गेल्या आठवडय़ातील सलग दोन दिवसांची घसरण नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच थोपविली गेली. विप्रोच्या आकर्षक तिमाही वित्तीय निकालाच्या पाठिंब्याने एकूण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स सोमवारी १४१.४३ अंश वाढीने २१,२०५.०५ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सप्ताहप्रारंभी ५२.३० अंश वाढ होत प्रमुख निर्देशांक ६,३०३.९५ पर्यंत गेला.
भांडवली बाजाराने गेल्या दोन सत्रांमध्ये सलग घट नोंदविताना २२५.८७ अंशांचे नुकसान सोसले होते. यामुळे सेन्सेक्स २१ हजारांच्या काठावर होता. नव्या सप्ताहारंभापासून मुंबई निर्देशांक तेजीतच होता. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महसुली उत्पन्नातील तिसऱ्या क्रमांकाच्या विप्रोने डिसेंबरअखेर नफ्यातील २७ टक्के वाढ नोंदविल्याने कंपनीचा समभागही ३.७ टक्क्यांनी उंचावला. त्याला टीसीएस व इन्फोसिसने अनुक्रमे ५.५ व ०.५ टक्क्यांच्या वाढीची साथ दिली. एकूण आयटी निर्देशांकही २.८३ टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्समध्ये टीसीएस वरचढ राहिला. विप्रोही दुसरा मोठा झेप घेणारा समभाग ठरला.
रिलायन्सच्या १.७ टक्के घसरणीसह सेन्सेक्समधील १४ कंपनी समभाग नकारात्मकतेच्या यादीत राहिले. तेल व वायू निर्देशांकही १ टक्क्याने रोडावला.