स्वस्त विजेच्या मागणीवर उर्जामंत्र्यांचा पर्याय
महाराष्ट्रात वीजदर महाग असल्याने उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होत असताना परवडणाऱ्या वीजदरांसाठी उद्योगांनी रात्री वीज वापरण्याचा पर्याय उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला आहे. उद्योगांनी रात्री १२ तास वीज वापरली किंवा रात्रपाळीत काम केले, तर स्वस्त व चांगल्या दर्जाची मुबलक वीज मिळेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
उद्योगांना वीजेच्या प्रश्नांवर भेडसावणाऱ्या अडचणींबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच एका बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृहात केले होते आणि त्यासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पुणे, पिंपरी-चिंचवड, वाडा, नाशिक, बारामती, नाशिक, सातारा आदी परिसरातील उद्योजकांनी या बैठकीत आपल्या समस्या मांडल्या. त्यावेळी त्यांनी स्वस्त दरांसाठी रात्री वीज वापरण्याचा पर्याय उद्योजकांना दिला. रात्रपाळीत काम करणे काही उद्योगांना कठीण असते. महिला कर्मचाऱ्यांना बोलाविता येत नाही, कामगारांच्या वाहतुकीचा व अन्य अडचणी येतात. रात्रपाळी भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे रात्रपाळीतही सुरु राहणाऱ्या उद्योगांचे प्रमाण कमी आहे. पण परवडणाऱ्या वीजदरांसाठी हा पर्याय तपासण्याची सूचना बावनकुळे यांनी केली. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, वाहतूक खर्चातील वाढ आदींमुळे वीज महाग आहे. पण वीजकंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारुन एप्रिलपर्यंत उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी पावले टाकण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिेले.
‘मेक इन महाराष्ट्र’साठी उद्योगांना वीज, पाणी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिले जाईल, असे सुभाष देसाई यांनी बैठकीत सांगितले.