भारतातील चहा मळे उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या टी बोर्ड ऑफ इंडियाने चहा व्यापाराला देशा-विदेशात प्रोत्साहन म्हणून चहा व कॉफी या गरम पेयांना वाहिलेले जागतिक प्रदर्शन ‘डब्ल्यूटीसीई’बरोबर विशेष सामंजस्य केले आहे.

हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन २० ते २२ ऑक्टोबर २०१६ दरम्यान मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव येथे होत असून, त्यात टी बोर्डाने मोठी जागा आरक्षित केली आहे. भारताला जागतिक स्तरावर चहाची निर्मिती आणि पुरवठा करणारा आघाडीचा देश बनविण्याचे टी बोर्डाचे लक्ष्य आहे. या दृष्टीने नवीन खरेदीदार व व्यापार भागीदार मिळविण्याचे डब्ल्यूटीसीई हे आदर्श व्यासपीठ ठरेल. तसेच उत्तर भारतातासारख्या नवीन क्षेत्रात चहाचे मळे विकसित करण्यासाठी बागायतदारांनी प्रोत्साहित करण्याच्या प्रयासात डब्ल्यूटीसीईच्या प्रदर्शनाची साथ मिळेल, असा टी बोर्डाचा विश्वास आहे.