गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी औद्योगिक उत्पादन नोंदविताना या क्षेत्राने नोव्हेंबर २०१२ मध्ये ०.१% कामगिरी बजाविली आहे. गेल्या सलग चार महिन्यांपासून चिंताजनक औद्योगिक उत्पादन दरवाढ नोंदविणाऱ्या उद्योग क्षेत्राकडूनही आता व्याजदर कपातीसाठी अपेक्षा वाढविल्या जात आहेत.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकामार्फत मोजले जाणारे गेल्या वर्षांतील (नोव्हेंबर २०११) ६% च्या तुलनेत देशातील औद्योगिक उत्पादन यंदाच्या ऑक्टोबरमध्येही वरच्या, ८.३% टप्प्यावर होते.
निर्मिती, खनिजसह भांडवली वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात घसरण झाल्याने गेल्या चार महिन्याच्या कालावधीत यंदा पुन्हा शून्याच्या खाली औद्योगिक उत्पादनाचा दर पोहोचला आहे. यापूर्वी जुलै २०१२ मध्येही हा दर ०.१% होता.
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ दरम्यान कंपनी उत्पादन अवघ्या एक टक्क्याने वाढले आहे.
वर्षभरापूर्वी याच कालावधीत ते ३.८% होते. निर्देशांकात ७५% हून अधिक वाटा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्रानेही वर्षभराच्या ६.६% तुलनेत यंदा अवघी ०.३% वाढ नोंदविली आहे.
आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांमध्येही हा दर ४.२% वरून एक टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.
नोव्हेंबर २०१२ मध्ये भांडवली वस्तूंचे उत्पादनही ७.७% घसरले आहे. नोव्हेंबर २०११ मधील ४.७% तुलनेत यंदा ते अधिक आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ दरम्यान ते ११.१% राहिले आहे.
नोव्हेंबरमध्ये ऊर्जा उत्पादनही वर्षभरापूर्वीच्या १४.६% वरून थेट २.४% वर आले आहे. तर पहिल्या आठ महिन्यातील या क्षेत्राची वाढ वार्षिक तुलनेत ९.५% ऐवजी ४.४% राहिली आहे.
ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादनही दोन महिन्यांपूर्वी एक टक्का तर विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राची वाढही १.९% राहिली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट होणाऱ्या एकूण २२ उद्योग क्षेत्रापैकी १३ उद्योगांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये नकारात्मक वाढ नोंदविली आहे.

व्याजदर कपातीची महिनाअखेर शक्यता
सद्यस्थितीतील बिकट अर्थव्यवस्थेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून तेवढी आशा तमाम उद्योग क्षेत्राला आहे. कमी औद्योगिक उत्पादन दर, वाढती महागाई, घसरती निर्यात आणि वाढत्या वित्तीय तसेच व्यापारी तूट या सर्वावर व्याजदर कपात हा उपाय होऊ शकतो, असा सूर या क्षेत्रातून व्यक्त होत आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे तिसऱ्या तिमाही पतधोरण महिनाअखेर जाहीर होत आहे. यापूर्वीच्या पतधोरणात मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात टाळली होती. महागाई दर अद्यापही सहनशक्तीच्या पलिकडे असल्याचे निमित्त पुढे करून गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी २९ जानेवारीच्या पतधोरणात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही दिले होते.

२०१२ अखेर निर्यातही घसरली
डिसेंबर २०१२ मध्ये देशाची निर्यात १.९% घसरली असून यंदा ती २४.८ अब्ज डॉलर झाली आहे. तुलनेत याच कालावधीतील आयात मात्र ६.२६% वधारती राहिली आहे. २०१२ ची अखेर करताना देशातील निर्यातीने सलग आठव्या महिन्यात निर्यातीतील घसरण नोंदविली आहे. अमेरिका तसेच युरोपीय राष्ट्रांमधील देशातील वस्तूंसाठी असलेली मागणी कमी झाल्याने निर्यात डिसेंबर २०११ मधील २५.३ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा खाली आली आहे. डिसेंबरमध्ये आयातही ४२.५ अब्ज डॉलर राहिल्याने व्यापारी तूट १७.६ अब्ज डॉलरची झाली आहे. वाढती व्यापारी तूट सरकारसाठी आधीच चिंताजनक बाब बनली आहे. २०१२-१३ या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यातील व्यापारी तूट १४७.२ अब्ज डॉलर झाली आहे.

डॉ. अहलुवालिया पुन्हा चर्चेत
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी यंदाच्या घसरलेल्या औद्योगिक उत्पादन दरांसाठी सांख्यिकी कारण पुढे केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून डिसेंबरमधील औद्योगिक उत्पादन निश्चितच सकारात्मक असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी सरकारकडून उचलले जाणारे पाऊल आणि त्यांचे परिणाम हे निमित्त दिले गेले आहे. औद्योगिक उत्पादनातील घसरण ही काही आश्चर्यकारक बाब नसून दर महिन्याला विकास दराबाबत भाकित करणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या दैनिक उत्पन्नावरून व्यक्त केलेल्या मतांमुळे अहलुवालिया यापूर्वी चर्चेत आले होते.


२०१२-१३ च्या शेवटच्या तिमाहीची सुरुवात झाली असताना भारताच्या आर्थिक अंदाजावर एक नजर फिरविणे आवश्यक ठरेल. ‘क्रेडिट सूस’च्या म्हणण्यानुसार, सलक राष्ट्रीय उत्पादनाबरोबरच महागाई निर्देशांकही वाढविण्यात आला आहे.