये आयटीसीसारख्या ६ टक्के वाढ नोंदविणाऱ्या कंपनीच्या समभागाचाही समावेश होता. तसेच नेस्ले, ब्रिटानिया, मॅरिको, डाबर इंडियाचे समभाग मूल्य ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक ०.६१ टक्क्य़ांपर्यंत वाढला. तर भांडवली वस्तू निर्देशांक अध्र्या टक्क्य़ापर्यंत वाढला. तसेच माहिती तंत्रज्ञान निर्देशांकालाही मागणी राहिला.

सेन्सेक्समधील लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, रिलायन्स, विप्रो, अ‍ॅक्सिस बँक, इन्फोसिस आदी तेजीच्या यादीत राहिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागांना मात्र सोमवारी मोठा फटका बसला. त्यात बँक ऑफ इंडिया वाढत्या तोटय़ामुळे कमालीचा घसरला.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्य़ाहून अधिक घसरले.